आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babanrao Pachpute News In Marathi, Nationalist Congress, Lok Sabha Election

श्रीगोंद्यात उमेदवारांपेक्षा नागवडे, पाचपुतेंच्या प्रतिष्ठेची लढत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे - निवडणुकीत उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागणे हे स्वाभाविक असले, तरी श्रीगोंदे तालुक्यात मात्र उमेदवारांपेक्षा राष्ट्रवादीचे आमदार बबनराव पाचपुते व काँग्रेसचे शिवाजीराव नागवडे या दोन्ही काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांचीच प्रतिष्ठा पणाला लागल्याचे चित्र आहे.श्रीगोंदे तालुक्याचे राजकारण मागील तीस वर्षांपासून आमदार बबनराव पाचपुते व माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांच्याभोवतीच फिरत आहेत. निवडणूक कोणतीही असो, दोन्ही नेते परस्परांची ताकद आजमावत असतात. लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र या दोन्ही नेत्यांचे (वरकरणी का होईना) सख्यत्व दिसून येत आहे. काँग्रेस आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजीव राजळेंच्या प्रचारात व मोठय़ा जाहीर सभांमध्ये नागवडे हे पाचपुतेंच्या मांडीला मांडी लावून बसल्याचे पाहताना आश्चर्याचा धक्का बसत आहे. या दिग्गज नेत्यांचे ऐक्य झाल्याने राजळेंना किती मताधिक्य मिळणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. नेत्यांचे ऐक्य मतदारांच्या किती पसंतीला उतरते हे निकालातून कळेलच. एकूणच राजळेंना पाथर्डीपेक्षाही श्रीगोंद्यातून मताधिक्य देऊ, असे आश्वासन पाचपुतेंना खरे करून दाखवण्याचे आव्हान त्यांच्या सर्मथकांपुढे आहे.


राजळेंऐवजी भाजपचे दिलीप गांधी यांना मताधिक्य मिळाल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे पडसाद उमटतील, यात शंका नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाचपुते विरोधक असलेले घनश्याम शेलार हे पाचपुतेंच्या विधानसभा उमेदवारीसाठी पर्याय म्हणून पुढे आल्यास आश्चर्य वाटू नये. विधानसभा निवडणुकांचा संदर्भ विचारात घेता नागवडेंपेक्षा पाचपुतेंना लोकसभा निवडणुकीत श्रीगोंद्यातील मतदारांचा कौल चिंता वाढवणारा दिसत आहे.


भाजपचे उमेदवार गांधी तालुक्यातील प्रचारात राजळेंच्या तुलनेत काहीसे पिछाडीवर दिसत असले, तरी मागील लोकसभा निवडणुकांत भाजपला श्रीगोंद्याने दिलेले मताधिक्य त्यांच्यासाठी समाधान देणारे आहे. गत वेळी गांधी यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारापेक्षा अधिक मते मिळवली होती. तत्पूर्वी प्रा. ना. स. फरांदे यांनीही राष्ट्रवादी उमेदवाराच्या बरोबरीने तालुक्यात मते खेचली होती. नागवडे-पाचपुतेंचे वरकरणी मनोमिलन कार्यकर्त्यांना रुचले नाही, तर त्याचा लाभ उठवणयाचा प्रयत्न भाजपवाले करत आहेत. अशा सुप्त मतदारांवरच भाजपच्या गांधींची मदार अवलंबून आहे.


पाचपुते यांच्याप्रमाणेच तालुक्यात आपले वर्चस्व अबाधित राखण्यासाठी शिवाजीराव नागवडे सरसावले आहेत. राजळेंना मताधिक्य मिळाल्यास त्यात आपलाच सिंहाचा वाटा असावा. या हेतूने नागवडेसर्मथक जिद्दीने काम करत आहेत. त्यामुळे या वेळी उमेदवारापेक्षा स्थानिक नेत्यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक झाली आहे.


लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे संदर्भ वेगळे
लोकसभा निवडणुकीत यापूर्वी तालुक्यात कोणाला मताधिक्य मिळाले याला यंदा महत्त्व देण्याचे कारण नाही. आमची ताकद आम्ही निकालातून दाखवून देऊ. भाजपवाले 2009 मध्ये दिलीप गांधींना मिळालेल्या मताधिक्याचा अपप्रचार करत आहेत. या निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने मला सत्तावीस हजारांचे मताधिक्य दिले होते, हे कसे विसरता येईल. दोन्ही निवडणुकांचे संदर्भ वेगवेगळे आहेत. बबनराव पाचपुते, आमदार.


शिव्या देणारे एकत्र
कालपर्यंत परस्परांना शिव्याशाप देणारे श्रीगोंदे तालुक्यातील दोन्ही काँग्रेसचे नेते एकत्र दिसत असले, तरी मला त्याची फिकीर नाही. श्रीगोंदे तालुक्यातील सामान्य जनता सदैव माझ्या बरोबर आहे. यापूर्वी तालुक्याने भाजप उमेदवाराला लोकसभेसाठी मताधिक्य दिले होते. ती परंपरा याही निवडणुकीत कायम राहील, असा मला विश्वास आहे. दिलीप गांधी, खासदार, भाजप.