आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगारच्या रस्त्यांना लागले खड्ड्यांचे ग्रहण !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भिंगार उपनगरामधून जाणा-या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसामुळे या रस्त्यांना खड्ड्यांचे ग्रहण लागले आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे या परिसरात सध्या दररोज छोटे-मोठे अपघात होत आहेत. या समस्येकडे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे दुर्लक्ष झाले आहे.

सुमारे 25 हजार लोकसंख्या असलेल्या भिंगारच्या रस्त्यांची पावसामुळे मोठी दुरवस्था झाली आहे. भिंगार अर्बन बँक ते भिंगार वेस या दरम्यानच्या रस्त्यावर लहान-मोठे सुमारे दीडशेहून अधिक खड्डे पडले आहेत. भिंगारमधून पाथर्डी, शेवगाव, बीडकडे जाणारी वाहतूक जाते. त्यामुळे या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. येथील नागरिकांना नगरमध्ये येण्यासाठी याच मार्गाचा वापर करावा लागतो. त्यातच भिंगारमधून जाणा-या रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून एकाच वेळी दोन मोठी वाहने जाणे शक्य होत नाही. पादचा-यांसाठीही हा एकच रस्ता आहे.

हा रस्ता एकेरी असल्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. वाहतूक कोंडीमुळे अनेकवेळा वाहनचालकांत वाद होतात. या रस्त्याच्या बाजूला भूमिगत गटार आहे. मात्र, बहुतेक ठिकाणी ही गटार उघडी असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा अशी स्थिती झाली आहे. या परिसरात वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतुकीवरील नियंत्रणासाठी नियुक्त केलेले पोलिस तेथे उपस्थित नसतात. त्यामुळे चालक व युवक भरधाव वेगाने वाहने चालवतात. यामुळे छोटे मोठे अपघात होतात.

रस्ता दुरुस्तीसाठी 10 लाख द्या
भिंगारमधील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली असून, या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून दहा लाखांची तरतूद करावी, अशी मागणी महापौर संग्राम जगताप यांनी पालकमंत्री मधुकर पिचड यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. याबाबत पिचड यांनी कार्यवाहीचे आदेश जिल्हाधिकारी अनिल कवडे यांना दिले आहेत.

रस्ता दुरुस्त न केल्यास पुन्हा आंदोलन
भिंगारमधील रस्त्यांची दुरुस्ती करावी, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय घंटानाद आंदोलन करण्यात आले होते. तरी देखील या रस्त्याची दुरुस्ती झालेली नाही. गणेशोत्सव जवळ येऊन ठेपला आहे. त्या अगोदर हा रस्ता दुरुस्त होणे गरजेचे आहे. हा रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास पुन्हा आंदोलन करण्यात येईल.’’