आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुरवस्था: जिल्हा रुग्णालयात मृतदेहांची हेळसांड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा सरकारी रुग्णालयाला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण सुटत नाही, अशी स्थिती आहे. जिवंत रुग्णांची तर हेळसांड होतेच, पण येथे येणाऱ्या मृतदेहांचीही मोठी हेळसांड होत आहे. मृतदेह ठेवण्याच्या पाच शीत कप्प्यांपैकी (मॉर्च्युरी) तीन बंद असल्याने मृतदेह बाहेर ठेवावे लागत आहेत. बेवारस मृतदेहांची प्रचंड दुर्गधी सुटत असल्याने तेथे वावरणे अशक्य झाले आहे. बंद पडलेले शीतकप्पे बाहेर ओट्यावर रचून ठेवण्यात आले आहेत. याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक एस. एम. सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.
जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाला अन्् तो मृतदेह काही काळ ठेवायचा असेल, तर नगर शहरात जिल्हा रुग्णालयासह कोणत्याही खासगी रुग्णालयातही तशी व्यवस्था नाही. त्यामुळे नगरकरांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हा रुग्णालयातीलही मृतदेह ठेवण्याचे शीतगृहाचे (मॉर्च्युरी) तीन कप्पे वर्षभरापासून बंद आहेत. त्यामुळे जास्त मृतदेह आल्यानंतर एकतर त्यांची लवकर विल्हेवाट लावावी लागते किंवा त्यांना तसेच बाहेर फरशीवर ठेवावे लागते. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे मृतदेहांचे विघटन वेगात होऊन परिसरात दुर्गंधी पसरत आहे.
जिल्हा रुग्णालयाचा कारभार किती अनास्थेचा आहे, याचे मॉर्च्युरी हे एक उदाहरण आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या दोन कप्प्यांत चारच मृतदेह ठेवण्याची सुविधा आहे. ही मॉर्च्युरी शवविच्छेदन गृहातच आहे. तीन शीतकप्पे बंद अाहेत. उर्वरित दोन कप्पेही अधूनमधून बंद असतात. त्यामुळे अनेक वेळा ड्रॉवरमध्ये मृतदेह फुगून अडकल्याची उदाहरणे आहेत. ते काढताना तेथील कर्मचाऱ्यांंची पुरेवाट होत होती, अशी माहिती समजली.
सध्या बंद पडलेले शीतगृहांचे कप्पे बाहेर काढून ठेवण्यात आले आहेत. त्यांची पूर्ण वाट लागण्याची शक्यता आहे. अनेक वेळा शवविच्छेदन झालेले मृतदेह तपासासाठी किमान तीन दिवस जिल्हा रुग्णालयात ठेवावे लागतात. मात्र, ते ठेवण्याची यंत्रणाच येथे नाही. शवविच्छेदन झालेले मृतदेह कुजण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. शवागृहात बसवलेला एसीही बंद पडला आहे. त्यामुळे मृतदेहाची स्थिती अतिशय वाईट होत असल्याने अनोळखी मृतदेह ओळखणे नातेवाईकांनीही अशक्य होत आहे.
जिल्हा रुग्णालयाला लागलेले दुरवस्थेचे ग्रहण सुटत नाही. जिवंत रुग्णांची तर हेळसांड होतेच, पण येथे येणाऱ्या मृतदेहांचीही मोठी हेळसांड होत आहे. मृतदेह ठेवण्याच्या पाच शीत कप्प्यांपैकी (मॉर्च्युरी) तीन बंद आहेत. त्या शीतगृहाबाहेरच्या ओट्यावर धुळखात पडल्या आहेत.
नागरिकांना मॉर्च्युरीची सुविधा मिळावी
पुणे,मुंबई, नाशिकसारख्या शहरांत मृतदेह ठेवण्याची अनेक ठिकाणी सुविधा आहे. एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यानंतर दूर राहणारे नातेवाईक येईपर्यंत मृतदेह मॉर्च्युरीत ठेवता येतो. परिणामी नातेवाईकांना अंत्यदर्शन घेता येते. त्यासाठी रुग्णालयांकडून भाडेही स्वीकारले जाते. हा फक्त सुविधेचा प्रश्न नसून त्याचा संबंध भावनेशीही असतो. नगरमध्ये मात्र ही सुविधा नसल्याने मृतदेह ठेवता येत नाही. लवकर अंत्यसंस्कार करावे लागतात.
शल्य चिकित्सकांच्या बदलीची मागणी
साध्याकर्मचाऱ्याची लहानशी चूक झाली, तर त्याच्यावर लगेच कारवाई होते. मात्र, सध्या जिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या प्रचंड अनास्थेच्या कारभाराबाबत तक्रारी आरोग्यामंत्र्यांपर्यंत होऊनही जिल्हा शल्य चिकित्सकांवर काहीच कारवाई होत नाही. त्यांच्या बदलीसाठी थेट नाशिकला आरोग्य उपसंचालकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा स्वयंसेवी संस्था सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
बातम्या आणखी आहेत...