आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bhushan Deshmukh Article About Ahmednagar Water Issue, Divya Marathi

नगरचं जलवैभव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर वसलं सीना नदीकाठी. सीनेनं नगरचं भरण-पोषण केलं, तरी या शहरासाठीचा प्रमुख जलस्त्रोत ती बनू शकली नाही. सीनेचा उगम नगरच्या उत्तरेला सुमारे 18 किलोमीटर अंतरावर बायजाबाई जेऊरच्या परिसरात असलेल्या ससेवाडीजवळ आहे. सीनाशंकराच्या गोमुखातून सीना निघते आणि अवखळ वळणं घेत नगरमध्ये येते. इथं तिचं पात्र फारसं रुंद नाही. जामगावहून येणारा एक प्रवाह सीनेला येऊन मिळतो, पण तोही दुष्काळी टापूतला. त्यामुळं सीनेचं नगरमधलं रूप लहानखुरंच राहिलं. नगर सोडल्यानंतर उपनद्या मिळत जाऊन सीना इतकी मोठी बनते की, तिचं पात्र ओलांडण्यासाठी होड्यांतून जाव लागतं. सीना पुढे भीमेला मिळते आणि भीमा कृष्णेला.
सीना ही काही बारमाही नदी नाही. शिवाय हा पर्जन्यछायेचा प्रदेश. पण इथं राजधानी वसवण्याचा निर्णय घेतल्यावर अहमद निजामशहानं मोठय़ा कल्पकतेनं पाणी योजना तयार केल्या. नगर शहराच्या पूर्वेला आणि उत्तरेला पसरलेल्या गर्भगिरीच्या डोंगरमाथ्यावर पडणारा पाऊस फारसा नसला, तरी हे पाणी अडवून आपल्या राजधानीसाठी वापरता येईल, हे निजामशहाच्या लक्षात आलं.

पाचशे वर्षांपूर्वीचा तो काळ होता. तेव्हा आजच्या सारखी वीज नव्हती, पाणी उपसणारे पंप नव्हते; पण दांडगी इच्छाशक्ती आणि कल्पनाचातुर्य तर होतं. जमिनीचा उतार आणि गुरुत्वाकर्षणाच्या विचार करून पाणी योजनांचा आराखडा तयार करण्यात आला. सभोवताली डोंगर आणि मधल्या बशीसारख्या भागात नगर शहर. डोंगरावर पडणार्‍या पावसाचा थेंब अन् थेंब अडवून त्याचे झिरपे एकत्र करून हे पाणी तलावात साठवलं जाई. तलावांच्या खालच्या बाजूस विहिरी खोदण्यात आल्या. या विहिरींतील पाणी बैल आणि हत्तीच्या मोटा लावून उपसलं जाई. नंतर ते खापरी नळांतून नगर मधील वेगवेगळ्या मोहल्ल्यांना, महालांना आणि मशिदींना पुरवलं जाई. चौकाचौकांत पाणवठे होते. त्यांना ‘कारंजी’ म्हणत. मोठय़ा वाड्यांमध्ये नळाचं पाणी येई, तर सर्वसामान्य या कारंजावर पाणी भरत. माळीवाडा, हातमपुरा, ख्रिस्तगल्ली आदी भागात अशी कारंजी अजूनही अस्तित्वात आहेत. चौपाटी कारंजा, लक्ष्मीकारंजा, आनंदी कारंजा, बारातोटी कारंजा ही नावं विशेष प्रसिद्ध आहेत.
नगरच्या संस्थापक अहमद निजामशहाने सलाबतखान, इख्तियार खान, कासीम खान, सिद्दी समशेरखान या सरदारांकडून खापरी नळ योजना तयार करून घेतल्या. वडगाव आणि कापूरवाडी नळ हे ‘बादशाही नहर’ म्हणून ओळखले जात. वडगाव नळाचे पाणी नगर शहराच्या पश्चिमेकडील भागाला आणि राजवाड्याला पुरवलं जायचं. हश्त-बेहश्त महालाला शेंडी नळानं पाणीपुरवठा केला जायचा.
वडगाव नळ तयार करणारे होते निंबळकचे रेवजी राजापुरे. ही नळयोजना तयार केल्याबद्दल निजामशहाने त्यांना निंबळकची जहागिरी देऊ केली. पेशव्यांनी पुन्हा सनद देताना या गोष्टीचा उल्लेख केला होता. व्यवसाय गवंड्याचा म्हणून राजापुरे नंतर ‘गवंडे’ म्हणून ओळखले जाऊ लागले. याच गवंडेंच्या वंशजांनी पुढे पुण्यात शनिवारवाडा बांधला, असा उल्लेख नगरचे इतिहासकार सरदार मिरीकरांच्या ग्रंथात आहे.
कापूरवाडी तलाव अहमदशहाच्या काळात तयार झाला. या तलावाचं आणि नागरदेवळे येथील नागाबाई नळाचं पाणी किल्ल्याला पुरवलं जायचं. मोगलांनी किल्ला घेतल्यानंतर सज्रेखान नावाच्या सरदारानं या नळांची दुरुस्ती केली. काही खापरी नळ खंदक आणि तटबंदीतून आत नेऊन महालांसाठी पाणी पुरवलं गेलं होतं. किल्ल्यातील उद्यानं आणि कारंजांसाठी हे पाणी वापरलं जाई.

