आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्क्रिय सरकारला जागा दाखवून देण्यासाठी संघटित व्हा : नांदगावकर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - सरकारच्या निष्क्रियतेमुळेच राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली आहे, पण सरकारला त्याचे सोयरसूतक नाही. सरकारला त्याची जागा दाखवून देण्यासाठी आपले संघटन बळकट करा. जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र मनसेला घडवायचा आहे. तो घडवणारे शिल्पकार व्हा, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गटनेते आमदार बाळा नांदगावकर यांनी शुक्रवारी केले.

माऊली सभागृहात आयोजित मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवाजी नलावडे, संपर्कप्रमुख सुनील बांबूळकर, संतोष धुरी, जिल्हा संघटक सचिन डफळ, जिल्हाध्यक्ष कैलास गिरवले, सचिन पोटरे, नगरसेवक गणेश भोसले, किशोर डागवाले, जिल्हाध्यक्ष अँड. अनिता दिघे, संध्या थोरात आदी उपस्थित होते.

नांदगावकर म्हणाले, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, जालना, नगर सर्वत्र दुष्काळाची भीषण स्थिती आहे. सरकारने जनावरांच्या छावण्याही नात्यागोत्यांत वाटल्या. मे महिना उजाडेपर्यंत दुष्काळ जाहीर केला नाही. नगर जिल्ह्याचे पाणी औरंगाबादला पळवले. अन्याय करणार्‍या या सरकारविरुद्ध पेटून उठायला हवे.

राज्यातील साडेअकरा कोटी जनतेला राज ठाकरे प्रामाणिक वाटतात. तुम्ही निदान शेजार्‍यांना तरी वाटायला हवे. उत्तम काम करणार्‍याला आपोआप संधी मिळते. पक्षाशी प्रामाणिक रहा व नव्याने येणार्‍यांना सामावून घ्या, असे सांगत पक्षात महिलांना ताकद देण्याचे आवाहन त्यांनी केले.

नलावडे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकारच्या घोटाळ्यांचा पाढा वाचला. माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील अध्यक्ष असलेल्या कारखान्याकडे कोट्यवधींची थकबाकी असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.