आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thorat Comment On Nagar Drought Condition

मागणीनंतर दोन दिवसांत पाणी टँकर उपलब्ध करा - बाळासाहेब थोरात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगमनेर - पावसाने पाठ फिरवल्याने निर्माण झालेला दुष्काळ हे राज्यासह तालुक्यावर आलेले संकट आहे. पावसाने सर्वांचेच अंदाज चुकवले असले, तरी गेल्या दोन दिवसांपासून पावसाची आशा वाढली. पाण्याचे स्रोत आटल्याने पाण्याचे संकट समोर असल्याने मागणी येताच दोन दिवसांत टँकर उपलब्ध करून देण्याचे आदेश महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी प्रशासनाला दिले.

संगमनेरमध्ये थोरात यांच्या उपस्थितीत टंचाई आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. पंचायत समितीचे उपसभापती बाळासाहेब गायकवाड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर, बाजार समितीचे सभापती अनिल देशमुख, काँग्रेसचे तालुकाप्रमुख बाबा ओहोळ, प्रांताधिकारी संदीप निचित आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

विविध गावांतील सरपंच, उपसरपंचांनी गावागावांत निर्माण झालेल्या पाणीटंचाईसंदर्भात मंत्री थोरात यांच्याकडे तक्रारी केल्या. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर बनत असल्याचे त्यांनी थोरात यांच्या निदर्शनास आणून दिले. तक्रारीनंतर संबंधित विभागाच्या अधिका-यात समन्वय नसल्याचे समोर आले. थोरात यांनी संबंधितांची कानउघाडणी करत दुष्काळाचा एकत्रित समर्थपणे मुकाबला करण्याचे आवाहन केले. मागणी येताच तातडीने संबंधित गावात, वाडीवस्तीवर पाण्याचे टँकर पोहोचले पाहिजे. दुष्काळाची समस्या गंभीरपणे घ्या. स्त्रोत कमी होत असल्याने आहे त्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

गटविकास अधिकारी भुपेंद्र बेडसे, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, महावितरणचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गोसावी, माजी सभापती अविनाश सोनवणे, सुरेश थोरात आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्रांताधिकारी संदीप निचित यांनी केले.

सध्याची टंचाईची स्थिती
टंचाई आढावा बैठकीत अधिका-यांनी तालुक्यातील टंचाईच्या स्थितीबाबत माहिती दिली. सध्या तालुक्यात 42 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. हे टँकर दररोज 126 पाण्याच्या खेपा त्यांना नेमून दिलेल्या गावात, वाडी-वस्तीवर टाकत आहेत. याशिवाय ज्या भागात तातडीने प्रशासनाचा टँकर पाणी घेऊन पोहोचू शकत नाही, त्या ठिकाणी राजहंस दूध संघाच्या टँकरद्वारे पाणी दिले जाते. गेल्या वर्षी प्रशासन दुष्काळ निवारणासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत असताना अमृत उद्योग समूहातील सुमारे 500 कर्मचारी या यंत्रणेत काम करत होते.

फोटो - संगमनेरमध्ये टंचाई आढावा बैठकीत बोलताना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात. समवेत बाळासाहेब गायकवाड, बाजीराव खेमनर, अनिल देशमुख, बाबा ओहोळ, संदीप निचित.