या नळांमधून येणारं पाणी नियंत्रित करण्यासाठी व्हॉल्व्ह बसवण्यात आले होते. पण आता असतात तसे ते लोखंडी नव्हते, तर दगडी होते. विशिष्ट पद्धतीने दगड फिरवला की, पाण्याचा प्रवाह सुरू व्हायचा. अशा प्रकारचा व्हॉल्व्ह किल्ल्याच्या खंदकात पहायला मिळतो. किल्ल्यात पाणी कमी पडू नये म्हणून गंगा, जमना, शक्करबाई आणि मछलीबाई अशा चार विहिरी खोदण्यात आल्या होत्या. खंदकातही एक छोटी विहीर आहे.
निजामशाहीत नगरची तुलना तेव्हा जगप्रसिद्ध असलेल्या बगदाद आणि कैरो या शहरांशी केली जात असे. याचं महत्त्वाचं कारण नगरला असलेल्या खापरी पाणी योजना, कारंजी आणि इथे बांधलेले जलमहाल. युरोपातील व्हेनिसमध्ये जशा होड्या चालतात, तसं दृश्य हश्त-बेहश्त आणि फराहबक्ष महालाभोवतीच्या तलावांत पहायला मिळायचं. हिंदुस्थानातील व्हेनिस असंही नगरला म्हटलं जाई.
फराहबक्ष महालासाठी भिंगार नळ तयार करण्यात आला होता. सलाबतखान गुर्जी आणि न्यामतखान दख्खनी या सरदारांनी ही पाणी योजना तयार केली. भिंगारच्या पुढे डोंगराच्या पायथ्याशी शहापूर हे गाव आहे. या गावाजवळ ओढय़ाचं पाणी अडवून त्याचा वापर या नळासाठी करण्यात आला होता. पाथर्डी रस्त्यानं जाताना शहापूरच्या मशिदीजवळ या नळांचे अवशेष दिसतात.

निजामशाही आणि नंतर मोगलांच्या काळात नगरला पाणी पुरवण्यासाठी तब्बल 15 खापरी नळ योजना होत्या. वडगाव, कापूरवाडी, भिंगार, शहापूर, आनंदी, नागाबाई, शेंडी, वारूळवाडी आणि भवानीपंत या नळांचं पाणी अनेक दशके नगरकरांना मिळालं. त्या तुलनेत नेप्ती, निमगाव, इमामपूर, पिंपळगाव, भंडारा, नागापूर हे नळ कमी आयुष्य असलेले ठरले. नालेगावातील हिरवेगल्लीत भवानीपंतांचा वाडा आहे. तेथील चौकात खापरी नळाचे अवशेष अजून आहेत.
नगरच्या संग्रहालयात खापरी नळ योजनांचा नकाशा पहायला मिळतो. सुमारे 8 ते 10 मैलांवरून हे पाणी कसं आणलं गेलं होते, याची कल्पना त्यावरून येते. नगर शहरात अनेक ठिकाणी जुन्या पाणी योजनांचे अवशेष दिसतात. सिद्धिबागेच्या थोडं पुढं न्यू आर्टस् कॉलेजसमोर असलेल्या जॉगिंग पार्कमध्ये गोलाकार मनोरा दिसतो. हा मनोरा म्हणजे खापरी नळ योजनेचा उसासा आहे. तारकपूर भागात मिस्किन मळा रस्त्यावर ओढय़ाच्या पात्रात मोठा खापरी नळ आहे. तो आता तुटला असला, तरी पावसाळ्यात त्यातून पाणी वाहताना दिसतं. र्शद्धाळू नगरकरांनी या नळाला शेंदूर फासून त्याचा देव बनवून टाकला आहे.

