आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यामध्ये आग नको, कपटामध्ये भाग नको, झाले गेले विसरून जा...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - आयुष्य म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन बिंदूंमधला प्रवास आहे. जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत. त्यामुळे त्याविषयी चिंता करत बसण्याऐवजी या दोन बिंदूमधलं जे आयुष्य आहे, ते गंभीर होऊन जगू नका. 'सिरीयस' होण्याऐवजी 'सिन्सिअर' व्हा, असा सल्ला "गप्पाष्टककार' डॉ. संजय उपाध्ये यांनी नगरकरांना दिला.

अनुनाद फाउंडेशनच्या वतीने माउली सभागृहात रविवारी रात्री आयोजित करण्यात आलेल्या "मन करा रे प्रसन्न' या कार्यक्रमात डॉ. उपाध्ये यांनी श्रोत्यांशी पावणेतीन तास हसतखेळत गप्पा मारत आनंदी जगण्याचा मूलमंत्र सांगितला. सध्या सामाजिक अस्वास्थ्य वाढलं आहे. तथापि, विनोद सांगून, निख्खळ हसून इतरांबरोबर आपणही आनंदी जगू शकतो, असं डॉ. उपाध्ये यांनी सांगितलं. दिवसाची सुरूवात कुटुंबीयांना, मित्रांना एखादा विनोद सांगून करा, उठल्या उठल्या स‌र्वप्रथम आपलंच तोंड आरशात पहा, बघा दिवस कसा छान जातो, असं ते म्हणाले. आपण अनेकदा वाकडं तोंड करून जगतो. इतरांचं कौतुक करण्याऐवजी चुका शोधत राहतो. एखाद्या गोष्टीचा त्रास होत असेल, तर त्याविषयी दुरावा आणता ती गोष्टच आपल्या जगण्याचा भाग बनवा. आवाज करणाऱ्या पंख्यामुळे झोप येत नसेल, तर कुरकूर करता त्या आवाजात आपला आवाज मिसळून गाणं म्हणा, बघा कशी पटकन झोप लागते, असा सल्ला डॉ. उपाध्ये यांनी दिला.

घरातील ज्येष्ठांचा मान-सन्मान करा, त्याचं मन दुखावता त्यांचं अनुभवसंपन्न म्हणणं ऐका, असं सांगताना डॉ. उपाध्ये म्हणाले, हल्लीच्या शिक्षणामुळे घरातील दोन पिढ्यांमध्ये अंतर पडू लागलं आहे. खरंतर शिक्षणामुळं मनं अधिक व्यापक, संस्कृत व्हायला हवीत. कारचं नवं मॉडेल कमी आवाज करणारं असतं. आपलं मात्र उलटं होत चाललं आहे. नवी पिढी अधिक आवाज करणारी, लवकर तापणारी आहे, अशी मिश्किल टिपण्णी डॉ. उपाध्ये यांनी केली.
रोज सकाळी आपल्या घरी येणाऱ्या वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावर वैतागवाण्या बातम्या नकोत. दिवसाची सुरूवात छान होण्यासाठी पहिल्या पानावर चांगल्या बातम्या छापा. मारामाऱ्या, खून अशा बातम्या आतल्या पानातही छापता येतील, असं सांगत डॉ. उपाध्ये यांनी समाजाचं चांगलं होण्यात प्रसारमाध्यमांची जबाबदारी मोठी असते, असं स्पष्ट केलं.
भोजनाचा आनंद आपण नेहमी घेतो, आनंदाचं भोजन घ्यायला शिका, असं सांगत डॉ. उपाध्ये यांनी या कार्यक्रमाची सांगता 'गम-मत कर' हा सुखी जीवनाचा मंत्र देणाऱ्या 'डोळ्यामध्ये आग नको, कपटामध्ये भाग नको...' या कवितेनं केली.

प्रेक्षकांना विनाकारण भुर्दंड
सावेडीतीलमाउली सभागृहात येणाऱ्या प्रेक्षकांना मागील महिन्यापासून वाहने लावण्यासाठी दहा रूपये मोजावे लागत आहेत. शिवाय छापील पावती देता कागदावर साधा शिक्का मारलेला असते. त्यावर पावती क्रमांक, तारीख वाहनाचा क्रमांकही नसतो. हे पैसे अधिकृतपणे घेतले जातात का, याविषयी त्यामुळे शंका निर्माण झाली आहे. कार्यक्रमासाठी आकारल्या जाणाऱ्या सभागृहाच्या भाड्यातच वाहनतळाचे भाडे समाविष्ट असताना प्रेक्षकांकडून हे वेगळे पैसे घेण्याचे कारणच नाही, अशी प्रतिक्रिया अनेक प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केली.

महिलांसाठी कुस्ती प्रशिक्षण केंद्र
यावर्षीचे अनुनाद गौरव पुरस्कार ज्येष्ठ शिक्षक प्रा. मकरंद खेर, आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू अंजली देवकर-वल्लाकटी पत्रकार श्रीराम जोशी यांना उपाध्ये यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी बोलताना अंजली यांनी महिला कुस्तीपटूंसाठी नगरमध्ये राष्ट्रीय पातळीवरील प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली. मला स्वत:ला ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवता आले नाही, पण माझ्या विद्यार्थिनी हे स्वप्न साकार करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अनुनादचे तन्मय देवचके यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीणा दिघे यांनी केले.
बातम्या आणखी आहेत...