आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरातील ‘मूलभूत’च्या कामांना मिळेना मुहूर्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - मूलभूत सुविधांच्या सुमारे ४० कोटींच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या १४० कामांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. मूलभूतचा निधी ३१ ऑगस्टपर्यंत खर्च करणे बंधनकारक होते. परंतु तसे करता हा निधी खर्च करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी महापालिका प्रशासनाने शासनाकडे केली आहे. शासनाने अद्याप मुदतवाढ दिलेली नाही. त्यात एकूण कामांपैकी ७० ते ८० कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला असला, तरी ही कामे सुरू झाली नाहीत. त्यामुळे कामांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
तीन महापौर बदलले, तरी मूलभूत सुविधांच्या ४० कोटींच्या कामांचा तिढा सुटलेला नाही. तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांच्या कार्यकाळात मूलभूत सुविधांसाठी २० कोटींचा निधी मंजूर झाला होता. महापालिकेने तेवढाच हिस्सा देऊन ४० कोटींच्या १४० कामांचा प्रस्ताव तयार केला. मात्र, सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात ही कामे लांबणीवर पडली. या निधीतून शहरातील कामे प्रस्तावित केली आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. त्यात २५ लाखांपर्यंतच्या निविदांना आयुक्त दिलीप गावडे यांनी अधिकार कक्षेत, तर २५ लाखांपेक्षा अधिक रकमेच्या निविदांना स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानंतर प्रशासनाने ७० ते ८० कामांना कार्यारंभ आदेश दिला. सर्व कामांचा निधी ३१ ऑगस्टपर्यंत खर्च करणे बंधनकारक होते. परंतु मुदत संपूनही हा निधी खर्च झालेला नाही. प्रशासनाने शासनाकडे मुदतवाढ मागितली आहे. परंतु मुदतवाढ मिळाल्याने मूलभूतची कामे रखडली आहेत. शासनाकडून मुदतवाढ मिळाल्यानंतरच या कामांना गती मिळणार आहे.
निम्म्या कामांना कार्यारंभ आदेश नाही
मूलभूतच्या निधीवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये सुरुवातीपासूनच वाद झाले. या कामांची मलई लाटण्याची सत्ताधारी विरोधकांनी एकही संधी सोडली नाही. सर्व विघ्न पार करत मूलभूतच्या कामांची निविदा प्रक्रिया पार पडली, परंतु अद्याप कामे सुरू झालेली नाहीत. निम्म्या कामांना, तर अद्याप कार्यारंभ आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यात निधी खर्च करण्याची मुदत संपल्याने या कामांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

कार्यारंभ आदेश नसताना कामे सुरू
मूलभूतच्या कामांमध्ये कसा सावळा गोंधळ सुरू आहे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे एकीकडे ज्या कामांना कार्यारंभ आदेश देण्यात आला, ती कामे सुरू झालेली नाहीत, तर दुसरीकडे कार्यारंभ आदेश नसतानाही काही कामे सुरू करण्यात आली. सुरू झालेली कामे आठ-पंधरा दिवसांतच बंद करण्यात आली. त्यामुळे सुरू झालेले काम बंद का झाले? याबाबत नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...