आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कापरेवाडी येथील महिला सरपंचासह तिघांना मारहाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत - ‘सरपंचपदाचा राजीनामा दे, अन्यथा तुझे हातपाय तोडू’, असे म्हणत काठी व दगडाने कापरेवाडी येथील सरपंच मंदाबाई वांगडे व त्यांचे पती राजेंद्र यांच्यासह तिघांना मारहाण करण्यात आली. ही घटना कापरेवाडी (ता. कर्जत) येथे शनिवारी (24 मे) सकाळी अकरा वाजता घडली.
कर्जत पोलिस ठाण्यात रविवारी सरपंच वांगडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, सरपंच वांगडे या शनिवारी ग्रामपंचायत कार्यालयात कामकाज पाहत होत्या. त्या वेळी अप्पा हरिभाऊ गायकवाड, अशोक एकनाथ गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य रंजना अप्पा गायकवाड यांच्यासह सहा जणांनी ‘तुला वारंवार सांगितले, तरी सरपंचपदाचा राजीनामा देत नाही. आम्हाला तुला पदावर राहू द्यायचे नाही. तू सरपंचपदाचा राजीनामा दिला नाही तर आम्ही तुझे हातपाय तोडू,’ अशी धमकी दिली. त्यानंतर सात जणांनी काठ्यांनी दगडाने सरपंच वांगडे यांना मारहाण केली. त्यांचे पती राजेंद्र वांगडे तेथे आले असता त्यांनाही मारहाण केली गेली. भांडण सोडवण्यासाठी संतोष गायकवाड आले असता त्यांनाही मारहाण करण्यात आली. यापूर्वीही गावात विकासकामे करीत असताना सर्वांनी जाणीवपूर्वक अडथळा आणून त्रास दिला आहे, असे वांगडे यांनी तक्रारीत म्हटले आहे. मारहाणीत सरपंच वांगडे व त्यांचे पती संतोष जखमी झाले असून त्यांना नगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी अप्पा गायकवाड, अशोक गायकवाड, दत्तात्रेय हरिभाऊ गायकवाड, बापू यशवंत कापरे, सागर अप्पा गायकवाड व ग्रामपंचायत सदस्य रंजना गायकवाड यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सर्व बाजूने तपास करून कार्यवाही करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण यांनी सांगितले.