आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नगर - शहरातील नगरोत्थान योजनेच्या कामांसाठी सल्लागार संस्थेची (पीएमसी) नेमणूक करण्यासाठी सहाव्यांदा फेरनिविदा काढण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर आली आहे. फेरनिविदांच्या या चक्रव्यूहामुळे बालिकार्शम रस्त्यासह नगरोत्थानच्या कामांचा मुहूर्त पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे.
मनपाने नगरोत्थानअंतर्गत सुमारे 59 कोटींची कामे हाती घेतली आहेत. त्यामध्ये 17 कोटी खर्चाच्या बालिकार्शम रस्त्याचा समावेश असून त्यासाठी आर. आर. कपूर या ठेकेदार संस्थेची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार समितीची नेमणूक झाल्याशिवाय काम सुरू न करण्याचा ठराव स्थायी समितीने केला आहे. सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यासाठी प्रशासनाने आतापर्यंत पाच वेळा निविदा मागवल्या होत्या. पाचव्या वेळी आलेल्या दोन निविदांपैकी यश इंजिनिअरींग कन्सलटंटची नेमणूक करण्यात आली. मात्र, या संस्थेने नव्याने अटी घालून करार करण्यास टाळाटाळ केली. वेळोवेळी सांगूनही करारनाम्याची पूर्तता न केल्याने अखेर या संस्थेची निविदा रद्द करून पुन्हा निविदा मागवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बांधकाम विभागाने तसा प्रस्ताव तयार केला असून दोन दिवसांत फेरनिविदा मागवण्यात येणार आहेत. बालिकार्शम रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी सुरू करावे, या मागणीसाठी विरोधकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने आठ दिवसांत काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आमदार अनिल राठोड यांनीही प्रशासनाला धारेवर धरून तातडीने काम सुरू करण्याचे आदेश मनपाच्या आढावा बैठकीत दिले होते. मात्र, सल्लागार संस्थेची नेमणूक करण्यास प्रशासनाला अपयश आले.
पावसाळ्यात दैना
रुंदीकरणानंतर बालिकार्शम रस्त्यावरील राडा तसाच पडला आहे. आज ना उद्या काम सुरू होईल, अशी अपेक्षा नागरिकांना होती. मात्र, पावसाळा आला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने परिसरातील रहिवासी संतापले आहेत. पावसाळ्यात या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होणार आहे.
मनपाला टाळे ठोकण्याचा विरोधकांना विसर
पावसाळ्यापूर्वी बालिकार्शम रस्त्याचे काम सुरू करावे, या मागणीसाठी उपोषण करून महापालिकेला टाळे लावण्याचा इशारा देणार्या विरोधकांना या रस्त्याच्या कामाचा विसर पडला आहे. कामाच्या विलंबाबाबत प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी विरोधक गप्प का आहेत, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.