आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन क्रांती: मुख्यमंत्र्यांनी लावले दलित-मराठ्यांत भांडण; ‘बामसेफ’च्या अध्यक्षांचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ‘पुणे जिल्ह्यातील संघ भाजपच्या नेत्यांनी मराठ्यांच्या विरोधात दलित मोर्चे काढण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी लागणारे पैसे, गाड्या इतर साधनसामग्री सर्व काही देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. परंतु, आम्ही हा प्रस्ताव धुडकावून लावत आमच्या स्तरावर बहुजन मोर्चा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दलित मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम केले,’ असा आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी साेमवारी बहुजन क्रांती मोर्चाच्या सभेत केला.

अॅट्राॅसिटी कायद्याच्या समर्थनार्थ नगरमध्ये साेमवारी बहुजन क्रांती माेर्चा काढण्यात अाला. ‘एकच गर्व बहुजन सर्व’ अशी घोषणा देत शहरासह जिल्ह्यातील विविध समाजाचे नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी मेश्राम म्हणाले, ‘मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विराेध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला हात लावू नका. भाजप सरकारने दलित-मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज जिजामातांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेला पुरस्कार शासनाने परत घ्यावा, ही मागणी मराठा समाजाने एेनवेळी काढून टाकली, ही मराठा क्रांती मोर्चातील मोठी उणीव आहे. बहुजन क्रांती मोर्चातर्फे मात्र पुरंदरे यांना देण्यात आलेला पुरस्कार शासनाने परत घेण्याची मागणी करण्यात येत असल्याचे मेश्राम यांनी स्पष्ट केले. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यापेक्षा तो शिथिल करावा, ही मागणी अधिक घातक आहे. अॅट्रॉसिटीचा गैरवापर करणारे तो करून घेणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,’ असेही मेश्राम यांनी स्पष्ट केले.

‘एकच गर्व बहुजन सर्व’ अशी घोषणा देत नगर शहरासह जिल्ह्यातील विविध समाजाचे लोक सोमवारी निघालेल्या बहुजन क्रांती मोर्चात सहभागी झाले. वाडिया पार्क मैदानावरून दुपारी सव्वा वाजता मोर्चास सुरुवात झाली. तत्पूर्वी, सभेत समाजाच्या प्रतिनिधींची भाषणे झाली. नंतर बहुजन क्रांती मोर्चा संयोजन समितीच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना २१ मागण्यांचे निवेदन देण्यात आले. वाडिया पार्कवरील सभेचे छायाचित्रकार राहुल विळदकर यांनी ड्रोन कॅमेऱ्याद्वारे टिपलेले दृश्य.

गर्दीचे दावे -
३५ हजारांची गर्दी: पोलिसांचा दावा
०४ लाख: संयोजन समितीचा दावा
बातम्या आणखी आहेत...