आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhuikot Fort Be A National Monument, MP Ashok Chavan

भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक व्हावा, खासदार अशोक चव्हाण यांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- पंडित जवाहरलाल नेहरूंच्या १२५ व्या जयंती महोत्सवाची सांगता साजरी करण्याचा मान नगरचाच आहे, असे सांगत नेहरूंचे वास्तव्य असलेला येथील भुईकोट किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून विकसित करावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांनी रविवारी केली. हा कार्यक्रम सुरू असतानाच अचानक पावसाने हजेरी लावल्याने कार्यकर्ते नेत्यांची त्रेधातिरपीट उडाली. कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या, तर वक्त्यांनी छत्रीचा आधार घेत भाषणे केली.

पंडित नेहरूंच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षाचा समारोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने भुईकोट किल्ला मैदानावर करण्यात आला. याप्रसंगी चव्हाण बोलत होते. या वेळी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, खासदार राजीव सातव, काँग्रेसचे सरचिटणीस मोहन प्रकाश, माजी मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात, आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, उपमहापौर सुवर्णा कोतकर, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे, आनंद पाटील आदी उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले, १२५ व्या जयंतीनिमित्त नेहरूंचे स्मरण करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत. या महोत्सवाचा मान नगर जिल्ह्याचाच आहे. त्यामुळे मान देण्याचा प्रश्नच येत नाही. महापुरुषांनी कष्ट सोसून स्वातंत्र्य मिळवले, त्याची आम्हाला जाण आहे. भुईकोट किल्ल्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. हा किल्ला राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करून त्याचा पर्यटन विकास झाला पाहिजे.

१२ राष्ट्रीय नेते या किल्ल्यात बंदिस्त होते. त्यांनी "चले जाव'चा नारा देत इंग्रजांना देशाबाहेर काढले. आताही देशाचे तुकडे पाडण्याचा, देशाचे विघटन करण्याचा कोणी प्रयत्न केला, तर आम्ही भाजप सरकारला "चले जाव'चा नारा देऊ. देश एकसंघ राहिला तरच विकास होईल, ही भावना प्रत्येकाची आहे. त्याला सुरुंग लावण्याचे काम करणाऱ्यांना जागा दाखवून देऊ, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले.

नेहरूंनी घालून दिलेली शिस्त, त्यांनी निर्माण केलेल्या भारताची संकल्पनाच धोक्यात आहे. त्यांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचवून प्रेरणा निर्माण करायची आहे, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

खासदार सातव म्हणाले, नेहरूंचे काय योगदान आहे, असा प्रश्न उपस्थित केला जातो. ज्यांनी स्वातंत्र्यासाठी कारावास सोसला, लोकशाहीची स्थापना केली, सत्तेचे विकेंद्रीकरण केले, त्यांच्यामुळेच ही सुुरुवात होऊ शकली. भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी स्वतंत्र झाले, पण पाकिस्तानमध्ये पंचायतराज व्यवस्था नाही. आपल्या पंतप्रधानांना वारंवार परदेशात जायला आवडते. कारण त्यांना अनेक वर्षे व्हिसा दिला जात नव्हता. अनेकांना वाटले दाढीवाला बरोबर आहे, म्हणूनच जनतेने त्यांना संधी दिली. आम्हीही जनतेचा कौल मान्य केला. फडणवीस सरकारला तर दुष्काळही कळत नाही. कांदा जमिनीवर येतो की जमिनीखाली हेदेखील त्यांना माहिती नाही. अशा वातावरणामुळे गुजरातमधील निवडणुकीसाठी भाजपला उमेदवारही मिळत नाहीत, अशी बोचरी टीका सातव यांनी केली.

सातव यांच्या भाषणाच्या वेळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे नंतरच्या वक्त्यांना भाषणांना आवर घालावा लागला. कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.
पाऊस सुरू होताच शामियान्यातील कार्यकर्त्यांनी खुर्च्या डोक्यावर घेतल्या. छाया: सािजद शेख
नगरच्या किल्ल्यातील पंडित नेहरूंच्या कक्षातील त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण. समवेत पृथ्वीराज चव्हाण. पक्ष निरीक्षक शरद रणपिसे, राधाकृष्ण विखे, जयंत ससाणे, अण्णासाहेब म्हस्के, दीप चव्हाण आदी. छाया: अनिल शाह.

जन्म शताब्दीची आठवण
२५वर्षांपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरूंची जन्मशताब्दी नगरच्या किल्ल्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली होती. त्या वेळी िकल्ल्याच्या तटबंदीवर लाइट अँड साउंडच्या साहाय्याने "मी किल्ला बोलतोय' हा कार्यक्रम शासनाच्या वतीने सादर करण्यात आला होता. त्याचे स्मरण अनेकांनी केले.

महाराष्ट्र पिंजून काढू
महात्मागांधींजींच्या विचारांवर घाला घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. देशात सहिष्णुता राहिलेली नाही. १३० वर्षांचा काँग्रेस आणखी १३० वर्षे नेऊ. त्यासाठी खासदार अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्र आपण पिंजून काढणार आहोत.'' शरदरणपिसे, पक्षनिरीक्षक.

त्याग नसलेले सत्तेवर
अनेक साहित्यिकांनी पुरस्कार परत केले. अशा वातावरणात कोण देशाला अस्थिर करतेय? ज्यांच्यात त्यागाची परंपराच नाही, असे लोक सत्तेवर बसले आहेत. त्यामुळे या महोत्सवात आपण देशातील जातीयवाद्यांचा बीमोड करण्याचा संकल्प करावा.'' राधाकृष्णविखे, विरोधीपक्षनेते.

भाजप सरकारवर टीकास्त्र
देशातआणि राज्यात काँग्रेस विरोधी बाकावर आहे. अशा परिस्थितीत नेहरूंच्या जयंतीचा कार्यक्रम घेऊन त्यांचे विचार पोहोचवण्यासाठी काँग्रेसने विविध उपक्रम राबवले. भुईकोट किल्ल्याजवळ झालेल्या कार्यक्रमात नेहरूंचा इतिहास सांगत असताना भाजप सरकारवर सडकून टीका करण्याची संधी एकाही वक्त्याने सोडली नाही. ज्या पद्धतीने नेहरूंची जयंती साजरी करण्याची संधी काँग्रेसने साधली, तशी भाजपला साधता आली नाही.

पावसामुळे कार्यकर्त्यांनी खुर्च्या घेतल्या डोक्यावर
खासदारराजीव सातव यांचे भाषण सुरू असतानाच जोरदार सरी कोसळायला सुरुवात झाली. त्यांच्यानंतर पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, मोहन प्रकाश यांची भाषणे होणार होती. पावसामुळे मंडप ठिकठिकाणी गळू लागला. त्यामुळे कार्यकर्ते उठून उभे राहिले. खुर्च्या डोक्यावर धरून पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न काहींनी केला. व्यासपीठावरही पाऊस पडू लागल्यानंतर वक्त्यांच्या डोक्यावर छत्र्या धरण्यात आल्या. कार्यकर्त्यांचे लक्ष पावसामुळे विचलित झाले असताना काही वक्त्यांना मात्र बोलण्याचा मोह आवरत नव्हता, पण इतरांनी आवरते घेतले.