आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Vikhe News In Marathi, Congress, Lok Sabha Election, Wakchaure

ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे काँग्रेसकडूनच अडगळीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री बाळासाहेब विखे या वेळच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून आतापर्यंत तरी अलिप्त आहेत. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्षप्रवेशासाठी आयोजित श्रीरामपूरचा कार्यक्रम वगळता ते इतर कोणत्याही प्रचारसभांकडे फिरकले नाहीत. दोन्ही मतदारसंघांत त्यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते. मात्र, काँग्रेसनेच त्यांना त्यांच्याकडे दुर्लक्ष करत अडगळीत टाकल्याचे चित्र आहे. त्यामुळेच जिल्ह्यासोबतच राज्यातील महत्त्वाच्या प्रचारसभांमध्येही त्यांची हजेरी लागलेली नाही.


विखे यांचा शिर्डी व नगर लोकसभा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क असल्याचे मानले जाते. दोन्ही मतदारसंघांतून निवडून येत ते संसदेत गेले होते. पक्षासोबतच त्यांची स्वत:ची स्वतंत्र यंत्रणा दोन्ही मतदारसंघांत कार्यरत आहे. जिल्हा विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी ही यंत्रणा उभारली. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही यंत्रणा कामाला लागते. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या दक्षिण भागात दुष्काळी भागाची पाहणी करत त्यांनी चर्चा घडवून आणली होती. त्यांच्या स्नुषा व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी विखे यांना नगर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवारी द्यायची व यासाठी राष्ट्रवादीसोबत जागांची अदलाबदल करायची, असा फार्म्युला ठरल्याची चर्चा होती. मात्र, त्यापैकी काहीही घडले नाही.


विखे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यातील शीतयुद्ध सर्वश्रूत आहे. मुळा-प्रवरा वीज संस्थेच्या विलीनीकरणातून कृषिमंत्री राधाकृष्ण विखे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात जाहीर चिखलफेक झाली होती. मात्र, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतदारांसमोर एकत्रितपणे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार एकीचे दर्शन घडवत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या संयुक्त प्रचारसभा 21 ते 25 मार्चदरम्यान घेण्यात आल्या. मात्र, या प्रचारसभांकडे विखे यांनी पाठ फिरवली. वाकचौरे यांच्या प्रवेशासाठी श्रीरामपूर येथे आयोजित मेळाव्याचा अपवाद वगळता विखे कोणत्याही प्रचारसभेला उपस्थित राहिले नाहीत. राहाता येथे झालेल्या सभेकडेही त्यांनी पाठ फिरवली.


मुख्यमंत्री बदलाच्या प्रत्येक वेळी त्यांचे नाव चर्चेत येते. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत पक्षाने विखे यांच्याकडे कोणतीही जबाबदारी दिली नसल्याचे चित्र आहे. वाकचौरे काँग्रेसचे नव्हे, तर विखे यांचेच उमेदवार आहेत, असा प्रचार सध्या विरोधकांकडून सुरू आहे. या प्रचाराला प्रत्युत्तर देण्यासाठीही त्यांनी अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. गेल्यावेळच्या लोकसभा निवडणुकीत आटोकाट प्रयत्न करूनही त्यांनी आघाडीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांना ताकद देण्याचे टाळले होते, तर रामदास आठवले यांनीही त्यांच्या पराभवाला विखेच जबाबदार असल्याचा आरोप केला होता. विखे हे यावेळच्या प्रचारापासून आतापर्यंत, तरी अलिप्त असल्याने यावेळी त्यांची साथ कोणाला मिळते, याबाबत संभ्रम आहे.


गारपीटग्रस्तांच्या भेटीकडे दुर्लक्ष
गेल्यावर्षी दुष्काळी भागाच्या पाहणीच्या निमित्त विखे यांनी जिल्ह्याचा दक्षिण भाग पिंजून काढला होता. या दौर्‍यात त्यांनी सत्ताधार्‍यांना शाब्दिक टोलेही लगावले होते. मात्र, ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत गारपिटीने व्याकूळ झालेल्या याच भागातील शेतकर्‍यांची भेट घेण्याची तसदी त्यांनी टाळली. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

बी. जी. कोळसे यांच्या उमेदवारी मागेही विखे?
नगर लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसेंच्या उमेदवारीमागे बाळासाहेब विखे असल्याची चर्चा आहे. तिसर्‍या आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे. कोळसे यांच्या उमेदवारीचा महायुतीचे उमेदवार दिलीप गांधींऐवजीराष्ट्रवादीचे राजीव राजळे यांनाच सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे.