आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकेच्या अधिकार्‍यांकडून लाभार्थ्याचा चेक गहाळ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी - आदिवासी विकास महामंडळाकडून एका आदिवासी विधवा महिलेला घरकुल मंजूर झाले. त्यासाठीचा अडीच लाख रुपयांचा मिळालेला चेक मात्र स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शहरातील शाखेच्या अधिकार्‍यांकडून गहाळ झाला. ही महिला दररोज बँकेत चकरा मारत असून दुसरा चेक मिळाल्यानंतर पैसे देऊ, असे बँकेचे अधिकारी सांगत आहेत. बँकेच्या गलथानपणामुळे आदिवासी महिलेला त्रास सहन करावा लागत आहे.

औरंगपूर (ता. पाथर्डी) येथील शशिकला बाबुराव माळी (60) या मुलगी व नातवासमवेत राहतात. कासार पिंपळगाव येथील एका तरुणाने आदिवासी विकास महामंडळाकडून घर मिळवून देण्यासाठी त्यांच्याकडून जागेचा सात-बारा व इतर कागदपत्रे घेतली. त्यानंतर या महिलेचे घरकुलाचे प्रकरण मंजूर झाले. त्यासाठी या महिलेला आदिवासी विकास महामंडळाने दोन लाख पन्नास हजार रुपयांचा चेक दिला. 291348 या क्रमांकाचा हा चेक देताना या अशिक्षित महिलेचे अनेक कागदपत्रांवर स्टेट बँकेच्या अधिकार्‍यांनी अंगठे घेतले. या महिलेचे स्टेट बँकेत खाते उघडून (खाते क्रमांक 32815253336) या खात्यात 2 एप्रिल 2013 रोजी हा चेक जमा करण्यासाठी देण्यात आला. दोन दिवसांत पैसे मिळतील असे अधिकार्‍यांनी महिलेला सांगितले. परंतु तीन महिन्यांपासून ही महिला स्टेट बँकेच्या शाखेत घरकुलाचे अडीच लाख रुपये मिळण्यासाठी चकरा मारत आहे. स्टेट बँकेतील अधिकार्‍यांच्या गलथानपणामुळे या महिलेचा चेक गहाळ झाला. गहाळ झालेल्या चेकच्या संदर्भातील पत्र या महिलेसोबत आलेल्या तरुणाकडे दिले असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. ही महिला या तरुणाकडे गेली असता त्यानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. बँकेतील अधिकारी महिलेला नाशिकला जाऊन दुसरा चेक आणा, असे सांगत आहेत. बँकेच्या गलथानपणामुळे ही महिला हवालदिल झाली आहे.