आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाकचौरेंच्या बंडखोरीने शिवसेनेला आणला ताप

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत बंडाळीचे वारे वाहू लागले आहे. पहिला झटका शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिला. सेनेला ‘जय महाराष्ट्र’ करून ते काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे सेनेकडून नव्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. ज्येष्ठ साहित्यिक लहू कानडे, माजी आमदार सदाशिव लोखंडे हे सेनेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत.

शिर्डी मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला होता. काँग्रेसचे बाळासाहेब विखे सातवेळा निवडून आले होते. पाच वर्षांपूर्वी हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला. त्यामुळे विखे यांना हक्काचा मतदारसंघ सोडावा लागला. या मतदारसंघातील संगमनेर, अकोले, राहाता, नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव या तालुक्यांमध्ये काँग्रेसचे वर्चस्व आहे. संगमनेरमध्ये महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अकोले तालुक्यात राष्ट्रवादीचे आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड, राहाता तालुक्यात काँग्रेसचे राधाकृष्ण विखे, नेवासे तालुक्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख, श्रीरामपूर तालुक्यात काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससाणे असताना मागील निवडणुकीत काँग्रेस रिपाइं आघाडीचे उमेदवार रामदास आठवले यांना पराभव स्वीकारावा लागला.

शिवसेनेतर्फे वाकचौरे यांना गेल्या निवडणुकीत उमेदवारी मिळाली. ती अनपेक्षित होती. अपक्ष म्हणून प्रेमानंद रूपवते यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. मतदारांनी वाकचौरे यांना कौल दिला. हा निकाल धक्कादायक होता.

आता लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच वाकचौरे काँग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. मागील निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता, हा इतिहास माहिती असताना वाकचौरे काँग्रेसच्या जहाजावर सवार झाले. वाकचौरे काँग्रेसमध्ये गेल्यामुळे कानडे यांच्या उमेदवारीचा मार्ग सोपा झाला आहे. सेनेकडून माजी आमदार सदाशिव लोखंडेही इच्छुक आहेत. काँग्रेसची उमेदवारी वाकचौरे यांना मिळणार हे निश्चित असले, तरी जोगेंद्र कवाडे, केंद्रीय नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. नरेंद्र जाधव यांचेही प्रयत्न सुरू आहेत. शिवसेनेचे वरिष्ठ नेते शिर्डीबाबत काय निर्णय घेतात, याक डे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

जनता माफ करणार नाही
खासदार वाकचौरे यांनी काँग्रेसमध्ये जाऊन मोठी चूक केली. दुसर्‍या पक्षाने त्यांना कधीच किमत दिली नव्हती. शिवसेनेने त्यांना सन्मान दिला, पण शिवसेनेबरोबरच त्यांनी गद्दारी केली. सर्वसामान्य जनतेप्रमाणेच शिवसैनिकही वाकचौरे यांना कधीच माफ करणार नाहीत.’’ अनिल राठोड, आमदार

कानडे, लोखंडे यांची मुंबईत उमेदवारीसाठी मुलाखत
मुंबईत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी शिर्डी मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. लहू कानडे व माजी आमदार सदाशिव लोखंडे यांनी मुलाखती दिल्या. यावेळी शिवसेनेचे आमदार अशोक काळे उपस्थित होते.