आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Biometric Machine Purchasing Issue In Ahmednagar Z P

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बायोमेट्रिक यंत्र खरेदीवरून गोंधळ; जि.प.सभेत अधिकारी निरुत्तर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- पदाधिकारी व सदस्यांना विश्वासात न घेता 13व्या वित्त आयोगातून संगमनेर तालुक्यातील शाळांमध्ये 1 कोटी 75 लाख रुपयांचे 480 बायोमेट्रिक यंत्र खरेदी करण्यात आले. तालुक्यातील एकाही शाळेत हे यंत्र बसवण्यात आलेले नाही. संबंधित कंपनीला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या सदस्यांनी केली. अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी हा प्रकार चुकीचा झाला असल्याची टिप्पणी करून अधिकार्‍यांची कानउघाडणी केली.

जिल्हा परिषदेची अंदाजपत्रकीय विशेष सभा सोमवारी लंघे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपाध्यक्ष मोनिका राजळे, सभापती बाबासाहेब तांबे, शाहूराव घुटे, हर्षदा काकडे, मुख्यकार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र पाटील, सचिव जगन्नाथ भोर, मुख्य लेखा व वित्त अधिकारी कृष्णकांत साळुंखे आदी उपस्थित होते.

सदस्य सत्यजित तांबे यांनी पावणेदोन कोटी रुपये खर्चून खरेदी केलेल्या बायोमेट्रीक यंत्राविषयी प्रश्न उपस्थित केला. बायोमेट्रीक यंत्रणा खरेदी करताना अधिकारी व पदाधिकार्‍यांना विश्वासात घेतले नाही. यासाठी खर्च केलेले पैसे सदस्यांचे आहेत. जुलै 2012 मध्ये मागणी केल्यापासून आजपर्यंत 10 महिन्यांचा अवधी उलटला, त्याची माहिती जिल्हा परिषदेकडे उपलब्ध नाही. गटविकास अधिकार्‍यालाही याबाबत माहिती नसल्याचे अहवालात म्हटले आहे. गटविकास अधिकारी, सदस्य व अधिकार्‍यांना अंधारात ठेवून या खरेदीमागे काय हेतू होता? हा विषय सर्वसाधारण व संबंधित विषय समितीसमोर का मांडला नाही, असा सवाल तांबे यांनी केला. यावर अग्रवाल म्हणाल्या, हा उपक्रम राबवण्यात आला. एकाही शाळेत अद्यापि ही यंत्रणा बसवण्यात आली. यावर अग्रवाल निरुत्तर झाल्या. याबाबत माहिती देण्यासाठी अधिकार्‍यांची धावपळ उडाली. लंघे यांनी हा प्रकार चुकीचा घडला असल्यीची टिप्पणी केली.

अग्रवाल यांनी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबवला असल्याचे सांगितले. या सर्व प्रकारामुळे सभागृहात गोंधळ झाला.

सदस्य दहातोंडे यांनी कत्तलखान्यांबाबत प्रश्न उपस्थित करून घोडेगाव बाजारातून जनावरे थेट कत्तल खान्यांकडे जातात. अनधिकृत कत्तलखान्यांवर कारवाईची मागणी केली. सदस्य पद्मा थोरात यांनी दूषित पाण्याच्या बाटल्या सभागृहाला भेट देऊन स्वच्छ पाणी द्यावे, अशी मागणी केली.

‘औटी’ नावाच्या टँकरला विरोध
पारनेर तालुक्यात आमदार विजय औटी यांचे नाव टँकरवर लिहून पाणीपुरवठा केला जात आहे. अशा पद्धतीने लोकप्रतिनिधींची नावे टँकरवर कशासाठी लिहिली जातात? कार्यकारी अभियंत्यांनी यासंदर्भात पाहणी करून संबंधित टँकरची बिले देऊ नयेत, अशी मागणी सदस्य सुजित झावरे यांनी केली. यावर अध्यक्ष यांनी अधिकार्‍यांची कानउघडणी करून टंचाई कालावधीत चुकीची पद्धत खपवून घेतली जाणार नाही, अशी तंबी दिली.

पालिकांनी थकवलेला जिल्हा परिषदेचा शिक्षण कर थकवला ही बाब गंभीर आहे. त्यामुळे पालिकांकडून तातडीने वसुली करावी, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष विठ्ठल लंघे यांनी अधिकार्‍यांना दिले.

जिल्ह्यातील नऊ नगर पालिकांसह महापालिका हद्दीत जिल्हा परिषदांच्या शाळा आहेत. पालिका घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कराबरोबर शिक्षण कर वसूल करते. परंतु, शाळांच्या प्रमाणात हा कर जिल्हा परिषदेला दहा वर्षांपासून जमा केला नाही. त्यामुळे पालिकांनी जिल्हा परिषदेचे 25 कोटी थकवले आहेत. याबाबत ‘दिव्य मराठी’ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध करून ही बाब निदर्शनास आणली. जिल्हा परिषदेच्या सोमवारी झालेल्या विशेष सभेत सदस्य बाळासाहेब हराळ यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला. तसेच सदस्य संभाजी दहातोंडे यांनी देखील अधिकार्‍यांना धारेवर धरून शिक्षण कर वसुलीत हलगर्जीपणा करत असल्यांचा आरोप केला. जिल्हा परिषदेने पाणी पट्टी थकवली होती, तेव्हा पालिकेने पाण्याचे टँकर बंद केले होते. त्यामुळे महापालिकेकडून तातडीने शिक्षणकर वसूल करावा, अशी मागणी सदस्यांनी केली. यावर लंघे म्हणाले, पालिकेला जिल्हा परिषदेकडून देणे असल्यास देऊन टाकू, पण त्यांच्याकडून शिक्षण कर वसूल व्हायला हवा. यासंदर्भात कार्यवाही करावी असे आदेश लंघे यांनी दिले.