आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाळासाहेब नाहाटांचा स्वगृही येण्याचा मुहूर्त हुकला ; पालकमंत्री पाचपुते अचानक गेले दिल्लीला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काँग्रेसचा त्याग करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृत प्रवेश करण्याचा श्रीगोंदा बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहाटा यांचा पक्षांतर सोहळा रविवारी (ता. 8) अचानक रद्द झाला. स्वगृही परतण्याचा त्यांचा मुहूर्त पुन्हा ‘हुकल्याने’ त्याची राजकीय वतरुळात जोरदार चर्चा होत आहे.
नाहाटा यांनी मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान पालकमंत्री बबनराव पाचपुते यांच्याविरुद्ध बंड पुकारून राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकला. त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करून भानगाव गणातून पंचायत समितीची जागा जिंकली. पंचायत समितीत काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर सभापती व उपसभापतिपदाच्या निवडणुकीत नाहाटांना काँग्रेस र्शेष्ठींकडून डावलण्यात आले. काँग्रेसमध्ये मन रमत नाही व त्यात पक्षाने उपेक्षा सुरू केल्याने नाहाटांनी स्वगृहांची वाट निवडली. काँग्रेसला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची घोषणा त्यांनी महिन्यापूर्वी काष्टी येथे केली. त्यासाठी त्यांना मुहूर्त मात्र सापडत नव्हता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बिनशर्त प्रवेश करीत असल्याचे त्यांनी सुरुवातीस सांगितले असले, तरी त्यांच्या पक्ष प्रवेशाला अनेक अडथळे येत असल्याचे महिनाभरातील हालचालींवरून उघड झाले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांची विधान सभेसाठीची अपक्ष उमेदवारी हे नाहाटा यांनी पाचपुतेंशी बंड पुकारण्याचे मुख्य कारण होते. शेलार आधी बाहेर पडले. त्या पाठोपाठ नाहाटांनी राष्ट्रवादी पक्ष सोडला. आता नाहाटा स्वगृही परतत असताना शेलार मात्र काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत.शेलारांमुळे तालुक्यातील ओबीसी वर्गात नाहाटांना मोठा जनाधार होता. शेलार काँग्रेसमध्ये रमल्याने नाहाटा-शेलार यांची ताटातूट होणार व त्याचा फटका नाहाटांनाच बसण्याची चिन्हे आहेत. लोणीव्यंकनाथ ही नाहाटांची जन्म व कर्मभूमी. तेथे स्थानिक पातळीवर मोठा राजकीय संघर्ष होत असे. त्यात गावाने अनेकदा नाहाटांना तारून नेले. स्वगृही परतण्याच्या निर्णयाने त्यांच्या गावात निकटवर्तीयांची चांगलीच संभ्रमावस्था झाली आहे. तुमच्यासाठी आम्ही ज्यांच्या लाठय़ा खाल्ल्या. दगड झेलले. डोकी फोडून घेतली. पुन्हा अशा लोकांबरोबर कसे काय राजकारण करायचे, असा सवाल गावातून नाहाटांना विचारला जात आहे.
नाहाटा जरी राष्ट्रवादीत परतले तरी त्यांच्यासोबत किती जण स्वगृही माघारी येतात, याकडे पालकमंत्री पाचपुते गटाचे लक्ष आहे. सेनापतीला जवळ घेताना सैन्य देखील सोबत यायला हवे, हा पाचपुते गटाचा आग्रह आहे. नाहाटा यांची नेमकी इथेच अडचण आहे.
श्रीगोंदे येथे होणारा समारंभच पालकमंत्री अचानक दिल्लीला गेल्याने रद्द झाला. आता पुन्हा तो मुहूर्त कधी साधणार, याबद्दल तालुकाभर चर्चा होत आहे.