आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाक्यावर परराज्यातील ट्रकचालकाला मारहाण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगर-दौंड रस्त्यावरील पारगमन नाक्यावर रविवारी सायंकाळी परराज्यातील एका ट्रकचालकाला बेदम मारहाण करण्यात आली. जास्तीचे पैसे न दिल्याने नाकाचालकांनी ही मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे तालुकाप्रमुख संदेश कार्ले यांनी रास्ता रोको करून नाक्याची तोडफोड केली. त्यामुळे वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर एका तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.

महापालिका हद्दीतील पारगमन नाक्यांवर होणार्‍या परराज्यातील ट्रकचालकांच्या पिळवणुकीबाबत ‘दिव्य मराठी’ने वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून ट्रकचालकांची पिळवणूक काही प्रमाणात थांबली होती. मात्र, रविवारी दिल्लीकडे निघालेला हरियाणा येथील ट्रकचालक संजयकुमार यांना दौंड नाक्यावरील कर्मचार्‍यांनी बेदम मारहाण केली. त्यामुळे पारगमन नाक्यांवरील पठाणी वसुली पुन्हा सुरू झाल्याचे स्पष्ट झाले.

नाक्यावरील कर्मचार्‍यांनी संजयकुमारला दमदाटी करत पाचशे रुपयांची मागणी केली. त्यास नकार दिल्याने कर्मचार्‍यांनी त्याला मारहाण केली. त्यामुळे संतापलेल्या संजयकुमारने भर रस्त्यात ट्रक उभा केला. याप्रकरणाची माहिती शिवसेनेचे नगर तालुकाप्रमुख संदेश कार्ले यांना समजताच ते कार्यकर्त्यांसह घटनास्थळी दाखल झाले. आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करून नाक्याची तोडफोड केली. दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलारही घटनास्थळी आले. त्यांनी तालुका व कोतवाली पोलिसांना घटनेची माहिती दिली. दौंड नाका आमच्या हद्दीत नसल्याचे कारण पुढे करत दोन्ही ठाण्यांच्या पोलिसांनी तेथे येण्यास नकार दिला. त्यामुळे नगर-दौंड रस्त्यावरील वाहतूक तासभर ठप्प झाली होती.

दरम्यान, मारहाणीत जखमी झालेल्या संजयकुमारला कोतवाली पोलिसांनी सायंकाळी उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मारहाणप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री सुरू होती.

मनपाने पारगमन वसुलीचा ठेका 1 जानेवारीपासून ‘मॅक्स लिंक’ संस्थेला दिला आहे. औरंगाबाद, पुणे, दौंड, सोलापूर, मनमाड, कल्याण या महामार्गांवर पारगमन नाके आहेत. ठेकेदार संस्थेने प्रत्येक नाक्यावर चार ते पाच कर्मचार्‍यांची नेमणूक केली आहे. परंतु काही नाक्यांवरील कर्मचारी परराज्यांतील ट्रकचालकांना दमदाटी करून त्यांच्याकडून 60 व 100 ऐवजी 300 ते 400 रुपयांची वसुली करतात. याप्रकरणी ट्रकचालकांनी अनेकदा तक्रारी करूनही मनपा प्रशासनाने अद्याप काहीच कारवाई केलेली नाही.

अधिकारी फिरकले नाहीत
दौंड नाक्यावर ट्रकचालकाला मारहाण झाल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. रस्त्यावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली होती. तरीदेखील मनपाचा एकही जबाबदार अधिकारी घटनास्थळी फिरकला नाही. विशेष म्हणजे मारहाण झाली तेव्हा मनपाचा नाका पर्यवेक्षकदेखील जागेवर नव्हता.


पोलिस हप्ते घेतात
नाक्यांवर ट्रकचालकांना वारंवार मारहाण केली जाते, तरी महापालिका प्रशासन व पोलिस दखल घेत नाहीत. पोलिस हप्ते घेतात. एवढी मोठी घटना घडूनही पोलिस वेळेवर आले नाहीत. ट्रकचालकाची फिर्याद न घेता त्याला सिव्हिलमध्ये दाखल केले.’’ संदेश कार्ले, शिवसेना तालुकाप्रमुख


तोडफोडीचा पंचनामा
माहिती समजताच मी घटनास्थळी पोहोचलो. या वेळी नाका पर्यवेक्षक हजर होता, परंतु शिवसेनेच्या कार्यकर्त्यांपुढे त्याला काहीच करता आले नाही. तोडफोडीत सुमारे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तोडफोडीचा पंचनामा करण्यात आला आहे. पंचनाम्याचा अहवाल सोमवारी वरिष्ठांना सादर करण्यात येईल. ’’ नाना गोसावी, प्रभारी जकात अधीक्षक


पाचशे रुपये घेतले
पावणेपाचच्या सुमारास दौंड नाक्यावर आलो असता नाक्यावरील कर्मचार्‍यांनी 100 रुपयांची पारगमन पावती दिली. पैसे सुट्टे नसल्याने 500 रुपयांची नोट दिली. उरलेले पैसे परत मागितले असता कर्मचार्‍याने दमदाटी करत मारहाण सुरू केली. ’’ संजयकुमार, ट्रकचालक