आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोप करणाऱ्यांनी मराठा समाजासाठी काय केले?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - माझ्यावर प्रसिध्दी, पैसा भांडवलशाहीचे खोटे आरोप करण्यात आले. आरोप करणाऱ्यांनी ते सिध्द करून दाखवावेत; अन्यथा न्यायालयीन चौकशीला सामोरे जावे. आरोप करणाऱ्यांना कोपर्डीतील पीडित कुटुंंबाबद्दल आपुलकी वाटत असेल, तर ही मंडळी का तेथे गेली नाही? कुठल्याही गोष्टीचे भांडवल करणे आमचे काम नाही. गरिबांचे दु:ख दूर करायचे, त्यांची सेवा करायची हेच आमचे व्रत आहे. ज्यांनी माझ्यावर आरोप केले, त्यांनी मराठा समाजासाठी काय केले? असा सवाल राष्ट्रसंत भय्युजी महाराजांनी केला.
सूर्योदय परिवाराच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मी मराठा समाजातील हजारो युवकांना रोजगार दिला आहे. गरीब शेतकऱ्यांना बियाणे दिली, बैलजोडीचे वितरण केले, शेतकऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती दिली, मुलींची लग्न लावून दिली. अशी एक नाही हजारो कामे केली. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत.

आमचा अजेंडा कोपर्डीच होता आणि कोपर्डीच राहणार. नंतर जोडल्या गेलेल्या मागण्या या मराठा समाजाच्या सामूहिक वेदनेच्या आहेत. तो प्रश्न मराठा समाजाने वेगळा सोडवावा. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्याच्या विविध भागात विविध मागण्यांसाठी जे प्रचंड मोठे, शिस्तबध्द मोर्चे निघत आहेत, त्यांचं मी काैतुक करतो आणि शुभेच्छाही देतो. सोशल मीडियातून मी या मोर्चात लक्ष घातले आहे, मला प्रसिध्दी हवी आहे, अशी चर्चा सुरू आहे. मी मानवतेच्या भूमिकेतून हाती घेतलेल्या कोपर्डीच्या प्रश्नाला कुणाच्याही, कसल्याही स्वार्थापायी बिभत्स वळण लागावे, हा मला त्या मुलीच्या मातेचा, तसेच बळी पडलेल्या कन्येच्या वेदनेचा अपमान वाटतो. कोपर्डीतील घटनेनंतर सर्वप्रथम मी तिथे पोहोचलो. त्यांना मदत करण्याबरोबरच त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे गुन्हेगारांना शिक्षा झाली पाहिजे, ही मागणी लावून धरली. ती धसास लागेपर्यंत मी लढत राहीन, असे भय्युजी महाराजांनी म्हटले आहे.
एका खासगी वृत्तवाहिनीवरील मुलाखतीदरम्यान मराठा समाजाचे प्रश्न समजण्यासाठी मांडण्यासाठी मी महाराष्ट्रातील पोपटराव पवार, अण्णा बोराडे, शरद निंबाळकर अण्णा हजारे यांची नावे सुचवली होती, जर मला या आंदोलनाचे नेतृत्व करायचे असते, तर दुसऱ्यांची नावे मी सुचवलीच नसती. मत मांडणे हादेखील गुन्हा आहे का? आपले विचार मांडले याची शिक्षा म्हणून जर माझ्या परिवारावर घाणेरडे आरोप केले जात असतील, तर हा कुठला न्याय? हेच समाजाचे एकत्रिकरण आहे का? ही कुठल्या समाजाची जोडणी आहे? आपण समाज जोडायला निघाले की तोडायला? मी जेव्हा जेव्हा कोपर्डीला जात होतो, तेव्हा तेव्हा ग्रामस्थांमध्ये असुरक्षिततेची भावना पाहिली, तेव्हा माझ्यावर आरोप करणारे मराठे कुठे होते? माझ्यावर आरोप करणाऱ्यांना कोपर्डीतील पीडित कुटुंबाबद्दल आपुलकी असेल, तर ही मंडळी का तेथे गेली नाही? कुठल्याही गोष्टीचे भांडवल करणे हे आमचे काम नाही. गरिबांचे दु:ख दूर करायचे, त्यांची सेवा करायची हेच आमचे व्रत आहे. सोशल मीडियातून विविध मराठा संघटना व्यक्तींनी माझ्यावर परिवारावर पूर्वग्रहदूषित भावनेने, नियोजनबध्दरित्या खोटे, निराधार बिनबुडाचे आरोप केले. त्यांनी ते सिध्द करावेत. आम्ही कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहोत. नार्को टेस्टलाही सामोरे जाण्यास तयार आहोत. आरोप करणाऱ्यांनीही न्यायालयीन चौकशीला सामाेरे जावे, असे पत्रकात म्हटले आहे.
लोकप्रियता मला नवीन नाही
^मराठा समाजातील अनेक युवक प्रश्न घेऊन माझ्याकडे येत असतात ते सोडवण्यासाठी शक्य ते सर्व मी करत असतो. त्यामुळे या समाजाचे म्हणून जे प्रश्न आहेत त्यांची जाणीव मला आहे. लोकप्रियता मला नवीन नाही. मला कुठला राजकीय स्वार्थही साधायचा नाही. माझा मार्ग सेवेचा आहे, दु:ख निवारण्याचा आहे. एक मराठा - लाख मराठा हे वाक्य मी दिलेले नाही. मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा तो प्रयत्न आहे.'' भय्युजी महाराज.
बातम्या आणखी आहेत...