आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किल्ल्यातील हुतात्म्यांचा प्रशासनाला विसर.!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - देशाच्या स्वातंत्र्यासाठी नगरच्या किल्ल्यात जे फासावर चढले, त्यांच्या हौतात्म्याचा सत्ताधार्‍यांना, प्रशासनाला आणि समाजालाही विसर पडला आहे. या हुतात्म्यांच्या नावाची साधी नोंदही किल्ल्यात नाही.
पाच शतकांपासून उभा असलेला नगरचा किल्ला स्वातंत्र्याचे प्रेरणास्थान आहे. चले जाव आंदोलनात पकडण्यात आलेल्या पंडित नेहरू व अन्य 11 राष्ट्रीय नेत्यांना या किल्ल्यात स्थानबद्ध करण्यात आले होते. तथापि, केवळ या घटनेपुरतं किल्ल्याचं महत्त्व र्मयादित नाही. स्वातंत्र्याच्या उर्मी धगधगत ठेवून ब्रिटिशांविरोधात झुंजलेल्या अनेक क्रांतिकारकांच्या रक्ताने हा किल्ला रंगला आहे. मात्र, त्यांच्या हौतात्म्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
ब्रिटिशांविरोधात पहिला उठाव केला तो महादेव कोळ्यांनी. या उठावाचे नेतृत्व रामजी भांगरे व रामा किरवा यांनी केले. रामा किरवा याने एकदा साथीदारांना बरोबर घेऊन ब्रिटिशांचे लष्करी ठाणे असलेल्या नगरवर हल्ला केला होता. कोळी व भिल्ल टोळ्यांना एकत्र करून मोठे बंड उभारण्याची तयारी तो करत होता. त्याला पकडण्यासाठी कॅप्टन लॉयकिन, लेफ्टनंट फॉरबेज, लेफ्टनंट लॉईट हे ब्रिटिश अधिकारी जंग जंग पछाडत होते, पण तो काही हाती लागत नव्हता. अखेरीस 1830 मध्ये रामा किरवा व त्याच्या सहकार्‍यांना पकडण्यात ब्रिटिशांना यश आले. या सर्वांना नगरच्या किल्ल्यात फासावर चढवण्यात आलं. पुढे 1857 च्या बंडात पकडलेल्या अनेक क्रांतिकारकांनाही नगरच्या किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आलं होतं. त्यातील काहींना सध्या बुरूडगाव रस्त्यावर असलेल्या एका वडाच्या झाडाला लटकवून फाशी देण्यात आलं. हे ठिकाण ‘फाशीचा वड’ म्हणून ओळखलं जात होतं. या सगळ्या घटनांची कागदोपत्री नोंद असली, तरी जिथे या वीरांनी हौतात्म्य पत्करलं त्या स्थळी कसलीही निशाणी नाही. स्मारक तर दूर राहिलं, त्यांच्या नावाचा साधा फलकही कुठे लावण्यात आलेला नाही.
स्वातंत्र्य चळवळीत बलुचिस्तानात फाशी देण्यात आलेले प्रीतमखान मोगाखान मूळचे नगरचे. ब्रिटिशांविरुद्ध बंड केल्याबद्दल त्यांना नगर येथे पकडण्यात आले, पण पोलिसांच्या तावडीतून सुटून पलायन करण्यात ते यशस्वी झाले. पुढे 1934 मध्ये सिंध प्रांतात ते पकडले गेले. चौकशीत ते नगरचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यांना बलुचिस्तानमध्ये फासावर चढवले गेले. त्यांच्या नावाची नोंद सरकारने प्रकाशित केलेल्या स्वातंत्र्यसैनिक चरित्रकोशात आहे. प्रीतमखान यांची अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न इतिहासाचे अभ्यासक आसिफखान दुलेखान करीत आहेत.