आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँका लुटणारी टोळी श्रीगोंद्यात गजाआड; आठ बँका लुटल्याची कबुली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- राज्याच्या विविध भागांतील आठ बँकांवर दरोडे टाकणारी टोळी श्रीगोंदे पोलिसांनी उघडकीस आणली. सहाजणांपैकी दोघे अटकेत आहेत. अन्य चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती कर्जतचे पोलिस उपअधीक्षक धीरज पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी दिली.
अजनूज (ता. श्रीगोंदे) येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकताना महेश जाधव व अविनाश याकूब काळे (दोघे जामखेड) यांना ग्रामस्थांनी पकडले होते. पोलिस चौकशीत त्यांनी अन्य चौघा दरोडेखोरांची माहिती दिली. या टोळीने आतापर्यंत राज्यातील आठ बँका लुटल्याचे तपासात निष्पन्न झाले. एका वर्षापासून ही टोळी कार्यरत होती. मांडवगण (ता. श्रीगोंदे) येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर दरोडा टाकून त्यांनी 13 लाख 60 हजार लांबवले होते. खेड (ता. कर्जत) येथील बँकेतील 26 लाख 22 हजार रुपयांवर डल्ला मारला होता. घुमरी (ता. कर्जत) येथील बँक लुटण्याचा त्यांचा प्रयत्न फसला होता. पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर इजदे येथील बँक लुटीत दीड लाख, तर माणिकदौंडी येथील बँक लुटीत तीन लाख तीस हजार रुपये दरोडेखोरांच्या हाती लागले. तुळजापूर (जि. उस्मानाबाद), येरमाळा, सातारा, लातूर, सोलापूर आदी ठिकाणीही त्यांनी बँकलुटीसह अन्य गुन्हे केले असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्कार्पिओ श्रीगोंदे येथील महेश शिंदे यांच्या मालकीची असल्याचे उघडकीस आले. ती जप्त करण्यात आली. 25 नोव्हेंबरला अटक केलेल्या आरोपींना सहा डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. आरोपींनी लुटीची रक्कम घर बांधण्यासाठी व प्लॉट घेण्यासाठी खर्च केली. अन्य चार आरोपींची नावे उघड करण्यास मात्र पोलिसांनी नकार दिला.