आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बहुजन क्रांती मोर्चात दिसली आंबेडकरी चळवळीची ताकद

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - पुणे जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मराठ्यांच्या विरोधात दलित मोर्चे काढण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यासाठी लागणारे पैसे, गाड्या इतर साधनसामग्री सर्व काही देण्याचे आमिष त्यांनी दाखवले होते. परंतु आम्ही हा प्रस्ताव धुडकावून लावत आमच्या स्तरावर बहुजन मोर्चा काढला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच राज्यातील दलित मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम केले, असा घणाघाती आरोप बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी बहुजन क्रांती मोर्चाच्या सभेत सोमवारी केला.
बहुजन क्रांती मोर्चाच्या वाडिया पार्क येथे झालेल्या सभेत मेश्राम बोलत होते. ‘एकच गर्व बहुजन सर्व’ अशी घोषणा देत शहरासह जिल्ह्यातील विविध समाजांचे नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यांना संबोधित करताना मेश्राम म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विराेध नाही, परंतु त्यांना आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला हात लावू नका.

राज्यातील भाजप सरकारने दलित-मराठा समाजात भांडणे लावण्याचे काम केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजामातांची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांना देण्यात आलेला पुरस्कार शासनाने परत घ्यावा, ही मागणी मराठा समाजाने एेनवेळी काढून टाकली, ही मराठा क्रांती मोर्चातील मोठी उणीव आहे. बहुजन क्रांती मोर्चातर्फे मात्र पुरंदरे यांना देण्यात आलेला पुरस्कार शासनाने परत घेण्याची मागणी करण्यात येत असल्याचे मेश्राम यांनी यावेळी स्पष्ट केले. अॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्यापेक्षा तो शिथिल करावा, ही मागणी अधिक घातक आहे. अॅट्रॉसिटीचा गैरवापर करणारे तो करून घेणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, असेही मेश्राम यांनी स्पष्ट केले.

मोर्चात सहभागी झालेल्या सर्व समाजांच्या प्रतिनिधींना सभेत बोलण्याची संधी देण्यात आली. काहींनी प्रक्षोभक भाषणबाजी करण्याचा प्रयत्न केला, परंतु संयोजकांनी त्यांना आवर घातला. मेश्राम यांच्या भाषणानंतर दुपारी सव्वाच्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली. एकच गर्व बहुजन सर्व, जय भीम, जय जय जय लहुजी, हम सब एक है, एकच साहेब बाबासाहेब, अशा घोषणा देत मोर्चेकरी सोलापूर रस्त्यावरील चांदणी चौकात पोहोचले.

त्यानंतर संयोजन समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना मागण्यांचे निवेदन दिले. चांदणी चौकात मागण्यांचे निवेदन संविधानाचे वाचन करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीताने मोर्चाचा समारोप झाला. कोणताही अनुचित प्रकार घडता मोर्चा शांततेत पार पडला. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली, परंतु बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी मोर्चेकरी नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेतली. सायंकाळी चारनंतर शहरातील सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.
नगरमध्ये पुन्हा एक मोर्चा झाला. गेल्या महिन्यात मराठा समाजाचा विराट मोर्चा झाला. प्रतिमोर्चा काढणार नाही, असे नाही नाही म्हणता शेवटी सोमवारी बहुजन क्रांती मोर्चा निघाला. दलित समाजाची कोणतीही अधिकृत संघटना या मोर्चात अधिकृतपणे सहभागी झालेली नसली, तरी या मोर्चातून आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखवून दिली. मराठा क्रांती मोर्चाने ज्या प्रमुख मागण्या केल्या, त्यांना विरोध करणाऱ्या अगदी दुसऱ्या टोकाच्या मागण्या आजच्या मोर्चाने केल्या. त्यात काही मागण्या नवीन असल्या, तरी मुख्य लक्ष्य मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांना ‘काउंटर’ करण्याचे होते, हेच शेवटी स्पष्ट झाले.

