आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भंडारदरा धरण तांत्रिकदृष्ट्या भरले, ‘मुळा’चा साठाही २१६०० दशलक्ष घनफुटांवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भंडारदरा - जिल्ह्याच्या उत्तर भागातील अनुक्रमे श्रीरामपूर, राहाता, संगमनेर, अकोले राहुरी, नेवासे तालुक्यांतील काही भागासाठी जीवनवाहिनी ठरलेले भंडारदरा धरण परंपरेला छेद देत चार ऑगस्टलाच तांत्रिकदृष्ट्या भरले. तसे पाटबंधारे खात्याने अधिकृतपणे जाहीर केले. भंडारदरा तांत्रिकदृष्ट्या भरल्याचे जाहीर झाल्यामुळे निळवंडे धरणही याच आठवड्यात भरण्याची शक्यता आहे, असे पाटबंधारे सुत्रांनी सांगितले. मुळा धरणातही गुरुवारी सायंकाळी २१ हजार ६०० दशलक्ष घनफूट पाणीसाठा झाला आहे.
पाणलोट क्षेत्रातील पावसाने थोडा विसावा घेतला आहे. भंडारदरा धरणात होणारी आवक मंदावली असली, तरी मुळा नदीचा कोतूळजवळचा विसर्ग १० हजार ७३८ क्युसेक होता. त्यामुळे मुळा धरणाचा पाणीसाठा वेगात वाढत आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत मुळा धरणाचा साठा २२ हजार क्युसेकचा टप्पा ओलांडण्याची शक्यता आहे. भंडारदरा धरणाची क्षमता ११ हजार ३९ दशलक्ष घनफूट असून, सद्यस्थितीत धरणातील साठा १० हजार ५०० दशलक्ष घनफूट ठेवून उर्वरित पाणी सोडण्याचे नियोजन केले असल्याचे जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख उपअभियंता जी. जी. थोरात यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले. धरणाच्या पाणी पातळीवर आकडेवारीसाठी येथील पाटबंधारे खात्याचे शाखा अभियंता पी. टी. पाटील, कर्मचारी प्रकाश चव्हाण, बाळासाहेब लोहगावकर, मंगला मधे दिवसरात्र देखरेख ठेवत आहेत.

भंडारदरा, निळवंडे, मुळा ही धरणे भरल्यानंतर त्यातून पाणी सोडण्याचे वार्षिक नियोजन ऑक्टोबरमध्ये होणार आहे. भंडारदरा धरणाच्या ११ टीएमसी पाण्यावर उत्तर नगर जिल्हा समृद्ध झाला आहे. त्या पाण्यावर या पाच-सहा तालुक्यांतील साखर कारखानदारी, औद्योगिक वसाहती, २०० गावांना पाणीपुरवठा एकूण ४६ ते ५० मेगावॅट वीजनिर्मिती मुख्य अशा उत्तर भागासाठी शेतीचे पाणी पुरवण्याचे काम गेल्या ९० वर्षांपासून अविरतपणे करत आहे. मात्र, धरण परिसर पाटबंधारे खात्याची निवासस्थाने विश्रामगृहाच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होत नाही. पर्यटनाच्या दृष्टीनेही आवश्यक सुविधा उपलब्ध नाहीत.

मे महिन्यात केलेल्या डांबरी रस्त्यांची लागली वाट
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कृपेने या परिसरातील रस्तेच नष्ट झाले आहेत. निकृष्ट कामांमुळे मे महिन्यात केलेला डांबरी रस्ता खड्ड्यांत गेला आहे. त्यामुळे पर्यटक स्थानिक जनतेचे खूप हाल होत आहेत. या भागातील सर्व रस्ते काँक्रिटचे करण्याची गरज व्यक्त होत आहे. कारण डांबर खडीचे रस्ते अतिवृष्टीत टिकत नाहीत, असा दरवर्षीचा अनुभव आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्त्यांवरून वाहणारे पाणी गटारीत वळवावे, अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

अंब्रेला सुरू होणार
येत्या १० ते २० ऑगस्ट या कालावधीत सलग तीन सुट्या असल्याने जिल्ह्यातील राज्यातील लाखांच्या पुढे पर्यटक भंडारदरा परिसरात येतील अशी अपेक्षा आहे. पर्यटकांना आकर्षित करणारे मनमोहक सृष्टीसौंदर्य, धबधबे, प्रचंड वेगाने कोसळणारा रंधाफॉल, तसेच धरणाच्या भिंतीजवळ असणारा अंब्रेला फॉलही सुरु करणार असल्याचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी सांगितले. सद्यस्थितीत स्पील-वे येथे भिंतीवर आदळणारे पाणी त्याद्वारे थेट मुख्य रस्त्यावर येणारे जलतुषार असे विलोभनीय दृश्य या परिसरात दिसत आहे.
आदिवासी शेतकरी अतिवृष्टीमुळे पूर्ण कोलमडला
भंडारदरा धरण मुळा विभागातील आदिवासी शेतकरी अतिवृष्टीमुळे कोलमडून गेला आहे. एकट्या भातपिकावर ८० ते ९० टक्के शेततळ्याचे वार्षिक नियोजन असते, असे येथील शेतकरी विठ्ठल खाडे, बाबुराव आंसवले यांनी सांगितले. येणारे भातपीकच काही ठिकाणी नष्ट झाले, तर काही ठिकाणी भात लागवड पूर्णपणे बुडाली आहे. त्यामुळे परिसरातील आदिवासी शेतकरी सुन्न झाला आहे. एकीकडे आनंदोत्सव, तर दुसऱ्या विभागात निरव शांतता असे चित्र सध्या दिसत आहे.
बातम्या आणखी आहेत...