आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी धोरणाविरुद्ध बँक कर्मचा-यांची निदर्शने, कर्जबुडव्यांविरुद्ध कडक कायद्याची मागणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करण्याचा घाट घालणा-या सरकारी धोरणाविरुद्ध बँक कर्मचारी व अधिका-यांनी शनिवारी (19 जुलै) निदर्शने केली. बँकांच्या राष्‍ट्रीयीकरणाला 45 वर्षे पूर्ण झाल्याचे निमित्त साधत हे आंदोलन करण्यात आले. चितळे रस्त्यावरील देना बँकेसमोर झालेल्या आंदोलनात बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 14 प्रमुख खासगी बँकांचे 19 जुलै 1969 रोजी राष्‍ट्रीयीकरण केले. त्यावेळी या सर्व बँकांच्या 8268 शाखा व 4646 कोटी रुपयांच्या ठेवी होत्या. गेल्या 45 वर्षांत शाखांची संख्या 1 लाख 8 हजारांवर पोहोचली आहे, तर ठेवी 80 लाख कोटींच्या वर गेल्या आहेत. कर्जवितरणही 3599 कोटींवरून 62 लाख कोटींवर पोहोचले आहे. जागतिकीकरणाच्या दबावाखाली रिझर्व्ह बँक व सरकार राष्‍ट्रीयीकृत बँकांचे खासगीकरण करण्याचा घाट घालत आहे. त्याचाच भाग म्हणून पी. जे. नायक समितीकडून बँकिंग क्षेत्राच्या पुनर्रचनेबाबत अहवाल घेण्यात आला. बँक कर्मचा-यांच्या संघटनांनी या धोरणाला सातत्याने विरोध दर्शवला. सर्व धोके लक्षात घेऊन नागरिकांनी या लढ्याला पाठिंबा देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कांतीलाल वर्मा, उल्हास देसाई, संजय देढे, नंदू जोशी यांनी मार्गदर्शन केले. शिवाजी पळसकर, प्रकाश जोशी, दत्ता जोग आदी निदर्शनात सहभागी झाले. आभार उमाकांत कुलकर्णी यांनी मानले.