आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायोमेट्रिक पद्धतीने निराधारांना अनुदान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थींचा वेळ व पैसा वाचवण्यासाठी राज्य सरकारने एक पथदर्शी प्रकल्प हाती घेतला आहे. यानुसार संजय गांधी योजनेच्या लाभार्थींना बायोमेट्रिक यंत्राच्या मदतीने अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नगर जिल्ह्यातील 1 लाख 22 हजार 411 लाभार्थींना याचा लाभ होणार आहे.
राज्यातील निराधार, वृद्ध व्यक्ती, अंध, अपंग, शारीरिक व मानसिक आजारांनी त्रस्त व्यक्ती, निराधार विधवा, परित्यक्त्या आदींचे जीवनमान सुसह्य करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून राज्य सरकारच्या विशेष साह्य विभागाच्या वतीने अशा निराधार व्यक्तींना मासिक अर्थसाह्य दिले जाते. संजय गांधी निराधार अनुदान योजना, र्शावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना सध्या दरमहा 600 रुपये अनुदान दिले जात आहे.
परंतु, सध्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी निराधारांना राहत्या घरापासून दूर अंतरावर असलेल्या बँका अथवा पोस्टामध्ये जावे लागते. यामध्ये त्यांचा वेळ तसेच पैसादेखील खर्च होतो. निराधार व्यक्तींच्या या अडचणी दूर करण्यासाठी सरकारने आता बायोमेट्रीक पद्धतीचा वापर करायचा निर्णय हाती घेतला आहे. बायोमेट्रीक पद्धतीमध्ये लाभार्थ्यांच्या हाताच्या बोटाचे ठसे घेतले जातात. या प्रक्रियेद्वारे लाभार्थ्यांची ओळख पटवली जाते. यामुळे योजनेमध्ये पारदर्शकता येणार असून योग्य लाभार्थ्यांला अनुदान मिळण्यास मदत होणार आहे. या योजनेअंतर्गत यापुढे बँकेचे प्रतिनिधी लाभार्थ्यांच्या राहत्या घराजवळ जातील व बायोमेट्रीक यंत्राच्या साह्याने लाभार्थ्यांना अनुदान वाटप करतील. बँकेच्या प्रतिनिधीजवळ असलेल्या बायोमेट्रीक यंत्रावर आपल्या हाताच्या बोटाचा ठसा उमटवायचा आहे. त्यानंतर बँकेचे प्रतिनिधी लाभार्थ्यांना हवी असलेली रक्कम रोख स्वरुपात देणार आहेत. सर्व नागरिकांना आधार कार्ड मिळाल्यास निराधार योजनेतील लाभार्थ्यांंना या योजनेअंतर्गत अनुदान वाटप केले जाणार आहे.
बायोमेट्रीक योजना लोकाभिमुख व पारदर्शी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला जात आहे. त्यानुसार संजय गांधी योजना कार्यालयात संगणक पुरविण्यात आले असून सर्व योजनांना एकाच प्रणालीमध्ये जोडले जाणार आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर तयार करण्याचे काम देखील सुरु करण्यात आले आहे.
बायोमेट्रिक पद्धत राबवण्याची तयारी सुरू - जिल्ह्यातील सर्व निराधार लाभार्थींना लवकरच बायोमेट्रिक यंत्राद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. सध्या ही योजना बीड, कोल्हापूर व ठाणे जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याचा सरकारचा मानस आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून माहिती मागविण्याचे काम सुरु झाले आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.’’ रवींद्र जगताप, अप्पर जिल्हाधिकारी.
जिल्ह्यातील लाभार्थी
17, 802
संजय गांधी निराधार योजना.
57,034
सेवा योजना.
47,575
गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती योजना.
1,22,411
एकूण सर्व योजनांचे लाभार्थी.