आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बीएचआर' च्या ठेवीदारांची आता कायदेशीर लढाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - डबघाईला आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेच्या ठेवीदारांनी एकत्रित येत ठेवी बचाव कृती समितीचे गठण केले आहे. या समितीच्या माध्यमातून ठेव परतीसाठी कायदेशीर लढा देण्याबरोबरच पंतप्रधान मल्टिस्टेटचा दर्जा देणाऱ्या यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय ठेवीदारांनी घेतला आहे.

बीएचआर पतसंस्था अडचणीत आल्याने मुदत संपलेल्या ठेवीदारांना रकमा परत मिळालेल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर मुदत संपलेल्या मुदत संपत आलेल्या ठेवींच्या ठेवीदारांची लालटाकी परिसरातील खाकीदासबाबा मठात रविवारी सायंकाळी बैठक घेण्यात अाली. या बैठकीला शहरासह जिल्हाभरातील हवालदिल झालेल्या ठेवीदारांनी हजेरी लावली. बैठकीतून मुदत संपलेल्या जवळपास एक कोटी रुपयांच्या ठेवींची माहिती संकलित करण्यात आली. संताप अनावर झालेल्या ठेवीदारांनी चीड उद्वेग व्यक्त करत हक्काचा पैसा परत मिळवून देण्याचा टाहो फोडला. व्याजाला मुकल्याची भावना व्यक्त करताना किमान मुद्दल तरी मिळेल का? अशी शंका उपस्थित करत ठेवीदारांनी ठेव परतीचा लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यासाठी ठेव बचाव कृती समिती स्थापन करण्यात आली.

डी. एम. कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली अशोक मुनोत, नंदकशिोर बलदवा, लक्ष्मण कारभारी, रवींद्र कांबळे, चंदनमल बाफना, जवाहरलाल शहा, मधुकर वाघमारे, राकेश कुलकर्णी यांच्या समितीवर बैठकीत शिक्कामोर्तब झाले. लक्ष्मीकांत झंवर यांची मार्गदर्शकपदी नियुक्ती करण्यात आली. या बैठकीला प्रदीप पंजाबी, डॉ. हरिकिसन सोमाणी, डॉ. अभय मुथा, डॉ. लता फिरोदिया उपस्थित होते. अध्यक्षस्थानी अॅड. सुधीर भापकर होते. अॅड. भापकर म्हणाले, ठेवीदारांकडून न्यायालयात दिवाणी, तसेच फौजदारी दावे दाखल करणे आवश्यक आहे. त्यासोबतच संस्था मल्टिस्टेट असल्याने पंतप्रधान, केंद्रीय कृषी तथा सहकारमंत्री तसेच मल्टिस्टेटच्या वरिष्ठांकडे धाव घ्यावी लागेल, हे ठेवीदारांच्या नदिर्शनास आणून देताना समितीसाठी विनामोबदला काम करण्याची ग्वाही दिली. समितीच्या कामासाठी उपस्थित ठेवीदारांनी आर्थिक मदत दिली असून त्यातून ठेव परतीचा लढा उभारण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. मुदत संपलेल्या ठेवीदारांनी समितीकडे जमा केलेल्या माहितीनुसार जवळपास एक कोटी रुपयांच्या ठेवी संस्थेकडे अडकल्याचे पहिल्या बैठकीतून समोर आले आहे. माहिती जमा होत जाईल, तशी अडकलेल्या ठेवींच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे.
ठेवीदारांनी संपर्क साधावा
रायसोनी पतसंस्थेत अडकलेल्या ठेवींसाठी येत्या आठवडाभरातकायदेशीर लढाईला सुरुवात करणार आहोत. केंद्राकडे पाठपुरावा करण्यासाठी समितीचे शिष्टमंडळही दिल्लीला पाठवण्यात येणार आहे. ठेव परतीसाठी आवश्यक ती पावले समितीकडून उचलण्यात येणार आहेत. ठेव अडकलेल्या ठेवीदारांनी ९६६५७३९६८२ किंवा ९८९०९२४१८३ या क्रमांकावर संपर्क साधावा.
'' डी.एम. कुलकर्णी, अध्यक्ष, ठेव बचाव कृती समिती, नगर.
डबघाईला आलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्थेच्या लालटाकी येथील खाकीदासबाबा मठात झालेल्या ठेवीदारांच्या बैठकीत मार्गदर्शन करताना अॅड. सुधीर भापकर. छाया: उदय जोशी.