आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhenda Primary Health Center Nurse Shakila Shaikh Get India's Presidents Hand Award

शकिला शेख यांना मिळणार राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नेवासे तालुक्यातील भेंडा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत असलेल्या आरोग्यसेविका शकिला शेख यांनी मागील दहा वर्षांत दरवर्षी सुमारे 200 बाळंतपणे केली. नगर जिल्ह्यातील हा उच्चांक आहे. या कार्याबद्दल केंद्र सरकारचा ‘फ्लोरेन्स नाईट अँजल’ पुरस्कार त्यांना जाहीर झाला आहे. येत्या रविवारी (12 मे) नवी दिल्ली येथे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे व 555 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रे आहेत. उपकेंद्रातील आरोग्यसेविकेला दरमहा अवघी तीन बाळंतपणे करण्याचे उद्दिष्ट असते. तथापि, बहुतेक आरोग्यसेविका हेही उद्दिष्ट पूर्ण करत नाहीत. असे असताना शेख या भेंडा उपकेंद्रात दरमहा 12 ते 15 बाळंतपणे करतात. अद्ययावत सुविधा असलेली रुग्णालये तेथून पाच-दहा किलोमीटर अंतरावर आहेत. तथापि, शेख यांच्या विश्वासार्हतेमुळे या केंद्रात प्रसुतीसाठी येणार्‍यांची संख्या वाढते आहे. दहा वर्षांपासून त्यांच्या हातून एकही अर्भक अथवा मातेचा मृत्यू झालेला नाही.

शेख यांच्या कार्याची यशोगाथा सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’त आली. नुकताच त्यांना जिल्हास्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

जिल्ह्याला प्रथमच केंद्राचा पुरस्कार
नगर जिल्ह्यातील एका आरोग्यसेविकेने केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल जिल्ह्याला प्रथमच केंद्राचा पुरस्कार मिळत असल्याने आनंद होत आहे. प्रचंड कष्ट व निष्ठेने काम केल्यास यश निश्चित मिळते. भेंडा येथील रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत आहे.
- डॉ. कारभारी खरात, जिल्हा आरोग्य अधिकारी.

दरवर्षी केलेल्या बाळंतपणांचा आलेख
शेख यांनी सन 2008 मध्ये 271, 2009 - 227, 2010 - 210, 2011 - 206, 2012 - 209 बाळंतपणे केली. हे प्रमाण जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रे, तसेच उपकेंद्रांत सर्वाधिक आहे. पंतप्रधानांच्या सल्लागारांनी नुकतीच या केंद्राला भेट दिली.

फ्लोरेन्सच्या स्मरणार्थ पुरस्कार
दुसर्‍या महायुद्धात जखमी झालेल्या सैनिकांवर फ्लोरेन्स ही परिचारिका हातात कंदील घेऊन उपचार करायची. दरवर्षी फ्लोरेन्स यांच्या जन्मदिनानिमित्त 12 मे हा जागतिक परिचारिका दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या कर्मचार्‍याला फ्लोरेन्स नाईटएंजल पुरस्कार दिला जातो.