आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भुतवडा जोडतलावाचे काम मार्चपर्यंत पूर्ण करा - अजित पवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जामखेड / कर्जत - कुकडीच्या पोटचार्‍याच्या कामासाठी दहा कोटी रुपये मंजूर करून जामखेड तालुक्यातील भुतवडा जोडतलाव आणि अमृतलिंग लघू पाटबंधारे तलावांची अपूर्ण कामे मार्च 2014 पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित विभागाला बुधवारी (11 सप्टेंबर) मुंबईत मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.

पालकमंत्री मधुकर पिचड, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार, राजेंद्र फाळके, सचिन जगताप, नानासाहेब निकत, राजेंद्र गुंड, राजेंद्र गुंड, निती धांडे, सोनाली बोराटे आदी यावेळी उपस्थित होते. भुतवडा जोडतलाव आणि अमृतलिंग लघू पाटबंधारे या दोन्ही तलावांच्या कामाला प्रारंभ 6 मे 1999 रोजी झाला होता. परंतु चौकशीच्या ससेमिर्‍यात अडकलेल्या या दोन्ही तलावांची कामे 14 वर्षांनंतरही पूर्ण होऊ शकलेली नाही. उपमुख्यमंत्री पवार यांनी या प्रश्नी लक्ष घालून हे काम पूर्ण करण्याची डेडलाइन निश्चित केल्याने जलसंपदा विभाग सर्व प्रशासकीय बाबी पूर्ण करून दोन्ही तलावांची कामे पूर्ण करेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

राज्य सरकारने कृष्णा खोर्‍याच्या सीना उपखोर्‍यातील पाण्याचा पूर्णत: व सुयोग्य वापर मे 2000 अखेर करण्याचे प्रस्तावित होते. त्या अनुषंगाने 7 जानेवारी 1999 रोजी तत्कालीन पाटबंधारेमंत्री व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ खडसे यांनी भुतवडा जोडतलाव व अमृतलिंग लघू पाटबंधारे तलावाचा सर्व्हे करण्याचे आदेश दिले. 6 मे 1999 रोजी या तलावांच्या प्रत्यक्ष कामास प्रारंभ झाला होता. मात्र, 14 वर्षांनंतरही ही कामे अपूर्ण आहेत. भुतवडा जोडतलावाच्या मुख्य भरावाचे काम करण्यासह जुन्या भुतवडा तलावाच्या सांडव्याची उंची 0.55 मीटरने वाढवण्याचे काम पूर्ण झाले. मात्र, दोन्ही तलाव एकमेकांना जोडणार्‍या कालव्याचे खोदकाम पूर्ण झालेले नाही. या कालव्यावरील पुलाचे काम बाकी आहे. कालव्याचे कामही अपूर्ण आहे. या कामाचा सुधारित अंदाजपत्रकीय खर्च दुपटीने वाढला असून मूळचा 3 कोटी 22 लाख 62 हजारांचा खर्च, आता 5 कोटी 49 लाखांवर गेला आहे. आजपर्यंत या कामांवर 2 कोटी 84 लाख रुपये खर्च झाला. सहा महिन्यांपूर्वी पुण्याच्या चंद्राई कन्स्ट्रक्शन या कंपनीस हे काम करण्यास सांगूनही हे काम पूर्ण न झाल्याने या ठेकेदारांवर दररोज दंड ठोठावला जात आहे.

अमृतलिंग लघू पाटबंधारे तलावाच्या कालवा विहिरी व कालव्याचे काम अपूर्ण आहे. या तलावाचे उर्वरित काम संबंधित ठेकेदार करत नसल्याने सुधारित दरसूचीप्रमाणे पुन्हा प्रस्ताव पाठवण्याची वेळ जामखेडच्या लघू पाटबंधारे उपविभागावर आली आहे. या कामाचा मूळचा खर्च 1 कोटी 68 लाख 36 हजार 597 रुपये होता. तो खर्च आता आज दुपटीने वाढून 4 कोटींच्या पुढे गेला आहे. या दोन्ही तलावांची कामे पूर्ण झाल्यास या तलावांमध्ये 104.95 दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणार असून याद्वारे जामखेडसह भुतवडा, जामवाडी, तसेच खर्डा गावास पाणीपुरवठय़ासाठी फायदा होणार आहे. तसेच वरील गावांतील सुमारे 515 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.