आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Balasaheb Vikhe Speech In Nagar On New Education Trend

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘कॉर्पोरेट’ व राजकारण्यांनी मांडला शिक्षणाचा बाजार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न ज्यांनी केला, अशांना आता ‘शिक्षणसम्राट’ म्हणून शिव्या घातल्या जातात, पण, ज्या कॉर्पोरेट संस्थांनी शिक्षण क्षेत्रात बाजार मांडला आहे, त्याकडे कोणाचेच लक्ष नाही. शिक्षणात लोकशाही जितकी सकारात्मक ठरली तितकी मारकही ठरली. या क्षेत्रात सामाजिक हस्तक्षेप वाढणे अपेक्षित असताना राजकीय हस्तक्षेपच दिवसेंदिवस वाढत आहे, अशी टीका ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांनी रविवारी केली.

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. मोहनराव हापसे यांनी शिक्षण क्षेत्रात दिलेल्या योगदानाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याकरिता आठरे पब्लिक स्कूल येथे अमृतमहोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विखे बोलत होते. माजी कुलगुरू डॉ. राम ताकवले यांच्या हस्ते डॉ. हापसे यांना मानपत्र व सरस्वतीची मूर्ती देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजी कदम, एमकेसीएलचे कार्यकारी संचालक विवेक सावंत, जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष माधवराव मुळे, महापौर शीला शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते.

विखे म्हणाले, अर्थव्यवस्था खुली करण्यात आली असली, तरी शिक्षण मात्र नियंत्रित करण्यात आले आहे. आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याचा निर्णय म्हणजे केवळ फसवणूक आहे. परीक्षा नसल्या, तर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कसे होणार असा सवाल उपस्थित करून परीक्षा नाही म्हणून विद्यार्थीही बिनधास्त झाले असल्याचे त्यांनी सांगितले. आता पुन्हा आठवीपर्यंत परीक्षा घेण्याबाबत फेरविचार सुरू आहे. सरकार असा शिवाशिवीचा खेळ का खेळते तेच कळत नाही. त्यामुळे शिक्षणाचे बाजारीकरण वाढले आहे. कौशल्यात्मक शिक्षण देण्यावर भर दिला पाहिजे, तरच उच्च शिक्षणावरील वाढत चाललेला ताण कमी होऊन दज्रेदार शिक्षण देणे शक्य होईल, असेही ते म्हणाले.

डॉ. हापसे यांनी खेड्यापर्यंत शिक्षण पोहोचवले, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दज्रेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला. पुणे विद्यापीठामध्ये शिस्त लावली व नवीन तंत्रज्ञान विकसित केले. त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय हेच त्यांच्या यशाचे गमक आहे, असेही विखे म्हणाले.

शिक्षणपद्धतीत बदल हवा
डॉ. राम ताकवले म्हणाले, सध्याच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे नितांत गरजेचे आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात घरबसल्या विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्याचा काळ आता दूर राहिलेला नाही, पण त्यामुळे शिक्षणाचे काय होणार याचा विचार करणे अतिशय आवश्यक आहे. डॉ. ताकवले व विवेक सावंत यांनी डॉ. हापसे यांच्यासोबत काम करताना आलेले अनुभव सांगितले. डॉ. हापसे यांच्या कन्या गिरिजा वाघ यांनीही आपल्या आठवणींना उजाळा दिला.