आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Babasaheb Bhos Withdraw From Zp Election Srigonda

मांडवगण गटातून बाबासाहेब भोस यांची अखेर माघार

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस हे मांडवगण गटातून उमेदवारी अर्ज दाखल करणार नाहीत. मात्र, आपण पक्षावर नाराज नसून यापुढे पक्षाचेच काम करणार असल्याचे त्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना स्पष्ट केले. दरम्यान, भोस यांच्या या निर्णयापूर्वीच विद्यमान सदस्य सचिन जगताप यांनी गुरुवारी शक्तीप्रदर्शन करीत मांडवगण गटात अर्ज दाखल केला.
मांडवगण गटात जगताप की भोस हे त्रांगडे राष्ट्रवादीला चांगलेच त्रासदायक ठरत होते. याबाबत पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दोन बैठका घेतल्या. पण दोन्ही बैठकीत केवळ चर्चा झाली. निर्णय न झाल्याने हक्काच्या जागेवरील उमेदवारीवरून पक्षांतर्गत शीतयुद्ध पेटण्याची चिन्हे दिसत होती. भोस यांचे राष्ट्रवादीत पुनर्वसन झाले नव्हते, तर जगताप यांची उमेदवारी डावलणे सोपे नसल्याने पाचपुते यांची चांगलीच अडचण झाली होती. वाळकी व चिचोंडी पाटील, तसेच श्रीगोंद्यातील मांडवगण गटावर जगताप कुटुंबाचा दबदबा आहे. या परिसरात भोस यांना मानणाराही मोठा वर्ग असल्याने पाचपुते कोणताही निर्णय स्थानिक पातळीवर घेऊ शकत नव्हते. जगताप यांना उमेदवारी नाकारणे म्हणजे आमदारकीत मोठा अडसर स्वत:हून तयार करण्यासारखे होते. जगताप यांनी गुरुवारी पक्षातर्फे व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. भोस यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता आपण या निवडणुकीसाठी अर्जच दाखल करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, याचा अर्थ आपण पक्षावर नाराज आहे असे नाही. हा निर्णय मनापासून घेतला आहे. मांडगणमधून पक्ष जो उमेदवार देईल तो निवडून आणण्याची जबाबदारी आपण घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महाबळेश्वरमध्ये निघाला तोडगा - मांडवगण गटात उमेदवारीसाठी जगताप यांना हिरवा कंदील मिळेल, असा अंदाज भोस यांना आल्याने ते बंडखोरीच्या पवित्र्यात होते. त्यांची ही भूमिका राष्ट्रवादीला परवडणारी नव्हती. त्यामुळे सदाशिव पाचपुते यांनी एका विवाहानिमित्त ते व भोस महाबळेश्वरला गेले असता भोस यांची समजूत काढण्यात त्यांना यश आले.
मुलालाही उमेदवारी नाही - हा निर्णय घेताना पक्षनेतृत्वापुढे कुठल्याही अटी ठेवल्या नाहीत. माझे राजकीय पुनर्वसन होणार की नाही याबद्दलही निश्चित काही माहिती नाही. मुलगा गणेश यालाही मी पंचायत समितीला उभा करणार नाही. बाबासाहेब भोस.
माहिती नाही - भोस यांच्या निर्णयाबद्दल काहीच माहिती नाही. मी पक्षातर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला असून पुढील निर्णय पक्षच घेईल. - सचिन जगताप, उमेदवार