आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भगवानगडावर दगडफेक; पोलिसांसह भाविक जखमी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी - भगवानगडावर मंगळवारी झालेल्या दगडफेकीत चार पोलिसांसह अनेक भाविक जखमी झाले. या घटनेचे चित्रीकरण पाहून पोलिस पुढील कारवाई करणार आहेत. दरम्यान, दगडफेक करणाऱ्यांचा शोध पोलिस घेत आहेत.

मंत्री पंकजा मंुडे, खासदार प्रीतम मुंडे यांच्यासह अन्य मंत्री, खासदार आमदार दुपारी गोपीनाथगड ते भगवानगड अशी रथयात्रेने लाखो भाविकांसह गडावर पोहोचल्या. मुख्य प्रवेशद्वाराजवळ रथ येताच समर्थकांनी पंकजांना रथासह आत जाण्याचा आग्रह धरला. पोलिसांनी त्याला विरोध करताच दगडफेक सुरू झाली. यात चार पोलिसांसह काही भाविक जखमी झाले. दगड फेकणाऱ्या काहींना शोधून काढत पोलिसांनी त्यांना चांगलेच झोडपले. अनेकांनी तेथे पडलेली खडी फेकून गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला.

दगडफेकीत जखमी झालेले सर्व पोलिस कर्मचारी हे राज्य राखीव पोलिस दलाचे आहेत. चित्रीकरणाच्या आधारे दगडफेक करणाऱ्यांचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव बॅरेकेटिंग केले असल्याने मुख्य प्रवेशद्वारातून जर भाविकांना आत प्रवेश दिला, तर गंभीर प्रकार घडू शकतो असे वाटल्याने पोलिसांनी मंत्री पंकजा यांना रथ बाहेर थांबवून आत पायी जाण्याची विनंती केली. मंुडे समर्थकांकडून मात्र तुम्ही रथासह आत जा, असा दबाव वाढवत त्यांना रथातून खाली उतरु दिले नाही. अखेर काही बॅरेकेंटिंग काढून रथ आत घेण्यात आला. पंकजा अन्य मंत्री दर्शनासाठी आत गेले. यावेळी अन्य काहींनी आत जाण्याचा आग्रह धरला. पोलिस समर्थक यांच्यात झालेल्या रेटारेटीमुळे दगडफेक झाली. यात समीर बनसोडे (कोल्हापूर), शंकर वाघमोडे (कोल्हापूर), शैलेश नाईक (कोल्हापूर), सुपडा पाटील (जळगाव) या चार पोलिस कर्मचाऱ्यांसह अनेक भाविक जखमी झाले.

भगवानगडावरील दसरा मेळाव्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सोमवारी सायंकाळपासून जमावबंदी आदेश लागू केला होता. वातावरणाचा अंदाज घेत राज्यभरातील सुमारे दोन हजारांहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. नागपूर विभागाचे पोलिस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल यांच्याकडे बंदोबस्त नियंत्रक अधिकारी म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती. अहवाल मुख्यमंत्र्यांना दिला जात होता.
बातम्या आणखी आहेत...