मोर्चासाठी नगर जिल्ह्यासह शेजारील अनेक जिल्ह्यांतील लोकही आले होते. या मोर्चात बहुजन समाजाचे लोक येणार, असे संयोजकांनी आधी जाहीर केले होते. पण, मोर्चात आंबेडकरी चळवळ रिपब्लिकन कार्यकर्त्यांचा वरचष्मा ठळकपणे जाणवत होता. काही प्रमाणात लहुजी सेनेचे कार्यकर्तेही दिसत होते. मुळात मराठा क्रांती मोर्चा निघाल्यानंतर प्रतिमोर्चा काढायचा की नाही, यावर आधी बरेच नाट्य झाले. या मोर्चाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा विरोध होता. त्यामुळे संयोजक संभ्रमात होते. कारण मोर्चात काही अनुचित प्रकार घडला असता, तर आठवले यांचे मंत्रिपदही धोक्यात येण्याची भीती होती, तरीही मोर्चा काढण्याचा निर्णय झाला. सोमवारी तो यशस्वीही झाला.

मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख मागण्यांत कर्जत तालुक्यातील कोपर्डी निर्घृण हत्या प्रकरणातील आरोपींना तातडीने फाशी अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी बदलाची होती. या मागण्यांच्या विरोधात बहुजन क्रांती मोर्चाने मागण्या केल्या. आजच्या मोर्चाची प्रमुख मागणी अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, अशी होती. कोपर्डी हत्या प्रकरणाबरोबरच इतर हत्या प्रकरणातील आरोपींना कडक शिक्षा करावी, अशा मागणीचे फलकही मोर्चात बहुसंख्येने होते. यावरून हा मोर्चा मराठा समाजाच्या मागण्यांचा प्रतिवाद करण्यासाठीच होता, हे स्पष्ट होत होते. वाडिया पार्कमधील वक्त्यांच्या भाषणांत ते स्पष्टपणे जाणवत होते. काही वक्त्यांची भाषा आक्रमक होती. मराठा क्रांती मोर्चावर टिप्पणी करताना एका वक्त्याने ‘बीएमडब्ल्यू’त येऊन आरक्षणाची भीक मागितल्याचा उल्लेखही केला. मात्र, अशा लोकांना फारसे बोलू देण्यात आले नाही. ‘बामसेफ’चे अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मात्र समन्वयाचा सूर काढण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा बहुजन समाजात भांडणे लावत असल्याचा त्यांनी आरोप केला. अर्थात त्यांचा समन्वयाचा हा सूर क्षीण मोर्चाच्या एकूण उद्दिष्टाला छेद देणारा होता.
वरील प्रमुख मागण्या असल्या, तरी मोर्चा सर्वसमावेशक रूप देण्यासाठी भटक्या विमुक्तांना अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण द्या, मागासवर्गीयांच्या शिष्य वृत्तीत वाढ करा, भूमिहीनांना सरकारी जमिनींचे वाटप करा, शेतमालाला हमीभाव द्या, ओबीसींची जातनिहाय गणना करा, ख्रिश्चन समाजाला आरक्षण द्या, मुस्लिम समाजास आरक्षण द्या आदी मागण्यांचेही फलक मोर्चेकऱ्यांच्या हातात होते. निळ्या, पिवळ्या, लाल अनेक रंगी झेंड्यांमुळे मोर्चात अत्यंत वेगळे वातावरण होते.

गर्दीकडे लक्ष
जिल्ह्यातील विविध समाजांच्या वतीने बहुजन क्रांती मोर्चास पाठिंबा दर्शवण्यात आला होता. त्यामुळे या मोर्चाच्या गर्दीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. इतर जिल्ह्यांत बहुजन क्रांती मूकमोर्चा काढण्यात आला, पण नगर जिल्ह्यातील मोर्चात मात्र भाषणांसह घोषणा देण्याचा निर्णय संयोजन समितीने घेतला होता. त्यामुळे पोलिसांवरील ताण वाढला होता. शहरातील वाडिया पार्क येथे सकाळी दहानंतर मोर्चेकरी जमण्यास सुरुवात झाली. सकाळी १० वाजेपर्यंत वाडिया पार्क रिकामेच होते, परंतु ११ नंतर मोर्चकऱ्यांनी वाडिया पार्क मैदानावर मोठी गर्दी केली होती.

बातम्या आणखी आहेत...