आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Balasaheb Vikhe News In Marathi, Congress, Madhukar Pichad, NCP, Nagar

बाळासाहेब विखे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा गोंधळ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकोले - माजी खासदार बाळासाहेब विखे यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या अकोले तालुका काँग्रेसच्या बैठकीत राष्ट्रवादीचे मंत्री मधुकर पिचड यांच्या निवडणुकीतील कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. विखे यांनी नंतर कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांची कानउघाडणीही केली.
महालक्ष्मी मंगल कार्यालयात दुपारी 12 वाजता बैठक सुरू झाली. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते प्रा. श्रीकांत बेडेकर, संभाजी अरगडे, वसंत देशमुख, अशोक भांगरे, सोन्याबापू वाकचौरे, गुलाब शेवाळे, मुरलीधर जोरकर, पाटीलबा सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
विखे सर्मथक असलेले जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे प्रास्ताविकात म्हणाले, वरिष्ठ पातळीवर राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होत राहिल्याने आम्हाला नेहमीच त्रास झाला. राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांची अवहेलना व मानहानी केली जाते. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यासोबत प्रचारयंत्रणेत सहभागी न होता तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस कार्यकर्ते प्रचारात सक्रिय सहभाग घेणार नाहीत. मात्र, काँग्रेसच्या उमेदवारालाच आम्ही मदत करू. कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून भांगरे यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
मात्र, विखे यांनी भांगरे यांच्या भाषणात हस्तक्षेप करत काँग्रेसची राष्ट्रवादीशी केवळ अकोल्यापुरती आघाडी नाही, तर राज्यभर आहे असे सांगून कोणावरही टीका न करण्याचा सल्ला दिला. विधानसभेच्या निवडणुका असतील, तेव्हा स्थानिक विषय घेऊ. तुमची दु:खं मांडण्याची वेळ ही नाही. आम्हालाही खूप त्रास होतो. तो बाजूला ठेवून आम्ही काँग्रेससाठीच काम करत आहोत. जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी सर्वांना काम करायचे आहे, असे विखे यांनी खडसावल्याने भांगरे यांच्या भाषणाचा नूर बदलला. त्यांनी आक्रमकता सोडून भाषण आवरते घेतले.
नंतर भाऊसाहेब नाईकवाडी यांनी उमेदवार खासदार वाकचौरे यांचे गुणगाण गायले. त्यामुळे कार्यकर्ते उभे राहून आरडाओरड करू लागले. तेव्हा विखेंनी माइकचा ताबा घेतला. नाईकवाडी यांना आपले भाषण अर्धवट सोडत खाली बसणे भाग पाडले. विखे यांनी गोंधळ शांत करत कार्यकर्त्यांची कानउघाडणी केली.
आमच्याप्रमाणे आता त्यांनी चूक दुरुस्त केली
आम्हीही शिवसेनेत गेलो होतो, चूक लक्षात आल्यावर पुन्हा काँग्रेसमध्ये आलो. मागील वेळी भाऊसाहेब वाकचौरे यांना काँग्रेसचे तिकीट मिळू न शकल्याने ते शिवसेनेकडून लढले. जातीयवादी शक्तींना दूर ठेवण्यासाठी आता आमच्याप्रमाणेच त्यांनीही चूक दुरुस्त केली.’’ बाळासाहेब विखे, ज्येष्ठ नेते.
राग व्यक्त करण्याची ही वेळ नाही
राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडून काँग्रेस कार्यकर्त्यांची नेहमीच मानहानी केली जाते. मात्र, तो राग व्यक्त करण्याची ही वेळ नाही. आपल्या मित्रपक्षाचा नव्हे, तर आपल्या पक्षाचा उमेदवार उभा आहे. राष्ट्रवादीवर राग काढण्याच्या भानगडीत आपल्या पक्षाचे नुकसान होईल, असे कोणी वागू नये.’’ सोन्याबापू वाकचौरे, तालुकाध्यक्ष, अकोले.