आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस; साडेपंधरा इंच पावसाची नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यातील प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्र असलेल्या अकोले तालुक्यात सोमवारपासून धुवाधार पाऊस सुरू झाला आहे. मुळा, भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात तब्बल साडेपंधरा इंच पावसाची नोंद झाली. त्यामुळे पाण्याची विक्रमी आवक सुरू आहे. मुळा धरण 34 टक्के, तर भंडारदरा धरण अर्धे भरले आहे. पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे. दीर्घकाळ पावसाने मारलेली दडी व त्यानंतर किरकोळ स्वरुपात सुरु असलेल्या पावसाने जिल्हावासीयांची चिंता वाढली असताना प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू झाला आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला भंडारदरा व मुळा या दोन्ही धरणांनी तळ गाठला होता. उपयुक्त पाणी साठा संपत आला होता. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, जुलैच्या तिस-या आठवड्यात पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने धरणात नव्या पाण्याची आवक सुरू झाली.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या, 26 टीएमसी क्षमता असलेल्या मुळा धरणात मंगळवारी सकाळी 15 हजार 776 क्युसेक्स इतक्या विक्रमी वेगाने पाण्याची आवक सुरू होती. सायंकाळपर्यंत ही आवक 13 हजार 375 पर्यंत घसरली. सकाळी धरणातील पाणीसाठा 8 हजार 375 दशलक्ष घनफूट होता. सायंकाळी सहा वाजता त्यात वाढ होत हा साठा 8 हजार 686 दशलक्ष घनफूट, तर पाणीपातळी 1770.60 फुटांवर पोहचली. आवक टिकल्यास बुधवारी (30 जुलै) सायंकाळपर्यंत धरणात 10 टीएमसीहून अधिक पाणीसाठा होण्याची शक्यता आहे. भंडारदरा धरणातही सव्वापाच टीएमसीपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. बुधवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा 5 हजार 227 दशलक्ष घनफुटांवर गेला. आवक अधिक असल्याने रात्री दहापर्यंत धरण अर्धे भरेल. या धरणाची साठवण क्षमता 11 टीएमसी आहे. निळवंडे धरणातही 1191 दशलक्ष घनफूट पाणी साठले आहे. रंधा धबधब्यातून दोन हजार क्सुसेक्स वेगाने निळवंडे धरणात पाण्याची आवक सुरू आहे.
रंधा पाहण्यासाठी गर्दी
या पावसाळ्यात प्रथमच रंधा धबधबा भरभरून कोसळू लागला आहे. अनेक हिंदी व मराठी चित्रपटांत दिसणारा हा जलप्रपात डोळ्यांत साठवण्यासाठी पर्यटकांनी गर्दी केली आहे. रमजान ईदची सुटी अनेकांनी रंधा आणि भंडारदरा परिसरात मित्रपरिवार व कुटुंबीयांसह साजरी केली. येत्या काही दिवसांत पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.
विक्रमी आवक
मुळा धरणाचे पाणलोट क्षेत्र असलेल्या कोतूळ येथून मुळा नदीपात्रात सोमवारी (28 जुलै) 3 हजार 212 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू होती. त्यात मंगळवारी सकाळी जवळपास पाचपटीने वाढ झाली. नदीपात्रात पावणेदोन मीटरपर्यंत असलेल्या पाण्याचा स्तर चार मीटरच्या वर गेला. ही विक्रमी आवक असल्याची माहिती शाखा अभियंता राजेंद्र कांबळे यांनी दिली.