आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहिणाबाईंच्या कवितांनी दिली अनेकांना जगण्याची उमेद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - न शिकलेली, लिहिता-वाचता न येणारी बहिणाबाई,तिच्या अनुभवातून, अंत:करणातून उमटलेल्या भावना व त्यातून निर्माण झालेल्या शाश्वत मूल्यांवर आधारित कवितांवर प्रबंध लिहून अनेकांनी पीएच. डी. मिळवली. त्यांच्या कविता म्हणजे सोन्याची खाण आहे. प्रत्येक काळातील वास्तवाला स्पर्श करणा-या या कविता आहेत. या कवयित्रीच्या कवितांनी अनेकांना जगण्याची उमेद व दिशा देण्याचे कार्य केले, असे डॉ. आरती दातार यांनी सांगितले.
वनवासी कल्याण आश्रमाच्या नगर शाखेच्या वतीने समर्थ विद्यामंदिरात आयोजित कै. ग. म. मुळे स्मृती व्याख्यानमालेचे उद्घाटन पश्चिम महाराष्‍ट्र प्रांत सहसचिव जयंत काळे यांच्या हस्ते व डॉ. दातार यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी जिल्हाध्यक्ष मेघश्याम बत्तीन, शहराध्यक्ष प्रशांत मोहोळे उपस्थित होते. डॉ. दातार म्हणाल्या, बहिणाबार्इंच्या कविता अहिराणी व बोली भाषेत असल्या, तरी अर्थ समजण्यास अडचण येत नाही. प्रतिभेचं जन्मजात देणं असलेल्या बहिणाबार्इंनी संकटकाळातही स्वत:ला सावरले. त्यांच्या ‘अरे संसार संसार’ या ओळीतील वास्तव आजही शाश्वत आहे.

दु:ख गिळायचे सुख इतरांपर्यंत पोहोचवायचे. नम्रता हवी, पैशांच्या मागे धावू नका. प्रपंचातील मीपणा सोडा. अहंकारापासून दूर राहा. दुस-याचे दोष शोधण्यापेक्षा स्वत:ला ओळखा. स्वत:च्या शरीराची श्रीमंती ओळखा. स्त्रीजन्माचा खरा अर्थ ओळखा, गाण्यांतील-कवितेतील अर्थाचा बोध घेऊन तक्रार न करता आनंदी आयुष्य जगा, असा सल्ला डॉ. दातार यांनी दिला.

काळे यांचेही भाषण झाले. सचिव अभय गोळे यांनी प्रास्ताविक केले. मोहोळे यांनी संस्थेच्या कामाची माहिती दिली. निधी संकलन, नवीन कार्यकर्ते तयार करणे याबरोबरच वनवासींचे जीवन, संस्कृती, परंपरा जोपासून त्याची प्रगत समाजाला माहिती करून देणे यासाठी संस्था कार्यरत असून या कार्यात सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. सूत्रसंचालन विद्या पटवर्धन यांनी केले. ओंकार देऊळगावकर व प्रसाद सुवर्णपाठकी यांनी गीत सादर केले. मीना देशपांडे यांनी पसायदान म्हटले.