आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राथमिक शिक्षण विभाग नाचवतोय कागदी घोडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या धोकादायक शाळाखोल्या पाडण्याबाबत (निर्लेखीत) केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दोन दिवसांत सादर करण्याबाबत शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांनी चार-पाच वेळा सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांशी पत्रव्यवहार केला. तथापि, एकही अहवाल अद्यापि सादर झालेला नाही. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संबंधित गटशिक्षणाधिकार्‍यांवर कारवाई अपेक्षित असताना शिक्षण विभाग केवळ कागदी घोडे नाचवतो आहे.
प्राथमिक शाळांच्या बांधकामाचा कालावधी, त्याचा प्रकार, खर्च व घसारा मूल्य गृहित धरून जिल्ह्यातील 60 शाळांमधील धोकादायक बनलेल्या 213 वर्गखोल्या निर्लेखनाचा निर्णय झाला आहे. यात नव्याने 9 शाळांची वाढ होऊन निर्लेखनासाठी पात्र वर्गखोल्यांची संख्या 246 वर पोहोचली. या इमारती धोकादायक असल्याने कोणत्याही क्षणी कोसळून शेकडो विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होऊ शकेल.
धोकादायक वर्गखोल्या पाडण्यासाठी मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात दिरंगाई केली जात आहे. या खोल्या पाडण्याची कार्यवाही करताना गटविकास अधिकारी, उपअभियंता, तसेच गटशिक्षणाधिकारी उपस्थित असणे बंधनकारक आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी या खोल्या पाडण्याचे निर्देश दिले. परंतु या खोल्या पाडण्यात चालढकल होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागला आहे. याप्रकरणी शिक्षणाधिकारी गोविंद यांनी सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांकडून कार्यवाहीचा अहवाल मागितला. मात्र, अहवाल आले नाहीत. चार-पाच वेळा स्मरणपत्रे देऊनही एकही अहवाल शिक्षण विभागाकडे सादर झालेला नाही. कामात असा हलगर्जीपणा होत असतानाही शिक्षण विभाग केवळ स्मरणपत्रे देऊन कागदी घोडे नाचवत आहे. हे प्रकरण चिघळल्यास अंगलट येऊ नये, अशी सावध भूमिका शिक्षण अधिकार्‍यांनी घेतली आहे. मात्र, या गोंधळात चिमुरड्यांचा जीव धोक्यात आहे, याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे.
पदाधिकारी निवडणुकीत..
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडधडू लागल्याने जिल्हा परिषदेचे काही पदाधिकारी त्यात व्यग्र झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका असतानाही हे पदाधिकारी मूग गिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे, तर शिक्षण विभागही कागदी घोडे नाचवून कार्यवाही सुरू असल्याचा आव आणत आहे. याबाबत नाराजी व्यक्त होत आहे.
काय आहे स्मरणपत्रात
गटशिक्षणाधिकार्‍यांना पाठवलेल्या स्मरणपत्रात म्हटले आहे की, धोकादायक शाळाखोल्या पाडण्यात आल्या आहेत काय, याबाबतचा अहवाल प्राप्त झालेला नाही. या खोल्या पाडल्या नसल्यास त्याचा अहवाल 2 दिवसांत सादर करावा; अन्यथा होणार्‍या घटनेस व दिरंगाईला गटशिक्षणाधिकार्‍याला जबाबदार धरण्यात येईल.