आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Thorat News In Marathi, Revenue Minister, Hailstorm, Divya Marathi

शेतकर्‍यांना सक्षमपणे उभे करणार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्जत - गारपीट आणि झालेल्या अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीचे युद्धपातळीवर पंचनामे सुरू झाले आहेत. निवडणूक आचारसंहितेच्या निकषात केंद्र आणि राज्य शासन जास्तीत जास्त मदत देऊन शेतकर्‍यांना सक्षमपणे उभे करेल, अशी ग्वाही महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी दिली. ‘दिव्य मराठी’ने मंगळवारच्या अंकात ‘काँग्रेसच्या मंत्र्यांना दक्षिणेचे वावडे’ हे वृत्त प्रकाशित केले होते. त्याची दखल घेत मंत्री थोरात यांनी लगेच कर्जत तालुक्यातील गारपीटग्रस्त भागाची पाहणी केली.

थोरात यांनी मिरजगाव येथील शहीद जवान राहुल मेहेत्रे यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. नंतर ढगेवस्ती (राशीन) येथे निवृत्ती गाडे यांच्या उद्ध्वस्त झालेल्या 13 एकरांवरील द्राक्षबागेची व पिंपळवाडी येथील भाऊसाहेब जंजिरे यांच्या डाळिंबाच्या बागेची त्यांनी पाहणी केली. या वेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम देशमुख, जिल्हा परिषद सदस्य परमवीर पांडुळे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, उपसभापती प्रा. किरण पाटील, राजेंद्र देशमुख, अँड. माणिकराव मोरे, संपत म्हस्के, प्रकाश सुपेकर, सतीश पाटील, एकनाथ गांगर्डे आदी उपस्थित होते.


तीन टप्प्यांत झालेल्या वादळी पाऊस व गारपिटीमुळे बारडगाव दगडी, पिंपळवाडी, कोपर्डी, कुळधरण, रुईगव्हाण, नांदगाव, चखालेवाडी, टाकळी खंडेश्वरी, माहीजळगाव, पाटेवाडी, पाटेगाव या गावांत डाळिंब, पपई, कलिंगड, कांदा, हरभरा, ऊस, गहू या पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना थोरात म्हणाले, गारपीट झाल्यामुळे शेतकरी कोलमडला आहे. त्याला उभे करणे गरजेचे आहे. आचारसंहितेमुळे आश्वासन देणे, घोषणा करणे चुकीचे ठरेल. परंतु केंद्र आणि राज्य शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचा प्रयत्न राहील.
दौर्‍याचा शेवट मिरजगाव येथे झाला. या वेळी पंचायत समिती सदस्य डॉ. पंढरीनाथ गोरे आणि जि. प. सदस्य पांडुळे यांनी परिसरातील प्रश्‍न मांडत कुकडीचे पाणी कायमस्वरूपी देण्याची मागणी केली. आचारसंहिता संपल्यावर संबंधित विभागांची बैठक घेऊन प्रश्न कसा मार्गी लागेल याचा प्रयत्न करू, असे थोरात यांनी सांगितले.