जिल्हाधिकारी जेथे राहतात, त्या कासीमखानी महालाला, तसंच त्याच्या अलीकडे असलेल्या पारशी समाजाच्या अग्यारीलाही खापरी नळानं पाणीपुरवठा केला जात असे. अग्यारीच्या आवारात असलेल्या विहिरीला नेहमी भरपूर पाणी असतं.
निजामशाहीत बंधारे आणि कालवेही बांधण्यात आले होते. नगरपासून 17-18 किलोमीटर अंतरावर असलेला भातोडी तलाव त्या काळातीलच आहे. नंतर ब्रिटिशांनी त्याची दुरुस्ती केली. मीरावली पहाडाकडे जाणार्‍या रस्त्यावर गालिबखानी नावाचा तलाव होता.

नगरच्या बहुतेक वाड्यांमध्ये आड होते. काळाच्या ओघात अनेक आड बुजवले गेले. त्यावर आता फ्लॅटस्चे इमले उभे राहिले आहेत. ‘मैदान आड’सारखी नावच उरली आहेत. पाणीपुरवठय़ासाठी पूर्वीच्या सत्ताधिशांनी मोठय़ा बारवा खोदल्या होत्या. जामखेड रस्त्यांवरील ‘हत्ती बारव’ ही नगर शहरातील सर्वात मोठी बारव. नालेगाव भागात नेप्ती रस्त्यावर बाळाजी बुवा या साधूपुरुषांच्या नावाने ओळखली जाणारी बारव आहे. या बारवेतून बरीच वर्षे पाणीपुरवठा केला जात होता. कापूरवाडी तलावाच्या वरच्या बाजूला एक वैशिष्ट्यपूर्ण विहीर आहे. तिच्या आतमध्ये पाण्याच्या ‘इनलेट’ आणि ‘आउटलेट’ची व्यवस्था आहे. डोंगरात गॅलरीज तयार करून ते पाणी चॅनेलाईज करून या विहिरीत एकत्र केलं जाई आणि नंतर ते शहराला पुरवलं जाई. यातील काही ‘अँक्वाडक्ट’ आणि उसासे परिसरातील शेतात पहायला मिळतात.

निजामशाही 1636 मध्ये लयाला गेली. पुढे मोगल, मराठे, पेशवे इथे राज्य करून गेले. नंतर आलेल्या ब्रिटिशांना दुष्काळाचा मोठा सामना करावा लागला. 1854 मध्ये नगरला पाणी पुरवण्याची जबाबदारी नगरपालिकेवर आली. जुन्या काळातील खापरी नळ योजना आणि अँक्वाडक्ट दुरुस्त करून जमेल तितका पाणीपुरवठा नगरपालिका करू लागली. जुन्या 15 नळांपैकी 7 नळ पडीक अवस्थेत होते. शेवटी शेवटी वडगाव, नागाबाई आणि कापूरवाडी एवढेच नळ चालू राहिले. जवळपासच्या खासगी विहिरींवर मोटा सुरू करून ते पाणी लोकांना पुरवलं जाऊ लागलं, पण दरदिवशी दरमाणशी 8 गॅलनपेक्षा कमी पाणी मिळे. शिवाय मोटेसाठी करावा लागणारा खर्च तुलनेनं जास्त होता. तेव्हा नगरची लोकवस्ती 28-29 हजार होती. इतक्या लोकांना पाणी देण्यासाठी कायमस्वरूपी योजनेची गरज भासू लागली. नगरपालिकेचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पॉटिंजर यांच्या अध्यक्षतेखाली वॉटर कमिटी नेमण्यात आली. 1875 मध्ये या कमिटीने अभ्यास करून वडगाव, कापूरवाडी, नागाबाई, आनंदी आणि नेप्ती या नळांची दुरुस्ती कशी करता येईल, त्यासाठी किती खर्च येईल, याचा तपशीलवार अहवाल सादर केला. परंतु नंतर पर्यायी पाणी योजना तयार करण्याच्या निष्कर्षाप्रत सर्वजण आले.
1888 मध्ये भातोडी तलावातून नगर शहराला पाणी पुरवण्याचा प्रस्ताव पुढे आला. या योजनेसाठी 2 लाख रुपये खर्च येईल, असे सरकारने कळवले. तथापि, इतके पैसे नसल्याने तो बारगळला. नगरच्या पश्चिमेस असलेल्या करपरा नदीवर धरण बांधून ते पाणी शहराला देण्याचाही प्रस्ताव नगरपालिकेने सरकारकडे पाठवला होता.
1891-92 हे वर्ष दुष्काळाचं होतं. वडगाव नळाचं पाणी एका विहिरीत घेऊन पंपिंग करून ते उंच टाकीत चढवण्याची योजना तेव्हा तयार केली गेली. 1894-95 मध्ये संमत झालेली ही योजना 1899-1900 मध्ये पूर्ण झाली. त्यावर 1 लाख 16 हजार रुपये खर्च झाला. अप्पू हत्ती पुतळ्याजवळ असलेली लालटाकी तेव्हा बांधण्यात आली. आता तिथे पंडित नेहरूंचा पुतळा आहे.

