आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असाही स्वातंत्र्यसैनिक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात जसा येथील भूमिपुत्रांचा सहभाग होता, तशीच बहुमोल मदत काही ब्रिटिशांकडूनही झाली. ब्रिटिशांच्या सैन्यात असूनही भारतीय क्रांतिकारकांना आणि इथल्या पिचलेल्या जनतेला मदत करणारी एक व्यक्ती तेव्हा नगरमध्ये होती. क्लाईव्ह ब्रॅन्सन हे त्या सैनिकाचे नाव. क्लाईव्हच जरी ब्रिटिश असले, तरी त्यांचा जन्म (८ सप्टेंबर १९०७) अहमदनगरला झाला असल्यानं त्यांना भारतीयांविषयी, या देशाविषयी मनस्वी प्रेम होतं. लहानपणीची दोन वर्षे त्यांची नगरमध्ये गेली. त्यांचे वडील सैन्यात मेजर होते, तर आजोबा मंुबईत बॅरिस्टर होते. पुढे तब्बल ३५ वर्षांनी ब्रॅन्सन नगरला परत आले ते ब्रिटिश सैनिक म्हणून. कम्युनिस्ट चळवळीतले असल्याने त्यांना ब्रिटिश सत्तेबद्दल प्रचंड चीड होती. भारताला स्वातंत्र्य मिळावं, म्हणून त्यांची रात्रं-दिवस धडपड चाले. बंगालच्या दुष्काळ निवारणासाठी त्यांनी तेव्हा सव्वातेरा लाखांची मोठी रक्कम गोळा करून पाठवली होती. नगरमधील क्रांतिकारकांना, कम्युनिस्ट कार्यकर्त्यांना ते आठवड्याला २५०-३०० रूपये देत असत. 
 
ब्रॅन्सन हे इंटरनॅशल ब्रिगेडचे संस्थापकही होते. स्पॅनिश सिव्हील वॉरमध्ये लढलेल्या या ब्रिगेडचे पंडित नेहरूंनीही कौतुक केले होते. ब्रॅन्सन हे उत्तम चित्रकार आणि कवीही होते. आंतरराष्ट्रीय चित्रकार संघटना त्यांनी स्थापन केली होती. इंग्लंडमधील मजूर पक्षाचे स्ट्रॅफर्ड क्रिप्स यांचे ते निकटचे स्नेही होते. भारताला स्वातंत्र्य देण्याबाबत तयार केलेल्या इंडिया बिलाची तयारी ब्रॅन्सन यांनीच करून दिली होती. 
 
दुसरं महायुद्ध पेटलं, तेव्हा ब्रॅन्सन नगरमध्ये होते. भारतीय चित्रकला शिकण्याच्या निमित्तानं त्यांची नगर येथील प्रसिद्ध कलाशिक्षक मराठीतील पहिले व्यंगचित्रकार र. बा. केळकर (प्रगत कला महाविद्यालयाचे संस्थापक) यांच्याशी मैत्री जमली. र. बा. ऊर्फ नानाही स्वातंत्र्यासाठी धडपडत असल्याने त्यांचे गोत्र चांगलेच जमले. नानांच्या माध्यमातून ब्रॅन्सन यांनी क्रांतिकारकांना बहुमोल मदत केली. चले जाव आंदोलनाच्या वेळी क्रांतीचा वणवा पेटला. तो शमवण्यासाठी दिसेल त्याला गोळ्या मारण्याचा आदेश ब्रिटिश सरकारने दिला होता. तथापि, ब्रॅन्सन यांच्यामुळे असा प्रसंग नगरमध्ये ओढावला नाही. ब्रॅन्सन नानांना म्हणाले होते - ‘भारतीय माणसाच्या रक्ताचा एक थेंबही येथे सांडला, तर मी पहिला बळी ब्रिगेडियरचा घेईन...’ 
 
आराकान आघाडीवर लढताना जपान्यांच्या हल्ल्यात ब्रॅन्सन मारले गेले. त्यांची पत्रे पत्नी नोरा ब्रॅन्सन यांनी प्रसिद्ध केली. त्याच्या लाखो प्रती इंग्लंडमध्ये खपल्या. त्याचा परिणाम म्हणून तिथे सत्तांतर होऊन मजूर पक्ष सत्तेवर आला आणि भारतीय स्वातंत्र्याचा मार्ग सुकर झाला. या स्वातंत्र्यसैनिकाचे स्मरण १५ ऑगस्टच्या निमित्ताने नगरकरांनी करायलाच हवे...
बातम्या आणखी आहेत...