आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Biometric Attendance Machine Investigation Demand Nagar

बायोमेट्रिक हजेरी यंत्र खरेदीची चौकशी करा..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरीप्रणाली बसवण्यासाठी जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला ठेका देण्यात आला. शिवाय पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता कंपनीला 87 लाख 57 हजार रुपये देण्यात आले. याप्रकरणी झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य संभाजी दहातोंडे यांनी लोकायुक्तांकडे केली.

दहातोंडे म्हणाले, संगमनेर तालुक्यात प्राथमिक शाळांमध्ये बायोमेट्रिक हजेरी यंत्र बसवण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी अरिथमॅटिक सिस्टिम आणि टेक्नॉलॉजी (पुणे) या कंपनीशी सरकारने करार केला आहे. परंतु कंपनीचा मागील अनुभव विचारात घेऊन जिल्हा परिषदेने या कंपनीला 2011 मध्ये काळ्या यादीत टाकले. असे असतानाही कंपनीला कार्यारंभ आदेश देण्यात आले.

संगमनेर तालुक्यात बायोमेट्रिक यंत्र बसवण्यासाठी 1 कोटी 75 लाख 15 हजार रुपये उपलब्ध झाले आहेत. राज्यात पहिल्या टप्प्यात सहा तालुक्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ही यंत्रणा बसवण्याचे काम सुरू आहे. एका यंत्रासाठी 33 हजार 200 रुपये व सॉफ्टवेअरसाठी 1 हजार 900 रुपये खर्च येणार आहे. संगमनेर तालुक्यातील 350 शाळांमध्ये 488 बायोमेट्रिक यंत्र बसवण्यात येणार होते. पैकी 46 शाळांचे 14 यंत्र गटशिक्षणाधिकारी कार्यालयात धूळ खात पडून आहेत.

तरीही संबंधित कंपनीला 87 लाखांचे वाटप करताना पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले गेले नाही. त्यामुळे या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी व तत्कालीन मुख्य लेखा व वित्त अधिकार्‍यांची चौकशी करण्याची मागणी लोकायुक्तांकडे केली, असे दहातोंडे यांनी सांगितले. बायोमेट्रिक हजेरीवरून यापूर्वी सर्वसाधारण सभेतही वादंग झाले होते.