आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडफेकीचा निषेधार्थ भिंगार बंद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात शनिवारी भरदिवसा नागरदेवळा येथील उपसरपंच चिंटू आल्हाट याला ठेचून मारणारे आरोपी अजून मोकळेच आहेत. दरम्यान, आल्हाटच्या पार्थिवावर अंत्यसंस्कारासाठी जाताना रात्री साडेसातच्या सुमारास भिंगार वेशीजवळच्या दुकानांवर दगडफेक करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यासाठी रविवारी भिंगारच्या व्यापार्‍यांनी कडकडीत बंद पाळला.

जागेवरील अतिक्रमणाच्या वादावर तोडगा काढण्यासाठी बोलावून आल्हाट याचा निर्घृण खून करण्यात आला. शहर वाहतूक शाखेपासून हाकेच्या अंतरावर त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा करण्यात आला. मात्र, जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. आल्हाटचा गुन्हेगारी कारवायातील पूर्वीचा साथीदार अमोल छजलानी याच्यासह विशाल गोहेर, दिनेश कलुशिया, मुटू वेल्डिंगवाला, विश्वास गोहेर, संदीप झांजोट, धरम यांच्यासह 8 ते 10 अनोळखी युवकांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात खून व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

दरम्यान, भिंगारमधील सर्व व्यवहार रविवारी ठप्प होते. शनिवारी झालेल्या दगडफेकीच्या घटनेबाबत पोलिस कर्मचारी सुभाष थोरात यांच्या फिर्यादीवरून सतीश सुरेश आळकुटे, सुशील भाऊसाहेब साळवे, योगेश मच्छिंद्र साळवे, विलास शंकर निकाळजे, गीताराम काळे, अक्षय भिंगारदिवे, आकाश तांबे, व इतर दोन-तीन जणांविरुद्ध भिंगार कँप ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलो. यातील चार आरोपींना पोलिसांनी शनिवारी रात्रीच अटक केली. परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त आहे.


दोन पथके रवाना
घटनेनंतर आरोपींची शोधमोहीम राबवण्यात आली. रविवारी सकाळी स्थानिक गुन्हे शाखेची दोन स्वतंत्र पथके आरोपींच्या मागावर रवाना करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत पोलिसांच्या हाती काहीही लागले नव्हते. आरोपींच्या अटकेसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याची माहिती शहर उपविभागाचे उपअधीक्षक श्याम घुगे यांनी दिली .