आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. आंबेडकर यांचे विचार भाजपने अंमलात आणले, पालकमंत्री राम शिंदे यांचे नगरमध्ये प्रतिपादन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार प्रत्यक्षात आणण्याचे सर्वाधिक काम आता केंद्र राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप सरकारने केले आहे. सरकारने केलेल्या या कामांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम पक्ष कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन पालकमंत्री राम शिंदे यांनी केले.

डॉ. आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरूवारी लक्ष्मीकारंजा येथील भाजप कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शिंदे बोलत होते. मंत्री शिंदे महानगर जिल्हाध्यक्ष खासदार दिलीप गांधी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. सरचिटणीस श्रीकांत साठे, किशोर बोरा, चिटणीस जगन्नाथ निंबाळकर, महिला आघाडीच्या अध्यक्षा गीतांजली काळे, संगीता खरमाळे, नगरसेविका मालन ढोणे, सुवेंद्र गांधी, नितीन शेलार, दामोदर माखिजा, विठ्ठल कानवडे, सुनील पंडित, जालिंदर तनपुरे, धनंजय जामगांवकर, शरद ठुबे, अशोक कानडे, वसंत राठोड, शिवाजी दहिंडे, लीला अगरवाल, मिलिंद भालसिंग, मनेष साठे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शिंदे म्हणाले, केंद्र राज्यात भाजपचे सरकार असल्याने कार्यकर्त्यांनी अधिक सतर्क राहून शेवटच्या स्तरापर्यंत योजना पोहोचण्याचा प्रयत्न करावा. जनतेत जाऊन लोकांचे प्रश्न समजून घेऊन ते प्रश्न पालकमंत्री, खासदार लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. हे प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचे प्रयत्न केले जातील. खासदार गांधी शहराचे अध्यक्ष झाल्यानंतर चांगले काम सुरु झाले आहे, पक्षाला उर्जितावस्था आली आहे. शहरात चांगले काम करुन आगामी महापालिका निवडणुकीत भाजपचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणून भाजपचाच महापौर करण्याचे नियोजन आतापासूनच करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


मिरवणूक उत्साहात
डॉ.आंबेडकर जयंतीनिमित्त नगर शहर भिंगारमध्ये उत्साहात मिरवणुका निघाल्या. भिंगारच्या मिरवणुकीत हत्ती हे प्रमुख आकर्षण होते. वाहतुकीचा खोळंबा होऊ नये, म्हणून भिंगारबाहेरुन वाहतूक वळवण्यात आली होती. शहरातील मुख्य मिरवणूकही डीजेमुक्त वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या तालावर निघाली.