आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंचन घाेटाळ्याची चाैकशी न्यायाधीशांमार्फत करा - बाळासाहेब विखे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिर्डी - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर नेहमीच घणाघाती टीका करणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी पुन्हा याच पक्षाला टार्गेट केले आहे. ‘पाटबंधारे विभागात झालेल्या ७० हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहारांची चौकशी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत करावी,’ अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विशेष म्हणजे या घाेटाळ्यात माजी जलसंपदामंत्री अजित पवार व सुनील तटकरे या राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे आहेत.

सिंचन विभागाच्या गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी समिती नियुक्त केल्याबद्दल विखेंनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत. ‘महाराष्ट्र एकेकाळी देशात सर्वाधिक सिंचनक्षेत्र असलेले राज्य हाेते. मात्र गेल्या दाेन दशकांत राज्याने हा लाैकिक गमावला आहे,’ असे नमूद करून विखेंनी पत्रात म्हटले आहे की, ‘या प्रकरणाची चाैकशी अजूनही प्रामाणिकपणे केलेली दिसत नाही.’

दबावाचा संशय
‘जलसंपदा विभागाने जल आराखड्यात अनेक प्रकल्प दाखविले नव्हते. ६४ प्रकल्पांचे काम प्रत्यक्षात सुरूही होऊ शकले नाही. ही वस्तुस्थिती असताना प्रकल्पाच्या ठेकेदारांना कोट्यवधी रुपये अॅडव्हान्स देण्यात आले. प्रकल्पांची निविदा प्रक्रियाही पारदर्शक नव्हती. तसेच ही कामे देताना अनियमितता झाल्याचे आरोप आहेत. या गैरव्यवहाराच्या चाैकशीसाठी नेमलेल्या समितीत अधिकारी आहेत. त्यांनी पूर्वी कधीतरी तत्कालीन मंत्र्यांच्या हाताखाली काम केले असल्याने त्यांच्यावर दबाव येणे शक्य आहे. त्यामुळे निवृत्त न्यायाधीशांमार्फत चाैकशी केल्यास ती पारदर्शी हाेईल,’ असे डाॅ. विखे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.