आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगडावरील ‘कोलांट उडी’ पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना जड जाणार?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी आपली सर्व ताकद लावून लाखोंची गर्दी जमवून अखेर भगवानगड जिंकलाच. लाखोंची गर्दी जमवून एक प्रकारे गडाचा उपस्थितांचा आशीर्वादही मिळवला. गडाच्या खाली झालेल्या सभेत बहुसंख्य वंजारी समाजाबरोबरच धनगर, माळी मुस्लिम समाजाचे लोकही उपस्थित होते. यावरून राज्यात आपण ताकदवर जनतेचा मोठा पाठिंबा असलेले नेतृत्व असल्याचेेही त्यांनी सिद्ध करून सरकारमध्ये दबदबाही निर्माण केला. या मेळाव्यात उपस्थित असलेल्या राजकीय नेत्यांनी विशेषत: मंत्र्यांनी जी भाषणे केली, त्याने उपस्थितांची मोठी करमणूक झाली. लाखोंचा जनसमुदाय पाहून सर्वांचे भान सुटल्याची स्थिती होती. आपण स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कसे किती जवळ होतो, हे सांगण्याची स्पर्धाच सर्वांत लागली होती. त्यात सर्वांत धक्कादायक विधाने असलेले भाषण पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांचे होते. आपल्या भाषणात त्यांनी कॅबिनेट मंत्रिपद पंकजा यांनी मिळवून दिले, असे जाहीर केले. वास्तविक पाहता त्यांना हे पद मुख्यमंत्र्यांकडून मिळाले होते. आतापर्यंत ते स्वत: मुख्यमंत्र्यांच्या जवळचे म्हणवून घेत होते. आपल्या मंत्रिपदाचे श्रेय त्यांनी अचानक पंकजा यांना दिले. त्यांच्या कोलांट उडीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. हे प्रकरण त्यांना जड जाण्याची चिन्हे अाहेत.
विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात ज्यांना मंत्रिपदे मिळाली, त्यांत शिंदे यांचा समावेश होता. त्यावेळी शिंदे यांना गृह, आरोग्य, पर्यटन या खात्यांचे राज्यमंत्रिपद मिळाले. त्यावेळी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे मानले जात होते. जानकर यांना कॅबिनेट मंत्रिपद देताना, त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी धनगर समाजातील शिंदे यांनाही फडणवीस यांनी कॅबिनेटपदी बढती दिली. त्यावेळी शिंदे यांना पंकजांकडील जलसंधारण खाते देण्यात आले. जोपर्यंत पंकजा सांगणार नाहीत, तोपर्यंत खात्याचा भार स्वीकारणार नाही, असे शिंदे यांनी जाहीरही केले होते, पण नंतर त्यांनी ते स्वीकारल्याचा इतिहास आहे. त्यावेळेला त्यांच्यात पंकजा यांच्यात आलेली कटुता दूर करण्यासाठी शिंदे यांनी आपल्या भाषणातून त्यांना मिळालेल्या कॅबिनेट मंत्रिपदाचे श्रेय दिल्याचे बोलले जात आहे. नंतर आपल्या भाषणात पंकजा यांनीही आपण शिंदे यांना कॅबिनेट खाते मिळवून दिल्याचे सांगितले. त्यामुळे तेथे असलेले राजकीय जाणकारही अचंबित झाले.

पंकजा यांना खूष करण्याच्या प्रयत्नांत शिंदे यांनी पुढील वर्षाच्या मेळाव्याचे नियोजन पालकमंत्री या नात्याने आपण करणार असल्याचे जाहीर करून टाकले. वास्तविक पाहता तो मेळावा सरकारचा नाही. तो भगवानगडावर येणाऱ्या भक्तांचा आहे. भाजपचे सरकार नसतानाही तो होत होता. हा मेळावा सरकारी नसताना पालकमंत्री त्याचे आयोजन कसे काय करू शकतात, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. मेळावा सरकारी नसेल, त्याचा खर्च ते सरकारी पैशांतून कसा करणार, याचेही त्यांना आगामी काळात उत्तर द्यावे लागणार आहे.
शिंदे यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात वंजारी समाजाची संख्या सुमारे ११ टक्के आहे. या समाजाला भुलवण्यासाठी अशी घोषणा शिंदे यांनी केल्याचे स्पष्ट होत आहे. आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा डाव मांडला गेला आहे. कारण मेळाव्याबाबत इतकी आस्था असती, तर यावर्षी हा मेळावा गडावर होण्यासाठी त्यांनी का प्रयत्न केले नाहीत, या प्रश्नाचे उत्तर त्यांना देता येणे अवघड आहे. विश्वस्त मंडळाने २४ डिसेंबर २०१५ रोजी गडावर मेळावा घेण्यास बंदी करण्याची घोषणा केली. त्यानंतर तो मेळावा गडावरच होण्यासाठी अनेक स्तरांवरून प्रयत्न सुरू होते. त्यासाठी पाथर्डी, बीड, औरंगाबाद, मुंबई येथे झालेल्या बैठकांना शिंदे यांनी विविध कारणे सांगून नाकारल्याचे कार्यकर्ते सांगतात.

महादेव जानकरांची ‘घसरण’
यासभेत गोपीनाथ पंकजा मुंडे यांची स्तुती करताना मंत्री महादेव जानकर अचानक ‘बारामती’वर घसरले. त्यांनी उघडपणे धनंजय मुंडे यांचा ‘बारामतीचा चमचा’ असा उल्लेख केल्यावर उपस्थित तरुणांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे अधिकच चेव आलेल्या जानकर यांनी ‘बारामतीचे वाटुळं केल्याशिवाय रहाणार नाही,’ अशी प्रतिज्ञा केली. उपस्थितांच्या प्रतिसादामुळे त्यांनी पुढे तर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना शिव्या देऊन आपल्याला राजकीय सभ्यतेशी काही देणे-घेणे नसल्याचे दाखवून दिले.

बातम्या आणखी आहेत...