आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दारू कारखाने जगवणारे राज्य पुढे कसे नेणार?, बंडातात्या कराडकर यांचा सडेतोड प्रश्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवून दारूचे कारखाने जगवणारे महाराष्ट्राला पुढे कसे नेणार, असा सवाल वारकर्‍यांचे नेते बंडातात्या कराडकर यांनी केला.

देवळाली प्रवरा येथे श्री त्रिंबकराज स्वामी पायी दिंडी सोहळा तपपूर्ती सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहातील कीर्तन महोत्सवात कराडकर बोलत होते. विविध अभंगांच्या माध्यमातून अध्यात्म, राजकारण आणि दुष्काळ यावर विचार मांडतानाच राजकारण्यांना चिमटे घेत त्यांनी उपस्थितांना अंतर्मुख केले. कराडकर म्हणाले, पैशांमुळे माणसातले माणूसपण हरवले आहे. आजकालचे पुढारी धरणे, डांबर, खडी, मुरूम खातात आणि ते पचवतातही! स्वातंत्र्य संग्रामात ज्यांनी बलिदान दिले, त्यांचा कुणीही विचार करीत नाही. ते पैशांमागे धावले असते, तर आपण अजूनही परकियांचीच चाकरी करत राहिलो असतो. ते पुढे म्हणाले, आपल्याकडे दुष्काळाचेही राजकारण होत आहे. ‘हे विश्वची माझे घर’ असे विचार देणार्‍या संतांच्या भूमीत प्रादेशिक वाद उफाळून येत आहेत. नगर व नाशिकमधील दुष्काळाची तीव्रता लक्षात न घेता शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळवून तेच पाणी दारूच्या कारखान्यांसाठी जायकवाडी धरणात सोडले. दारू कारखाने जगवणारे महाराष्ट्राचा उद्धार कसा करणार, असा सवाल कराडकर यांनी केला.