आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जावई की भाचा ? महसूल मंत्र्यांपुढे पेच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर - जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी साकूर गट प्रतिष्ठेचा ठरला आहे. या गटातून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे जावई रणजित देशमुख व भाचे सत्यजित तांबे यांनी उमेदवारी मागितली असून पक्षश्रेष्ठींसमोर या सर्वांनी साकूर गटातून उमेदवारी मिळावी, अशी भूमिका पक्षनिरीक्षकांसमोर मांडली आहे. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्यापुढे जावई की भाचा असा पेच पडला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून संपूर्ण तालुक्यात गट व गणातून विविध पक्षांच्या उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवार प्रयत्न करीत आहेत. आठ गट व सोळा गणांत उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: पक्षश्रेष्ठींसमोर आपली भूमिका मांडून उमेदवारी मिळावी, असा आग्रह धरला आहे. तालुक्यात आठ गणांपैकी सात गण महिला राखीव झाल्याने एकमेव सर्वसाधारण साकूर गटाकडे सर्वांनी मोर्चा वळवला आहे. यामुळे आता युवा गटातून उमेदवारीसाठी रस्सीखेच होत आहे. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी यासाठी संगमनेर दूध संघाचे संचालक रणजित देशमुख, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे, शेतकी संघाचे अध्यक्ष शिवाजीराव थोरात यांचे चिरंजीव विनायक थोरात तसेच पांडुरंग सागर, भास्करराव भोसले अशा सहा जणांनी साकूर गटातून उमेदवारी मागितली आहे. पक्षनिरीक्षकांनी इच्छुकांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या. यावेळी साकूर गटातून दिग्गजांनी उमेदवारीसाठी शक्तिप्रदर्शन केले. देशमुख, तांबे याबरोबरच आता थोरातांनीही उमेदवारी मागे घेतल्याने पक्षश्रेष्ठींसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. साकूर हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून अनेकांनी मोर्चेबांधणीस प्रारंभ केला आहे. तालुक्याचा एकूण विचार करता साकूर गटाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बाजीराव खेमनर तसेच अशोकराव मोरे यांची भूमिकाही महत्त्वाची असणार आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे कुणाच्या नावावर सहमती दर्शवतात हे येत्या चार दिवसांत स्पष्ट होणार असले तरी जावई व भाचा या दोघांनी एकाच गटातून उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे या दोघांपैकी उमेदवारी कुणाला द्यायची असा पेच थोरात यांच्यासमोर आहे. आता पक्षश्रेष्ठींनाच याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे. यातच विनायक थोरात यांनी उडी घेतल्याने या जागेबाबत आता सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. सहा इच्छुकांनी उमेदवारी मागितल्याने एकाचे नाव निश्चित करणे अवघडच होणार आहे. साकूर गणातून काँग्रेसकडून एकमेव भास्करराव भोसले यांनी, तर अंभोरे गणातून भीमाबाई घुगे, शीला खेमनर, विजया जाधव व शांताबाई घुगे अशा चार जणांनी उमेदवारी मागितली आहे. साकूर गट सध्या चर्चेचा विषय झाला असून राष्ट्रवादीनेही या ठिकाणी आपला तुल्यबळ उमेदवार देण्याचा निर्णय घेतला असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली. निवडणुकीच्या वातावरणाचा परिणाम इच्छुकांवर होत असून बंडखोरीचा धोका अधिक आहे.