नगर - अन्नधान्यपुरवठा यंत्रणेत शंभरपैकी ९८ जण चांगले काम करतात. एखादी व्यक्ती चुकीची वागत असेल, तर तिला वठणीवर आणण्यासाठी कडक कायदे केले जातील, अशी तंबी अन्न नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी रविवारी दिली.
राज्यात प्रथमच सुरू करण्यात आलेल्या बायोमेट्रिक पद्धतीने धान्यवाटपचे उद्घाटन मंत्री बापट यांच्या हस्ते क्लेरा ब्रुस हायस्कूलच्या मैदानावर झाले. याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खासदार दिलीप गांधी, आमदार विजय औटी बाळासाहेब मुरकुटे, माजी आमदार चंद्रशेखर कदम, अभय आगरकर, जिल्हाधिकारी अनिल कवडे आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले, मंत्री झाल्यावर अभ्यास केल्यानंतर अन्नधान्य वाटप व्यवस्थेत प्रत्येकजण प्रामाणिकपणे काम करत असल्याचे दिसून आले. त्यात दुकानदार, वाहतूकदार त्यांच्यावर लक्ष ठेवणार्या अधिकार्यांचे योगदान मोठे आहे. पक्ष, झेंडे वेगळे असले, तरी विकासाच्या मुद्द्यावर जनतेच्या हितासाठी सर्वजण एकत्र येत असल्याने मला त्याचा अभिमान आहे. मला दुकानदारांच्या अडचणी माहिती आहेत. धान्य वाहतुकीसह इतर कारणांनी दुकानदारांना घटीचा फटका बसतो. तथापि, वाममार्गाने नव्हे, तर राजमार्गाने पैसे कमावणे गरजेचे आहे. त्यामुळे बायोमेट्रिक वितरणाची योजना राबवण्याबरोबरच कमिशन वाढवून देण्याचाही निर्णय घेण्यात येणार आहे. पुढील काळात दुकानदारांच्या दारात धान्य उपलब्ध करून देण्यात येईल. ज्या पद्धतीने दारिद्र्यरेषेखालील जनतेला लाभ दिला जातो, त्याचप्रमाणे जे नागरिक दारिद्र्यरेषेवर असूनही गरीब आहेत त्यांचाही आम्ही विचार करत आहोत.
आमदार औटी म्हणाले, ग्रामीण भागातील जनतेला दैनंदिन कामामुळे रेशनकार्ड सांभाळणे कठीण असते. त्यामुळे ते दुकानदाराकडेच रेशन कार्ड ठेवतात. दुकानदारांचे ड्रॉवर कुपनांनी भरलेले असते. या प्रणालीसाठी पहिल्या टप्प्यात निवडलेली ९१ दुकाने नगर शहरातील आहे. पण माझा मतदारसंघ डोंगरी असल्याने तेथेही हा प्रकल्प राबवावा. सरकार आमच्याबरोबरच आहे, पण जनतेच्या वतीने ही मागणी मी करतो, असे औटी म्हणाले.
काय आहे बायोमेट्रिक?
बायोमेट्रिक वितरण प्रणालीत लाभार्थीच्या बोटाचा ठसा घेऊन धान्य देण्यात येईल. त्यामुळे कोणत्या दुकानातून कोणत्या लाभार्थीला किती धान्य वितरित झाले, याची माहिती जिल्हा पुरवठा कार्यालयाला ऑनलाइन उपलब्ध होईल. नगर शहरातील ९१ धान्य दुकानांत सुमारे लाख ७० हजार बायोमेट्रिक कार्ड आहेत. पहिल्या टप्प्यात १२ दुकानांत बायोमेट्रिक वितरणाचा प्रयोग केला जाणार आहे. उर्वरित दुकानांत दुसर्या टप्प्यात या पद्धतीने धान्य वितरण केले जाईल.
जिल्हा बँक महत्त्वाची...
राज्यात प्रथमच नगर शहरात बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वितरण सुरू करण्यात आले. याचे उद््घाटन पालकमंत्री राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली होणार होते. तथापि, शिंदे यांना जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी बोलवलेला मेळावा महत्त्वाचा वाटल्याने ते इकडे फिरकले नाहीत. आमदार बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, आमदार अरुण जगताप, शिवाजी कर्डिले, मोनिका राजळे,खासदार सदाशिव लोखंडे यांनीही कार्यक्रमाकडे पाठ फिरवली.