आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तंत्रज्ञानाचा विकास झाला तरच महासत्ता; बिर्ला प्लॅनेटोरिअमचे डॉ.दुआरी यांचे प्रतिपादन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नगर शहराजवळ धनगरवाडी येथील एफर्ट्स प्लॅनेटोरिअम हे वैयक्तिकरीत्या साकारलेले देशातील पहिले तारांगण आहे. त्याच्या रूपाने जोगदे परिवाराने देशासमोर आदर्श ठेवला आहे, असे सांगत तंत्रज्ञानाचा असा जास्तीत जास्त विकास झाला, तरच भारत महासत्ता बनेल, असे कोलकाता येथील बिर्ला प्लॅनेटोरिअमचे संचालक डॉ. डी. पी. दुआरी यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात रविवारी या तारांगणाचे उद्घाटन झाले. या वेळी डॉ. दुआरी बोलत होते. नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझिअमचे संचालक आय. के. मुखर्जी, तारांगणाचे संचालक अशोक जोगदे, शास्त्रज्ञ अरविंद परांजपे, अरविंद रानडे, संदीप भट्टाचार्य आदी या वेळी उपस्थित होते.

डॉ. दुआरी म्हणाले, मी देशातील अनेक तारांगणे पाहिली आहेत, पण नगरचे तारांगण वेगळे आहे. आजचा कार्यक्रम केवळ उद्घाटनापुरता र्मयादित नाही, तर हा या परिसरातील विज्ञानाचा प्रारंभ आहे. विविध क्षेत्रांत प्रगती साधताना तंत्रज्ञानाचाही विकास करावा लागेल. तंत्रज्ञानाचा विकास झाला, तरच आपण महासत्ता होऊ.

मुखर्जी म्हणाले, एफर्ट अकॅडमीत केवळ प्रशिक्षण वर्ग नाही, तर इथे हवे ते शिकायला संधी आहे. परांजपे म्हणाले, मानवी शरीरात नेमके काय घडत असते, याचाही अनुभव तारांगणाच्या माध्यमातून घेता येतो. मुंबईतील नेहरू तारांगणात विद्यार्थ्यांसाठी विविध तज्ज्ञांची भाषणे होतात. ही भाषणे ऐकण्यासाठी आता तेथे जाण्याची गरज नाही, कारण नगरच्या अकॅडमीत ती उपलब्ध होतील. या कार्यक्रमास नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

विज्ञानावर खर्च करा..
मागील दोन वर्षे जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती, पण दुष्काळातही मंदिर बांधण्यासाठी एक ते दीड कोटी खर्च केला गेला. मंदिरांच्या संख्येत वाढ होते, पण विज्ञानाशी निगडित गोष्टींवर खर्च केला जात नाही, अशी खंत जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी व्यक्त केली.

आजपासून शो सुरू
तारांगण पाहण्यासाठी 95 रुपये शुल्क आहे. तारांगणाबरोबरच सायन्स पार्क व विज्ञानाच्या नियमांवर आधारित खेळणी पाहता येतील. सोमवारपासून (15 जुलै) सकाळी 11 ते रात्री 9 यावेळेत शो चालू असतील. प्रत्येक शो एक तासाचा असेल.

काय आहे तारांगणात
घुमटाकार हॉलमध्ये बसल्यानंतर वरच्या पडद्यावर तारांगण दिसते. आपण ग्रहांच्या जवळ जात आहोत, तसेच ते ग्रह आपल्याजवळ येत आहेत, असे भासते. आकाशातील तार्‍यांची नजाकत, त्याबरोबरच आकाशगंगेतील विविध चमत्कार, तार्‍यांची नेमकी स्थिती जवळून पाहता येते.

स्वत:च्या हिमतीवर साकारला तारांगण प्रकल्प
मार्कंडेय विद्यालयामार्फत मुंबईतील नेहरू सायन्स सेंटरमध्ये सात दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते, पण त्या सेंटरमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी दिसले नाहीत. त्या प्रशिक्षणात तारांगण उभारणीचे स्वप्न बरोबर घेऊन आलो. 1986 मध्ये नगरला राज्य विज्ञान प्रदर्शन भरवले. त्यातून शिल्लक राहिलेल्या तीन लाख रुपयांचा विज्ञान सुधार ट्रस्ट स्थापन केला. त्या वेळी तारांगण उभारणीसाठी तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांकडे पाठपुरावा केला, पण यश आले नाही. त्यानंतर 2007 मध्ये धनगरवाडी येथे जागा घेतली. त्याच जागेवर तारांगणचे स्वप्न पूर्ण झाले.
-अशोक जोगदे, संचालक, एफर्ट्स अकॅडमी