आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिकस्थळे बनली लुटीची केंद्रे : शिर्डीमध्ये एजंटांकडून होते लूट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातीलकाही देवस्थानांत देशभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांची काही हॉटेल एजंट, तसेच पूजा साहित्य विक्रेत्यांकडून लूट सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील मोहटा गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पूजा साहित्य विक्री करणाऱ्या महिला रस्त्यावरच अडवतात, तर शिर्डीत हॉटेल पूजा साहित्य विक्रेत्यांचे एजंट भाविकांच्या वाहनांना अडवून आपल्याच दुकानाकडे जाण्याचा आग्रह धरतात. असाच प्रकार शनिशिंगणापुरात सुरू होता, परंतु मंदिर व्यवस्थापनाने या प्रकाराचा पायबंद घालण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

अहमदनगर जिल्हा देवस्थानाचा जिल्हा म्हणूनही ओळखला जातो, जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर, मोहटा आदी मोठी देवस्थाने आहेत. भाविक श्रद्धेपोटी या मंदिरात दर्शनासाठी गर्दी करत असतात. बाहेरगावावरून येणाऱ्या भाविकांना मंदिर परिसराची तेथील नियमांची फारशी माहिती नसते. याचाच फायदा घेऊन काही एजंट मंडळी भाविकांची लूट करतात. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधींनी मोहटा, शिर्डी शनिशिंगणापूर या देवस्थानमध्ये भाविकांची होत असलेल्या लुटीची वस्तुस्थिती मांडली, काही भाविकांशीही चर्चा केली असता या लुटीला भाविक त्रस्त झाल्याचे दिसून आले.

पाथर्डी तालुक्यातील मोहटादेवी मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. मंदिर परिसरात देवस्थान विकासांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मोहटा गडावर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मंदिर परिसरातील अतिक्रमण काढले असून गडाच्या पायथ्याशी पूजा साहित्य विक्रेत्यांचे स्टॉल आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहने महिला विक्रेत्यांकडून रस्त्यावर अडवली जातात. भाविक वाहन थांबवण्याच्या मन:स्थितीत नसताना विक्रेते रस्ताच अडवतात. अपघात टाळण्यासाठी वाहनाची गती कमी केल्यानंतर विक्रेत्यांकडून पूजा साहित्य खरेदीचा आग्रह धरला जातो.

भाविकांनी नकार दिल्यास त्याला काही विक्रेत्यांची अरेरावीही ऐकून घ्यावी लागते. या गंभीर प्रकाराकडे देवस्थान, पोलिसांकडूनही दुर्लक्ष केले जाते. बेकायदेशीरपणे रस्ता अडवणे हा गुन्हा असतानाही कारवाई होत नसल्याने हा प्रकार सर्रासपणे सुरू ठेवून भाविकांची लूट केली जाते.
नेवासे तालुक्यात सोनई गावापासून जवळच शनिशिंगणापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. वर्षभर देशभरातील हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात. शनिवारी शनिदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचीही संख्या मोठी असते. देवस्थानने भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पण दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना हॉटेल, तसेच पूजा साहित्य विक्रीचा धंदा वाढवण्यासाठी या परिसरात कार्यरत असलेल्या दलालांचा त्रास होता. परंतु, देवस्थान जागृत ग्रामस्थांनी या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद घातला आहे.

पुजेच्या साहित्य दराचेही फलक मंदिर व्यवस्थापनाने लावले आहेत. परंतु, अशा पद्धतीने लूट होत असेल, तर मंदिर व्यवस्थापन प्रसंगी पोलिसांचीही मदत घेणार आहे. त्यामुळे या ठिकाणचे भाविक समाधानी आहेत. मंदिर परिसरातील खासगी जागांमध्ये होणाऱ्या लुटीला पायबंद घालणे मात्र, अडचणीचे आहे.

तीन हजारांवर एजंट
शिर्डीत साडेतीन हजारांच्या वर पॉलिशवाले आहेत. शिर्डीची बदनामी काही पाॅलिशवाल्यांनी केलेला अतिरेक जबाबदार असल्याचा आरोप शिर्डी ग्रामस्थांमधून होत आहे. पाॅलिशवाल्यांवर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन दिले. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. अर्थात या पाॅलिशवाल्यांना काही प्रमाणात राजकीय वरदहस्त असल्याने पोलिसांना कारवाई करताना मोठ्या तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागते.

...तर परवानगी द्या
साईंच्यानगरीतीलपॉलिश व्यवसायात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा शिरकाव झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्नही निर्माण झाले आहेत. पॉलिशी व्यवसाय करणाऱ्या लोकांचे पोलिस व्हेरीफिकेशन करून हा व्यवसाय करण्यास परवानगी द्यावी. त्यासंबंधीची नियमावली बनवावी. बाहेरच्या लोकांना पॉलिशी व्यवसाय करण्यास निर्बंध घालावे.'' कैलास कोते, प्रथमनगराध्यक्ष, शिर्डी.

रस्ता अडवणे चुकीचे
देवाच्यादर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पूजा साहित्य विक्री करण्याला बंधन नाही. पण विक्रीसाठी वाहनांचा रस्ता अडवणे चुकीचे आहे. यासंदर्भात पुढाकार घेणार आहे. विक्रेत्यांची लवकरच बैठक लावून मार्ग काढण्याचा प्रयत्न करू.'' अनिल कराळे, उपजिल्हाप्रमुख (दक्षिण), शिवसेना.

