आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खड्डय़ांच्या नशिबी दगड अन् मातीच !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरांतर्गत रस्त्यावरील खड्डय़ांच्या दुरुस्तीतील तात्पुरत्या मलमपट्टीचा फोलपणा आता उघड झाला आहे. मनपाने आठ लाख रुपये खर्चातून प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या कामास बुधवारपासून सुरुवात केली आहे. खडी, मुरूम व मातीचा वापर होत असल्याने पहिल्याच दिवशी खड्डे उघडे पडले असून खड्डय़ांसोबत धुळीचाही त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

दिल्लीगेट, लालटाकी, सर्जेपुरा चौक, बागडपट्टी, कुष्ठधाम आदींसह शहरांतर्गत प्रमुख रस्ते खड्डय़ांत हरवले आहेत. या खड्डय़ांमुळे नगरकर व वाहनांचे आरोग्य धोक्यात आल्याचे ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी पाठपुरावा करून समोर आणले. गेल्या पाच वर्षांत रस्त्यांच्या डागडुजीवर झालेली एक कोटी रुपयांची उधळपट्टीही नगरकरांसमोर मांडली. याचा परिणाम म्हणून महापालिका प्रशासनाने यातील काही रस्त्यांच्या डागडुजीसाठी आठ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. पन्नास ते साठ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता असताना अवघा दहा टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून खासगी ठेकेदारामार्फत खड्डय़ांची दुरुस्ती करण्याचे काम 7 ऑगस्टपासून सुरू करण्यात आले.

या दुरुस्तीची ‘दिव्य मराठी’ने शनिवारी दिल्ली दरवाजा, नेप्ती चौक, लालटाकी, सज्रेपुरा आदी विविध भागांत पाहणी केली. यातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे. ठेकेदाराने खड्डे बुजवण्यासाठी खडी, कचखडी, मुरूम व मातीचा वापर केला आहे. त्यामुळे बुजलेल्या खड्डय़ांवरून वाहन जाताच खडी उघडी पडत आहे, तर कचखडी व मुरुमांतील माती रस्त्यात विखुरली जात आहे. दिवसभरात या खड्डय़ांवरून जाणार्‍या वाहनाने मोठी खडीही रस्त्यावर विखुरली आहे. रस्त्यात विखुरलेल्या मुरूम, कचखडी व मोठय़ा खडीमुळे अपघातांचा धोकाही वाढला आहे. मोटारसायकल घसरून पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशा डागडुजीपेक्षा खड्डे परवडले, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहे. दिल्ली दरवाजा ते नेप्ती चौकातील सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठीही मुरुमाचा वापर करण्याची शक्कल लढवण्यात आली आहे. दुरुस्तीनंतर अवघ्या काही तासांतच हा मुरूम रस्त्यावर पसरला आहे. खड्डे बुजवण्यासाठी शास्त्रीय पद्धत वापरण्याचे सुतोवाच शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी केले होते. मात्र, अपुरा निधी मिळाल्याने, आहे त्याच खर्चात दुरुस्ती करण्याचे धोरण अवलंबण्यात आले आहे. मात्र, हा खर्च मातीत गेल्याचे शहरातील चित्र आहे. शहरात आतापर्यंत दमदार व मोठा पाऊस झालेला नाही. दुरुस्तीनंतर अवघ्या काही तासात उघडे पडलेले खड्डे मोठय़ा पावसानंतर आणखी त्रासदायक ठरणार आहेत.

पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजवायला हवे
खड्डे बुजवण्यासाठी मुरुमाचा वापर केला जातो, ही बाब मी अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यांनी हा मुरूम चोपून बसवणार असल्याचे सांगितले. पण तरीही त्याचा उपयोग होणार नाही. वास्तविक मनपाने पावसाळ्यापूर्वीच खड्डे बुजवणे आवश्यक होते. तसे न केल्याने खड्डय़ांवर केलेला खर्च वाया जाईल. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करू, प्रसंगी रस्त्यावर उतरण्याची भूमिका घेतली जाईल.’’ विनीत पाऊलबुधे, विरोधी पक्षनेते.

पावसानंतर मुरूम वाहणार नाही
खड्डय़ांमध्ये केवळ मुरूम टाकला जात नाही, तर त्यात खडीचेही मिर्शण आहे. जमिनीत ओल आहे, त्यामुळे बुजवलेल्या खड्डय़ांवर व्यवस्थित रोलिंग करून घेतले जात आहे. त्यामुळे पाऊस झाला, तर केवळ मुरूम वाहून जाईल, पण खडी तशीच राहील. खड्डे डांबर टाकून बुजवावेत ही नागरिकांची अपेक्षा बरोबर आहे, पण पावसाळ्यात डांबर टिकणार नाही. जनतेच्या भावनेशी आम्ही सहमत आहोत.’’ एन. डी. कुलकर्णी, शहर अभियंता.

नियम धाब्यावर
नियमानुसार खड्डे बुजवताना कॉम्प्रेसरने त्यातील माती काढून त्यात खडी व डांबर टाकणे आवश्यक आहे. पण त्या पद्धतीने काम होत नाही. सध्या या खड्डय़ांमध्ये खडी व माती टाकली जात आहे. त्यामुळे धुळ उडून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शहर अभियंता एन. डी. कुलकर्णी यांनी याकडे लक्ष द्यावे; अन्यथा आठ ते नऊ लाख रुपये ठेकेदारांच्या घशात जातील. ठेकेदार व अधिकार्‍यांसाठी हे खड्डे म्हणजे कुरण बनले आहे. निधी खर्च होऊनही नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. ’’ किशोर डागवाले, नगरसेवक.