1901-02 च्या दुष्काळात कापूरवाडी तलावाचं काम करण्यात आलं. या तलावाची भिंत वाढवून उंच करण्यात आली. 28 फूट खोल पाणी साचू लागलं. त्यातून पाणी मिळू लागल्यानं शहराचा बराचसा प्रश्न सुटला. या योजनेवर त्याकाळी 5 लाख रुपये खर्च झाला. लोकवस्ती जशी वाढू लागली, तसं कापूरवाडीचं पाणी पुरेना. मग सीनापात्रात विहिरी खोदून ते पाणी पुरवलं जाऊ लागलं. 1913 नंतर सरकारने सीनानदीवर असलेल्या पिंपळगाव माळवी गावाजवळच्या तलाव मोठा करून त्यातून पाणीपुरवठा करण्याची योजना मांडली. 1920 मध्ये हे काम पूर्ण झालं. आधी 7 लाख 75 हजार रुपये खर्च अपेक्षित होता, पण युद्धजन्य परिस्थिती आणि महागाईमुळे हा आकडा 17 लाख 85 हजारांवर गेला. 20 जानेवारी 1922 पासून नगरकरांना रोज सकाळी व दुपारी पाणी मिळू लागलं. रा. ब. हिवरगावकर हे नगरपालिकेत इंजिनिअर म्हणून आल्यानंतर त्यांनी या योजनेत विशेष लक्ष घातलं. 1931 पासून पिंपळगाव पाणी योजना नगरपालिकेच्या ताब्यात आली. 50 हजार लोकवस्तीला दररोज डरडोई 20 गॅलन पाणी मिळू लागलं. तेव्हा ओव्हरहेड टाक्या फारशा नव्हत्या. त्यामुळे घरापुढे खड्डय़ात नळ घेऊन त्यात उतरून पाणी भरावं लागे. महिलांना त्याचा खूप त्रास होई. त्यामुळे नगरमध्ये मुलगी देताना वधुपिता शंभरदा विचार करत असे.

दुसर्‍या महायुद्धाच्या काळात 20 हजार सैनिकांचा तळ नगरच्या दिल्ली दरवाजाबाहेर पडला होता. या कॅम्पसाठी पाण्याची व्यवस्था करणं तर गरजेचं होतं. त्यांच्यासाठी म्हणून सीनानदी, सुतारनाला आणि जामगाव नाल्याच्या संगमावर एक मोठी विहीर खोदण्याचं ठरलं. भुतकरवाडीजवळ ही विहीर तयार झाली. अर्थात ही योजना पूर्ण व्हायला 1954 हे वर्ष उजाडलं. पिंपळगाव तलावातलं पाणी दुष्काळात कमी पडे. डोंगरगण परिसरातील नाला वळवून त्याचं पाणी या तलावात आणण्याची योजना 1946 मध्ये आखण्यात आली. दुष्काळी निधीतून हे काम करण्याचे ठरलं. नंतर पैसा कमी पडला. पुढे 1954 मध्ये र्शमदान करून हा नाला तयार करण्यात आला.
नगरच्या पाण्याची समस्या दूर झाली ती मुळा धरणाच्या उभारणीनंतर. या धरणाची योजना 1864-66 पासून विचाराधीन होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1954 मध्ये मुळा धरणाचा प्रस्ताव सादर केला गेला. तेव्हा धरण वंजारवाडी इथं बांधण्याचं प्रस्तावित होतं. पुढे त्यात बदल होऊन 1970 मध्ये धरण पूर्णत्वाला गेलं.
संस्कृती वाहत्या नदीसारखी असते. मागच्या पाच शतकांत बरचसं पाणी नगरच्या लोखंडी पुलाखालून वाहून गेलं. काळाच्या ओघात काही गोष्टी हरवून गेल्या, तर काहींची नव्यानं भर पडली. येणार्‍या नव्या पिढींशी मिळतंजुळतं घेऊन नगरची संस्कृती बदलते आहे, बहरते आहे..