आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भिंगारमध्ये पुन्हा दुचाकी जाळण्याचे सत्र

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - भिंगारमध्ये दुचाकी जाळण्याचे सत्र पुन्हा सुरू झाले. दीड वर्षापूर्वी अज्ञात व्यक्तीने वाहने जाळली होती. त्या आरोपीचा शोध अद्यापही लागलेला नाही. गुरूवारी पहाटे दीडच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने तीन दुचाकी वाहने जाळली. त्यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
 
भिंगारमधील सेनापती बापट मार्गावर रहात असलेल्या ज्ञानदेव कडू यांनी त्यांची स्कुटी पेप घरासमोर बोळीमध्ये लावली होती. मध्यरात्री अज्ञात व्यक्तीने पेट्रोल टाकून ती पेटवून दिली. तेथून जवळच असलेल्या ब्राह्मणगल्लीत राहणाऱ्या पियुष उपाध्ये यांच्या घरासमोरही असाच प्रकार झाला. उपाध्ये यांच्या घराला ग्रीलचे प्रवेशद्वार आहेत. उपाध्ये यांनी त्यांच्या सुझुकी अॅक्सेस स्पिरिट या दुचाक्या घरासमोरील रस्त्यावर लावल्या होत्या. उपाध्ये यांचा मोठा भाऊ हॉलमध्ये झोपला होता. रात्री दीडच्या सुमारास त्याला खिडकीतून गरम झळा लागल्यामुळे जाग आली.

खिडकीतून बाहेर पाहिले असता वाहनांनी पेट घेतल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा करत बाहेर धाव घेतली. पाणी टाकून घरातील सदस्यांच्या मदतीने त्यांनी वाहनांना लागलेली आग शमवली. मात्र, तोपर्यंत वाहनांचे बरेच नुकसान झाले होते. या घटनेमुळे घरासमोर गर्दी झाली.
या घटनेची माहिती समजल्यानंतर भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक कैलास देशमाने सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. कडू यांची दुचाकी ज्याठिकाणी जाळली, त्याजवळच एक कापडाचा बोळा सापडला. बोळ्याला पेट्रोलचा वास येत होता. पेट्रोलचे बोळे टाकून वाहने जाळली असल्याचा संशय व्यक्त होत आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवला असून तपास सुरू आहे.
 
बातम्या आणखी आहेत...