आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोठ्या गणेशमूर्तींना मागणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गणेशोत्सव अवघ्या आठ दिवसांवर येऊन ठेपल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची लगबग वाढली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत दरात २५ टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी मोठ्याच मूर्ती खरेदीकडे मंडळांचा कल आहे. शहरातील अनेक कारखान्यांमध्ये सध्या मूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली आहे.
बच्चे कंपनीसह सर्वजण सध्या लाडक्या गणरायाची आतुरतेने वाट पहात आहेत. ही प्रतीक्षा आठ दिवसांत संपेल. २९ आॅगस्टला गणेशोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यासाठी जय्यत तयारी विविध सार्वजनिक मंडळांनी केली आहे.

शहरात गणेशमूर्तींचे सुमारे १२५ कारखाने आहेत. या कारखान्यांमध्ये वर्षभर मूर्ती तयार करण्याचा उद्योग सुरू असतो. नाशिक, आैरंगाबाद, पुणे आदी ठिकाणी नगरच्या मूर्ती पाठवल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिस, रंग, काथ्या यासह इतर साहित्याचे दर वाढल्याने यंदा मूर्तींच्या दरात २५ टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. महागाई असली, तरी गणेशोत्सवाचा आनंद तसूभरही कमी झालेला नाही.

कल्याण रस्त्यावर असलेल्या कारखान्यांमध्ये मूर्ती खरेदीसाठी गर्दी झाली आहे. पंधरा ते वीस दिवस अगोदरच मूर्ती निवडून बुकिंग केले जाते. २० रुपयांपासून ४० हजार रुपयांपर्यंत विविध आकारांतील देखण्या गणेशमूर्ती या कारखान्यांत उपलब्ध आहेत. कारखान्यांमध्ये मूर्तींच्या रंगरंगोटीला वेग आला आहे. यंदा प्रामुख्याने जय मल्हार, माऊली, श्रीमंत दगडूशेठ, लालबागचा राजा आदी प्रकारांतील मूर्तींना जास्त मागणी आहे. मागील वर्षी दहा फुटांवरील मूर्ती नेणाऱ्या गणेश मंडळांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच होती. यंदा मात्र तेरा फुटांपर्यंत मूर्ती खरेदी करणाऱ्या मंडळांची संख्या वाढल्याचे मूर्तिकार, तसेच व्यावसायिकांनी सांगितले.
‘जय मल्हार’ची धूम
मराठी मनोरंजन वाहिनीवर सध्या जय मल्हार मालिकेची धूम आहे. या पार्श्वभूमीवर अनेक मूर्तिकारांनी ‘जय मल्हार’ गणेशमूर्ती साकारली आहे. या मूर्तीला विशेष पसंती मिळत असल्याने मागणीनुसार पुरवठा करण्यात कारखानदारांचीही दमछाक होत आहे. या मूर्ती तीन फुटांपासून सहा फुटांपर्यंत उपलब्ध आहेत.
पेणहून आणतात मोठ्या मूर्ती
यंदा मोठ्या गणेशमूर्तींना वाढती मागणी आहे. तथापि, भांडवलाअभावी शहरातील कारखान्यांत दहा फुटांवरील मूर्ती तयार केली जात नाही. पेण येथून कोऱ्या (रंग नसलेल्या) मोठ्या मूर्ती आणून त्यांना रंगरंगोटी केली जाते. कच्चा माल महागल्याने काही प्रमाणात दरवाढ झाली आहे.” भरत निंबाळकर, जिल्हाध्यक्ष, श्रीगणेश मुर्तिकार संघटना.
नगरचा मूर्ती उद्योग अडचणीत
नगरमधील गणपती राज्यभर विक्रीसाठी पाठवले जात. परंतु अाता स्थिती बदलली आहे. नगरचे गणेशमूर्तींचे पट्टीचे कारागीर इतर जिल्ह्यांतील व्यावसायिकांनी पळवले आहेत. तसेच या क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाल्याने नगरचा मूर्ती उद्योग अडचणीत आला असून घडाईपेक्षा मढाई अधिक करावी लागत आहे.”
अशोक देशमुख, मुर्तिकार.