शिंगणापुरात पायबंद
शनिशिंगणापूरमधील भाविकांची लूट होऊ नये, यासाठी आम्ही काळजी घेतो. ठिकठिकाणी पूजा साहित्याचे दरपत्रक लावले आहे. वाहने अडवून लुटीचा प्रयत्न होत असेल, तर भािवकांनी देवस्थानकडे तक्रार करावी. प्रसंगी पोलिसांचीही मदत घेऊ.'' शिवाजी दरंदले, अध्यक्ष,शनिशिंगणापूर देवस्थान.

या प्रकाराला आळा घालण्यासाठी प्रयत्न करू
मोहटामंदिराकडेयेणाऱ्या रस्त्यावर भाविकांची वाहने हार साहित्य विक्रीसाठी अडवली जातात. पण ते खासगी जागेत असल्याने अडचण आहे. परंतु, या मार्गावरही आता चार ते पाच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबत देवस्थानच्या अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्नशील आहोत. या प्रकाराला आळा घालण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येतील.'' बाबासाहेब दहिफळे, विश्वस्त,मोहटा देवस्थान.
श्रीक्षेत्र मोहटा देवी (ता. पाथर्डी) येथे भाविकांची वाहने अशाप्रकारे रस्त्यात अडवून हार, फुले घेण्याची सक्ती महिला, युवतींकडून करण्यात येते.
शिर्डीमध्ये एजंटांकडून होते लूट
श्रद्धा आणि सबुरीची शिकवण संपूर्ण जगाला देणाऱ्या साईंच्या शिर्डीत गेल्या अनेक वर्षांपासून पॉलिश व्यवसाय करणाऱ्या काही कमिशन एजंटांनी धुमाकूळ घातला आहे. भक्तांची लूट या कमिशन एजंटांकडून होत आहे.

शिर्डी शहरात भाविकांचा प्रवेश होताच त्यांना पॉलिशवाल्यांचा पहिला सामना करावा लागतो. पार्किंग, हॉटेल, हार प्रसाद घेण्यासाठी भक्ताला किंवा त्याच्या गाडीला या पॉलिशवाल्यांचा गराडा पडतो. सध्या शिर्डीतील हॉटेल व्यावसायिक आर्थिक मंदीच्या सावटाखाली आहे. आपली पॉलिशवाल्यांकडून फसवणूक होणार असल्याने भक्त हॉटेलऐवजी साई संस्थानच्या भक्त निवासात राहण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बँकांचे कर्ज घेऊन निर्माण झालेली शिर्डीतील हॉटेल इंडस्ट्री आजमितीला आर्थिक संकटाचा सामना करीत आहे.

शिर्डीतील या कमिशन एजंटांना अर्थात पाॅलिशवाल्यांना शिर्डी पोलिस स्टेशनचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक दिनकर पिंगळे यांनी भक्तसेवकांचा दर्जा देऊन त्यांचे व्हेरीफिकेशन करून ओळखपत्र दिले होते. शिर्डी पोलिसांनी व्हेरीफिकेशन केल्याने यात गुन्हेगारी प्रवृत्तीचे असणारे एजंट परागंदा झाले होते. मात्र, हे अधिकारी गेल्यानंतर त्याचे सातत्य पुढे राहिल्याने पुन्हा या एजंटांची संख्या चांगलीच फोफावली. यात स्थानिक कमी बाहेरगावचे अधिक असे चित्र निर्माण झाले. तासाभरात पाचशेपेक्षा अधिक पैसे विनाकष्ट मिळू लागल्याने गुन्हेगारीत वाढ झाली आहे. पाॅलिशचा धंदा करण्यासाठी शिर्डीत शंभर ते दीडशे किलोमीटर अंतराहून तरुण येत असतात.

शिर्डीत यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढू लागल्याने दोन वर्षांपूर्वी पोलिस प्रशासनाने पॉलिशी व्यवसाय करणाऱ्यांविरुद्ध मोहीम राबवली होती. त्यात जवळपास ५० टक्क्यांहून अधिक कमिशन एजंट बाहेरील गावचे आढळून आले. मात्र, त्यांच्यावर जुजबी कारवाई करण्यात आल्याने ही मोहीम केवळ फार्स ठरली. शिर्डीत पॉलिशी व्यवसाय करणाऱ्यांचा तसा जुना इतिहास आहे. जोपर्यंत पॉलिशवाल्यांत स्थानिक होते, तोपर्यंत त्यांचा गाईड म्हणून वापर केला जात होता. प्रामाणिक असल्याने भक्तांचाही त्यांच्यावर विश्वास होता. मात्र, आता बाहेर गावाहून आलेल्या या व्यवसायातील लोकांमुळे हा व्यवसाय बदनाम होत असल्याची भावना प्रामाणिक पॉलिशी व्यवसाय करणारे बोलून दाखवतात.

दिवसेंदिवस भाविकांची गर्दी रोडावत चालल्याने शिर्डीकरांनी याबाबत आत्मपरीक्षण करून या विरोधात राजकारण बाजूला ठेवून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. पोलिस प्रशासनाने नगर पंचायत प्रशासनाने या लोकांचे पोलिस व्हेरीफिकेशन करून घेऊन त्यांना ओळखपत्र दिले, तर या व्यवसायाबाबत विश्वासाचे वातावरण निर्माण होईल, असा सूर शिर्डी ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. मात्र, त्याकडे लक्ष द्यायला ना प्रशासनाला ना नगर पंचायत प्रशासनाला वेळ नाही.
बातम्या आणखी आहेत...